श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
☆ पुरणपोळी एक… वृत्तं अनेक… – सौजन्य : श्री आनंदराव जोशी ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
एखाद्याचा “पुरणपोळी” या विषयावर किती अभ्यास असावा, त्याला “पुरण” किती आवडत असावं, त्याचा उत्तम नमुना . पुणे तेथे काय उणे !
इंद्रवज्रा:
चाहूल येता मनि श्रावणाची
होळी तथा आणखि वा सणाची
पोळीस लाटा पुरणा भरोनी
वाढा समस्ता अति आग्रहानी ||
भुजंगप्रयात:
सवे घेउनी डाळ गूळा समाने
शिजो घालिती दोनही त्या क्रमाने
धरी जातिकोशा वरी घासुनीते
सुगंधा करावे झणी आसमंते ||
(जातिकोश – जायफळ)
वसंततिलका
घोटा असे पुरण ते अति आदराने
घ्यावे पिळूनि अवघे मऊ कापडाने
पिळता फुटे गठुळ ते मऊसूत होते
पोळीमधे पसरते सगळीकडे ते ||
मालिनी
अतिव मधुर ऐसे पुरण घ्यावे कराते
हळू हळू वळू गोळे पारिला सारणाते
कणिक मळूनी घ्यावी सैलशी गोजिरी ती
कडक नच करावी राहुद्या तैलवंती
मंदाक्रांता:
घ्यावी पारी करतळ स्थळी अल्प लावोन पीठी
ठेवा गोळी अतिव कुतुके सारणाची मधे ती
बांधा चंबू दुमडुनि करे सारणा कैद ठेवा
पाटा ठायी पसरूनि पिठा लाटण्या सिद्ध ठेवा ||
पृथ्वी
करे धरुन चेंडुला अधिक दाब द्यावा बळे
पटा धरुन लाटण्या सुकर होतसे आगळे
समान फिरवा रुळा पसरि चर्पटी सुस्थळे
असे न करता पहा पुरण बाहरी ओघळे ||
शार्दूल विक्रिडित:
हाताने उचला झणि प्रतल ते गुंडाळुनी लाटण्या
उत्कालू हलके तसे उलटता खर्पूस ही भाजण्या
वाफा येत जशा उमाळत सवे सूवासही दर्वळे
नाका गंध मिळे सवेच उदरी क्षूधा त्वरे उत्फळे…!!
☆
सौजन्य : श्री आनंदराव जोशी
(एक अस्सल पूर्वाश्रमी सदाशिव पेठी आणि आजीव पुरणपोळीचे उपभोक्ते ! )
संग्राहक : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈