श्री मोहन निमोणकर
वाचताना वेचलेले
☆ “आपला कायम पत्ता काय आहे…???” – लेखक : श्री नंदकिशोर मुळे ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
मा. श्रीमती निर्मला सीतारामन यांचे विचारात पाडणारे प्रगल्भ चिंतन !
तिरुचिरापल्ली येथील आमच्या संयुक्त कुटुंबाच्या घरात आम्ही 5 ते 95 वर्षे वयोगटातील 14 जणं राहत होतो. सर्व मुले, नातवंडे, आजी-आजोबा जे कुणी होते ते त्यात अगदी आनंदाने आणि ‘समाधानाने राहिले, जगले …!’ पण आज, मी दोन्ही वडिलोपार्जित घरे सोडली आहेत. ज्या बागेची माझी आई तासनतास निगा राखत़ होती, काळजी घेत होती तीचा आता पालापाचोळ्याने ताबा घेतला आहे. जांभुळ, शेवगा, काही कडुनिंब आणि पिंपळ मात्र अजून टिकून आहेत. परंतु हे ही खरं की सर्व सौंदर्य क्षणिक असतं. दुर्लक्ष झालेल्या गोष्टींवर नियमांचे नियंत्रण कसे राहणार ! दुर्लक्ष किती शक्तिशाली असतं हे आता लक्षात येते. असंख्य रंगांची मनमोहक फुलं होती … ती ही गेली. माझी आई खारूताई, मोरांना रोज दाणे घालायची, त्या पक्षांच्या कुटुंबाचे काय झाले असेल याची मला हुरहूर वाटत असते. बुलबुल, चिमण्या, पोपट, अन्य पक्षी, कोकिळा यांनी किलबिल चालू असे. माकडांची एखादी टोळी, जे कधीतरी महिन्यातून एकदा या ठिकाणी येऊन नासधूस करीत असत.
“माणसे निघून गेली की घर घर राहत नाही”.
सुरुवातीला मला विकावेसे वाटले नाही आणि आता जावेसे वाटत नाही.
कालौघात तेथे राहणाऱ्या चौदापैकी दहा जण जग सोडून निघून गेली.
मी आमच्या आजूबाजूच्या परिसरात फिरले आणि एकेकाळी आयुष्याने भरलेल्या अनेक घरांची अशीच अवस्था झालेली मी पाहिली. काही जागा आता आईवडीलांना सोडून रहाणाऱ्या मुलांच्या, विद्यार्थ्यांच्या अपार्टमेंट्सने घेतली आहे.
ओऽहो ! सारं कसं शांत शांत! सर्व काव काव संपली की!!
आपण घरे बांधण्यासाठी किती आटापिटा करतो, ताणतणावात जगतो, नाही? खरं तर आमच्या मुलांना याची गरज असते का? किंवा त्याहूनही वाईट म्हणजे त्यासाठीची आपली मरमर !
पर्मेश्वरानी दिलेलं आयुष्य तसं पाहता एक भाडेतत्त्वावर मिळालेली संधी असते. त्याला कुठल्याही वाटाघाटीच्या सीमा नसतात पण त्यावरही ताबा मिळवण्यासाठी आपण बॅंक हप्त्यांच्या ओझ्याखाली विवेकशुन्य जीवन जगत असतो.
एक दिवस, आपण प्रेमाने बांधलेले हे सर्व काही एकतर संपलेल असेल, भांडणात अडकलेलं असेल किंवा विकलं जाईल.
प्रत्येक वेळी मी ‘कायमचा पत्ता’ विचारणारा फॉर्म भरते तेव्हा मला आपल्या मानवी मूर्खपणाचेच हसू येतं.
झेनची एक कथा आहे की एक वृद्ध भिक्षू एका राजाच्या राजवाड्यापाशी गेला आणि त्याने रक्षकाला सांगितले की या अतिथी गृहात मला एक रात्र घालवायची आहे.” “तुला हा राजवाडा आहे हे दिसत नाही का?” रक्षक चिडून म्हणाला. साधू म्हणाला, “मी दहा वर्षांपूर्वी इथे आलो होतो तेव्हा येथेच थांबलो होतो, तेव्हा येथे दुसरा कुणीतरी राजा होता. काही वर्षांनी, त्याची गादी कोणीतरी घेतली नंतर कोणीतरी. जिथे रहिवासी सतत बदलत राहतात ते एक अतिथीगृहच असतं.”
जॉर्ज कार्लिन म्हणतात “घर ही केवळ अशी एक जागा आहे जिथे तुम्ही बाहेर जाऊन खूप काही मिळवता अन् मिळवलेल्या सगळ्या गोष्टी येथे साठवत असता!”
जसजशी घरं मोठी होत जातात तसतशी कुटुंबं लहान होत जातात. जेव्हा घरात सगळे असतात, तेव्हा आपल्याला एकांत हवा असतो आणि जेव्हा घर रिकामं पडतं, तेव्हा आपल्याला सगळ्यांचा सहवास हवा असतो!
आपल्या स्वप्नातलं घर बांधण्यासाठी जगणं सोडून देणाऱ्या व शेवटी, कायमस्वरूपी निवासस्थान म्हणून मानलेल्या अतिथिगृहातून निघून जाणाऱ्या माणसांवर पशू, पक्षी आणि प्राणी नक्कीच हसत असतील!
विवेकशुन्य मानवी इच्छा, अन् काय !!
स्वैर अनुवाद : श्री नंदकिशोर मुळे
संग्राहक : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈