श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ “फुलला बहावा…” ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆
सोनसळी लेऊन अंगावरती
भरजरी शेला सोनेरी
काटक तनु तव झाकून घेसी,
कुसुमे गुंफून सोनेरी
*
बहार म्हणावा की बहर म्हणावा
रंग तव तनुचा झळकतो वर्ण सोनेरी
वसुधेची ही ऐश्वर्य संपदा,
लोंगर लोंबती सुवर्ण रंगी सोनेरी…
(कवी अज्ञात)
किंवा…
सुवर्णाची फुले
सुवर्णाचे मोती
मधे मधे पाचू
श्रीमंती ही किती?
*
मोजदाद याची
करावी कशाने?
घ्यावे नेत्रसुख
आनंदी मनाने
(कवयित्री नीलांबरी शिर्के)
…. असा हा नजर खिळवून ठेवणारा …. ज्याचे वर्णन करण्यासाठी शब्दांनाही जणू बहर यावा असा बहावा … बहावा फुलला की ६० दिवसांनी पाऊस पडतो. याला पावसाचा ” नेचर इंडीकेटर ” असेही म्हणतात, या वर्षी हा लवकर फुलला आहे. आता साधारण 28 मे नंतर पाऊस पडेल. या झाडाला ‘ शॉवर ऑफ फॉरेस्ट ‘ असेही म्हणतात. आणि या वृक्षाचा अंदाज अचूक असतो …..
कवयित्री इंदिरा संत यांनीही या देखण्या बहाव्याचं किती सुंदर आणि बोलकं चित्ररूप वर्णन केलंय बघा — …
नकळत येती ओठावरती
तुला पाहता शब्द वाहवा,
सोनवर्खिले झुंबर लेऊन
दिमाखात हा उभा बहावा।।
*
लोलक इवले धम्मक पिवळे
दवबिंदूतुन बघ लुकलुकती,
हिरवी पर्णे जणू कोंदणे
साज पाचुचा तया चढवती ॥
*
कधी दिसे नववधू बावरी
हळद माखली तनु सावरते
झुळुकीसंगे दल थरथरता
डूल कानिचे जणू हालते ।।
*
युवतीच्या कमनीय कटीवर
झोके घेई रम्य मेखला,
की धरणीवर नक्षत्रांचा
गंधर्वांनी झुला बांधला॥
*
पीतांबर नेसुनी युगंधर
जणू झळकला या भूलोकी,
पुन्हा एकदा पार्थासाठी
गीताई तो सांगे श्लोकी ।।
*
ज्या ज्या वेळी अवघड होई
ग्रीष्माचा तुज दाह सहाया,
त्या त्या वेळी अवतरेन मी
बहावा रुपे तुज सुखवाया ॥
(कवयित्री : इंदिरा संत)
☆
संग्राहिका – सौ उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈