श्री मोहन निमोणकर
वाचताना वेचलेले
☆ “भज्यांचे विश्व —” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री मोहन निमोणकर ☆
संपूर्ण महाराष्ट्राला एकाच धाग्याने बांधून ठेवणाऱ्या गोष्टी कोणत्या ? असे जर कोणाला विचारले तर कोणी पंढरपूरच्या विठोबाकडे बोट दाखवेल, कोणी लोककला म्हणेल, तर कोणी सहयाद्री पर्वत सांगेल.
माझ्या मते या सगळ्या सांस्कृतिक व भावनिक गोष्टी झाल्या.
पण खऱ्या अर्थाने महाराष्ट्राला जोडणारी एकच गोष्ट म्हणजे धागा नसून भजी हा सर्वमान्य पदार्थ आहे यावर कोणाचे दुमत नसावे. भजी न आवडणारा माणूस अजून तरी मी पाहिलेला नाही.
खूप वर्षांपूर्वी प्रसिद्ध उद्योगपती शंतनुराव किर्लोस्कर यांची मुलाखत T V वर पाहिली होती.
त्या अर्ध्या तासाच्या मुलाखतीत त्यांच्याकडून अनेकदा भजी या गोष्टींचा उल्लेख व त्या विषयीच्या उपमा आल्याचे मला आठवते.
.. थोडक्यात काय तर त्यांच्यासारख्या उद्योगपती पासून माझ्यासारख्या उचापती माणसाला भजी ही प्रिय गोष्ट आहे.
भज्यांची पहिली ओळख ही लहानपणी पत्ते खेळताना झाली.
एक्क्या मध्ये किलवर, बदाम किंवा चौकट चा एक्का हातात आला तर विशेष आनंद होत नसे. पण इस्पिक एक्क्याचे भजे आले की चेहऱ्यावरचा आनंद लपवता येत नसे. त्या पानाचा तो गोलाकार डिझाइन असलेले रंग फार आवडत असे.
भजी दोन प्रकारे खाल्ली जातात. एक म्हणजे घरात व लग्न , मुंज वगैरे समारंभात. दुसरी म्हणजे हॉटेल, ढाबा , टपरी अशा ठिकाणी.
घरातील भजी थोडा सात्विकपणा घेऊन येतात. त्याला पवित्र कार्यक्रमाची जोड असल्याने कांदा लसूण माफक वापरले जातात. घोसावळी ,कोबी किंवा प्लेन असेच प्रकार केले जातात.
गोड केळ्याची भजी हा मला आवडणारा प्रकार खूप कमी केला जातो व विशेष लोकप्रिय नाही. पण गरम गरम भजीच्या कव्हर मधून जेव्हा गरम केळे डोकावते तेव्हा जिभेला व मनाला दोन्ही प्रकारे चटका देऊन व लावून जाते.
शाळकरी व कॉलेज वयात स्वयंसेवक म्हणून वाढप्याचे काम करणाऱ्या लोकांसाठी लग्नातील आचारी लोक खास भजीचा घाणा काढत.
तेव्हाचे आचारी हे व्यावसायिक केटरिंग कॉन्ट्रॅक्टर झालेले नसत. एक पंगत झाली की दुसरी बसे पर्यंत असे भज्यांचे घाणे मी स्वतः अनेकदा रिचवले आहेत.
बाहेरची भजी प्रथम खाल्ली तो दिवस मला चांगला आठवतोय. एक दिवस वडील सकाळी सकाळी आम्हाला बंडगार्डनला घेऊन गेले होते. १९७० च्या सुमारास तिथे बोटिंग चाले.
बोटिंग झाल्यावर एका टपरीवर भजी व चिंच गुळाची चटणी खाल्ली व तेव्हापासून भजी व चिंच गुळाची चटणी हे समीकरण फिक्स झाले.
हॉटेलमध्ये भजीबरोबर टोमॅटो सॉस दिले की माझे पित्त खवळते.
कालानुरूप आपले पुणे बदलले आहे पण तीन भजीवाले अजूनही अढळ ध्रुवपद घेऊन बसले आहेत.
बाजीराव रोडवरील विश्रामबागवाड्या समोरचा, रतन टॉकीज समोरचा व फडके हौदा जवळील रेल्वे बुकिंग ऑफिस जवळचा. शाळकरी वयात यांच्याकडील भजी फक्त गणेशोत्सवात खाल्ली जात. गेल्या काही वर्षांत तर hygene वगैरे मुळे तिकडे लक्ष दिले जात नाही ही गोष्ट वेगळी.
पुण्यात भजी टिकवून ठेवण्यात वाटा उचलणारे म्हणजे टिळक रोडवरील रामनाथ हॉटेल
आषाढ महिन्यात चातुर्मास सुरु होण्याआधी माझे सासरे नेहमी तिथली भजी आणायला सांगत. कागदाच्या पुडीत ती घरी आणेपर्यंत पिशवी अगदी तेलाने माखून जात असे. पण दोन भजी व त्याबरोबर कडक मिरची पोटात गेली की तबियत एकदम खूष !
गणपती चौकातील आरोग्य मंदिर ची बटाटा भजी ही पण अशीच सुंदर. बेडेकरांनी जरी मिसळीत नाव मिळवले असले तरी त्यांची भजीही उत्तमच.( सध्या देतात की नाही ते जाणकार मित्रांनी सांगावे )
तुळशीबागेत सुध्दा श्रीकृष्ण उपहार गृहातील मिसळीला भजी हवीतच.
सुजाता हॉटेलमध्ये भजी सूप नावाचा प्रकार मिळे. चिंच गुळाचे पाणी त्यावर कांदा, कोथिंबीर, शेव व भजी – -अहा हा ! अजून आठवले तरी तोंडाला पाणी सुटते.
बादशाहीमध्ये सुद्धा एकदा जेवणाबरोबर extra चार्ज लावून भजी खाल्ल्याचे आठवते. गोल भजी, खेकडा भजी हे दोन प्रामुख्याने विकले जाणारे ब्रँड.
महाराष्टाच्या कानाकोपऱ्यात कुठेही जा , एखादे तरी भजीचे हॉटेल मिळणारच. का कोणास ठाऊक पण अशा दुकानात भजी हा पुरुष माणूस करत असतो तर काउंटर वर नेहमी त्यांची पत्नी असते.
मला या दुकानात जर सर्वात काय आवडत असेल तर पीठ पातेल्यात काढून त्यात पाणी, मसाला , तिखट, कांदा घालून कढईत सोडे पर्यंतची कृती .बहुतेक सर्व मंडळी त्यात इतकी गर्क झालेली असतात की जणू समाधी लागली आहे.
मग हळूहळू कढईच्या टोकावरून किंवा मध्यातून एकेक भजे तेलात सोडणे. मग लाल रंग येईपर्यंत वरखाली करून झाऱ्यावर निथळत ठेवणे. एकदा तो भज्यांचा lot अल्युमिनियमच्या परातीत टाकला की पुढचे काम पोऱ्या करणार.
भजी ही कागदाच्या पुडीत धरून खाल्ली तर जास्त मस्त लागतात. मधूनच पुडी बाजूला करून मीठ लावलेली मिरची दाताखाली चावायची. त्यासारखे स्वर्गसुख नाही.
जोडीला चुरलेली भजी , तिखट व लसूण घातलेली चटणी असेल तर काय विचारायलाच नको.
ज्याप्रमाणे शास्त्रीय संगीतात काही राग हे सर्वकालीन म्हणजेच केव्हाही गायले तरी चालतात तसेच भजी पण सर्वकालीन खाद्य आहे.
भजी खाण्याचे आवडते ठिकाण म्हणजे एखादे हिल स्टेशन, सिंहगड, सज्जनगड , वरंध घाट, ताम्हिणी घाट .
महाबळेश्वरच्या आर्थर सीटला सकाळी सकाळी नऊ वाजता जाऊन भजी खाणे हे माझे आवडते काम.
काही वेळेला तर आदल्या दिवशीचे तेल वापरून केली आहेत हे समजते, पण त्यांची चव न्यारीच आणि कधीच बाधत नाहीत.
लोणावळा येथील भजी पॉइंटची भजी ही नेहमीच किलोवर घ्यावीत नाहीतर कुटुंबात कलह माजू शकतो.
उटी येथे एकदा लांब मिरची घालून केलेले भजे एकट्याने फुल्ल खाल्ले. लग्न नवीन झाले असल्याने बायकोवर इंप्रेशन मस्त मारले गेले.
पुणे कोल्हापूर मार्गावर ज्या बस नॉनस्टॉप जातात त्या कराडच्या अलीकडे अतीत गावाच्या बस स्थानकात फक्त भज्यांसाठी थांबतात. तो आस्वाद मी असंख्य वेळा घेतला आहे.
सुखाच्या कल्पनेत माझे एक सुख म्हणजे कुठलेतरी डोंगरगाव, जांभुळपाडा, बामणोली अशा नावाचे गाव असावे, हवा ढगाळ व रिमझिम पाऊस पडत असावा, डोंगर दऱ्यांवर धुके असावे , एखाद्या पत्र्याच्या टपरी वर भजी चालू असावीत, मग पुडीत भजी, मिरची, लाल चटणी व तिखट लागले की लालबुंद कडक चहाचा घुटका
आयुष्यात दुसरे काही नकोच मग !
लेखक : अज्ञात
संग्राहक : श्री मोहन निमोणकर
संपर्क – सिंहगडरोड, पुणे-५१ मो. ८४४६३९५७१३.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈