सौ. मंजुषा सुनीत मुळे
वाचताना वेचलेले
☆ “स्वप्न जगणं…” – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
साल 2004.माझे पती योगेश.नोकरी निमित्त इंग्लडमध्ये रहात असताना मीही काही महिने त्याच्यासोबत तिथे होते. माझे वय तेव्हा साधारण 25 च्या आसपास असावे. योगेशची बाॅस पॅट 40 वर्षाची झाली म्हणून पार्टी होती. पॅटचा जोडीदार एरिक आणि अजून एक इंग्रज जोडी असे आम्ही सहाजण या छोट्याशा पार्टीसाठी एकत्र आलो होतो
टेबलवर रंगलेल्या गप्पांच्या ओघात मी एरिकला विचारलं, “तू काय काम करतोस ?” या प्रश्नाचे जे उत्तर मिळाले त्याने मला खडबडून शुध्दीत आणलं . तो म्हणाला, “मी स्टेशनवर झेंडा दाखवतो.” मी आणि योगेश नि:शब्द. कारण पॅट योगेशची उच्चपदस्थ अधिकारी.
माझी जिज्ञासा म्हणा किंवा भोचकपणा मला शांत राहू देईना. मी पुढे परत विचारले, “सुरवातीपासून तिथेच आहेस का?” योगेश थोडा अस्वस्थ झाला आणि त्याने माझ्याकडे रागाचा एक कटाक्ष टाकला. मी थोडं दुर्लक्ष केलं. तो qम्हणाला, “Nope, चाळीसाव्या वाढदिवसापर्यंत मीही सॉफ्टवेअर कंपनीमध्ये अधिकारी होतो. 20 ते 40 या वीस वर्षात खूप काम केलं. प्रचंड पैसे साठवले. फिक्स केले. आणि आता.. आता मी माझं जुनं स्वप्न जगतोय.” “स्वप्न म्हणजे?” मी विचारलं.
“मी लहानपणी जेव्हा जेव्हा माझ्या माॅमबरोबर स्टेशनवर जायचो,तेव्हा मला हा सिग्नलमॅन खूप भुरळ घालायचा. वाटायचं,किती लकी आहे हा! अख्खी ट्रेन थांबवू शकतो. आणि त्याच्या हातातले ते दोन झेंडे मला रात्री स्वप्नातही दिसायचे. मग जसजसा मोठा होत गेलो, तसं हा सिग्नलमॅन मागे राहिला. मीही चारचौघांसारखा खूप शिकलो. एक्झिकेटिव्ह पोस्टवर आलो आणि रुटीनमधे अडकलो. पण..
माझ्या चाळिसाव्या वाढदिवसाला शांत मनाने ठरवले. आता या बिग मॅन एरिकने स्मॉल किड एरीकचे स्वप्न पूर्ण करायचं . आणि दुस-या दिवसापासून स्टेशनवर रुजू झालो. ते माझे आवडते लाल हिरवे झेंडे हातात घेतले. मी त्या क्षणाच्या आजही प्रेमात आहे.”
एरीक मस्त छोट्या एरीकसारखा हसला. आणि मग मोठ्या माणसासारखा बीअर रिचवू लागला.पार्टी संपली.
हा एरिक त्या दिवशी माझ्या आयुष्याला एक मोठी कलाटणी देऊन गेला. आयुष्यात जागोजागी अनेक लोक भेटतात, काही ना काही देऊन जातात.पॅटने त्यादिवशी.. चाळीशीतही कसं मस्त तरुण आयुष्य जगायचं, आयुष्यातील प्रत्येक टप्पा स्वीकारताना बहरत लहरत कसं जगायचं हे शिकवलं. ही जोडी विलक्षण आवडली मला.
मी आणि योगेश घरी आलो तेव्हा आम्ही दोघेही एरीकच्या प्रेमात पडलो होतो.
भूतकाळात मागे टाकलेले, हरवलेले, विसरलेले आपापले हिरवे, लाल झेंडे आठवले. माझी डायरीत राहिलेली कविता, अर्ध्या वाटेवर राहिलेलं गाणं, योगेशची एखादे वाद्य शिकण्याची अपूर्ण इच्छा, असं……. बरंच काही…
मीही माझ्या चाळीसाव्या वाढदिवसाला आवडता झेंडा हातात घेतलाय. कवितेचा,गाण्याचा, जगण्याचा.
आज तो नवा गुरु प्रेरणा देऊन गेला.
1.पुढील काही वर्षे झटून काम करण्यासाठी.
2.महत्त्वाकांक्षा, पैसा यांच्या हव्यासात न हरवण्यासाठी.
3.चाळीशीनंतर आवडत्या रंगाचा झेंडा शोधण्यासाठी.
मित्रांनो,एरिकने जे चाळीशीत केलं,ते आपण किमान साठीत करू शकणार नाही का?वयाचा टप्पा कोणताही असो. स्वतःसाठी जगणं कधीपासून सुरु करायचं, याची एक क्रॉस लाईन आपण ठरवून घ्यायलाच हवी. अगदी चाळीशीमध्ये शक्य नसलं तरी, किमान पन्नाशीनंतरच आयुष्य आपण आपल्या स्वतःसाठी जगायला हवं.
आपण आज आपल्या आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येईल – अगदी शेवटच्या क्षणापर्यंत लोक धावत असतात. पन्नाशी , साठी , सत्तरी गाठली, तरीही त्यांचं धावणं कमी होत नाही.वयानुसार शरीराला, मनाला, बुद्धीला, विश्रांती दिली नाही, तर एक दिवस धावता धावताच आपण जगाचा निरोप घेणार हे सांगायला कोणा ज्योतिषाची गरज नाही.
मित्रांनो,जोपर्यंत शरीर साथ देत आहे तोवरच शोधायला हवा आपण आपला आवडता झेंडा!
लेखक : अज्ञात
संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈