वाचताना वेचलेले
☆ तिला विचारलं नाही… – कवी :अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुनीत मुळे ☆
ज्या क्षणी पाहिले तिला
होकार गृहीतच धरला
मी तुला आवडलो का?
तिला विचारलंच नाही
सप्तपदी चालताना
घुटमळली पाऊले तिची
हुरहुर कसली होती?
तिला विचारलंच नाही
माप ओलांडताना उंबरठ्याचं
मी आलो सहज आत
तुलाही यावंसं वाटतंय का?
तिला विचारलंच नाही
झाली पहिली भेट
किती आतुर होतो मी
ओढ तुलाही आहे का?
तिला विचारलंच नाही
वंशाला दिवाच हवा
सांगून मोकळा झालो
पण आई व्हायचंय का?
तिला विचारलंच नाही
संगोपन करतांना मुलांचं
कसरत होत होती तिची
गरज माझीही लागेल का?
तिला विचारलंच नाही
आयुष्यभर दिली साथ
झाली सुख दु:खाची सोबती
कधी मन तिचं दुखलं का?
तिला विचारलंच नाही
न मागताच तिच्याकडून
घेतलं मी सारं काही
तुलाही काही हवं का?
तिला विचारलंच नाही
खरंच किती स्वार्थी झालो
गृहीतच धरलं मत तिचं
तिचं मन काय म्हणतं?
तिला विचारलंच नाही
आत्ता विचारलं तिला
सांग काय हवंय तुला?
वय तिचं केव्हा झालं?
समजलेच नाही समजलेच नाही
कवी :अज्ञात
संग्राहक : श्री सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈