वाचताना वेचलेले
☆ किती देखणी असतात ना नाती ! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. सुचिता पंडित ☆
‘लक्ष द्या जरा चिरंजिवाकडे
शिंगं फुटलीयेत त्यांना,’
अशा टोमण्याकडे दुर्लक्ष करणारी
आई
आणि
आपल्या बछड्यानं पहिल्यांदाच ‘आत्या’ म्हटलेलं
ताईला फोनवर ऐकवणारा
भाई
गळ्यात हात टाकून
‘मावशी, मी मदत करू तुला?’ विचारणारी
ढमी
आणि
‘मुलीला मांडवात घेऊन या’ चा पुकारा झाल्यावर
डोळे भरून येणारी
मामी
कसे लोभस असतात ना?
मला मामीच्याच हातचे लाडू आवडतात
असं आईदेखत सांगणारी बिनधास्त
सखू
आणि
माहेरवाशिणीच्या गालावरून हात फिरवत
भरल्या आवाजात ‘येत जा गं घरी’ म्हणणारी
काकू
सगळी गुपितं विश्वासानं शेयर करणारी
मैत्रीण
आणि
‘बाकी काही तक्रार नाही हो
पण फार कमी जेवते तुमची मुलगी ‘
असं फोनवर सांगणारी
विहीण
किती प्रेमळ असतात ना?
वटपौर्णिमेला न चुकता शहाळं आणणारा
नवरा
आणि
‘आमटी फक्कड झालीय गं!
माझ्या आईची आठवण करून दिलीस,’ म्हणणारा
सासरा
ऑफिसातून परतल्यावर ‘बस घटकाभर’ म्हणत
वाफाळता चहा पाजणारी
शेजारीण
आणि
चेहरा पाहून नवरोजींचा मूड ओळखणारी
सोबतीण
कसे गोड वाटतात ना?
मुलांत मूल होऊन क्रिकेट खेळणारे
बाबा
आणि
सुनेच्या सकाळच्या गडबडीच्या वेळी
नातीला फिरवून आणणारे
आबा
‘काय मग फेसबुक?’ विचारून चिडवणारा
पण चांगल्या पोस्टला लाईक देणारा
मेहुणा
आणि
घरच्यासारखे राहून
सुखदुःखात सोबत करणारा
पाहुणा
इकडे तिकडे पळत हैराण करणाऱ्या नातवाला
गरमागरम वरण भात मायेने भरवणारी
आजी
आणि
मंत्रोच्चार करत करत सुरेख रांगोळी रेखाटणारे
गुरूजी
किती स्मार्ट दिसतात ना?
पांढराशुभ्र युनिफाॅर्म घालून
हाॅस्पिटलमध्ये धावपळ करणारी
सिस्टर
आणि आश्वासक हसत
आपल्या पेशंटचा शब्द न शब्द ऐकणारा
डाॅक्टर
ऑफिसात उशिरापर्यंत काम करताना
अचानक घड्याळाकडे लक्ष जाताच,
‘इसे कल निपटाते है, its too late! you want vehicle?’ विचारणारा बॉस…
आणि
किती सुखाचा, आनंदाचा असतो ना या सगळ्यांबरोबर होणारा आपला प्रवास…!!!
मित्रांनो हसत जगा व नाती जपा आयुष्य खूप सुंदर आहे.
कवी :अज्ञात
प्रस्तुती : सौ. सुचिता पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈