सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ कोण गोंदवलेकर? – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
माझा एक वाहनचालक मित्र एकदा मोटार बिघडल्याने ती दुरुस्त करण्यासाठी एका गॅरेजमध्ये गेला. ती वस्ती तशी टपऱ्याटपऱ्यांचीच होती.
गाडी दुरुस्त व्हायला वेळ होता म्हणून तो दुकानासमोरच्या चहाच्या टपरीत गेला. कळकट लाकडी बाकं, तीच रया गेलेली टेबलं. चहा पिता-पिता त्याचं लक्ष गल्ल्यावर बसलेल्या मालकाकडे गेलं. काळासावळा असा तो तिशीतला तरुण होता.
मग सहज गल्ल्यामागे भिंतीवर लक्ष गेलं आणि माझ्या मित्राला सुखद आश्चर्याचा धक्काच बसला.
भिंतीवर श्रीगोंदवलेकर महाराजांची तसबीर होती.
चहा पिऊन झाल्यावर तो गल्ल्याशी आला आणि पैसे देता देता त्यानं विचारलं,
‘‘तुम्ही गोंदवल्याला जाता काय?’’
त्या मालकानं रूक्षपणे विचारलं, ‘‘ये गोंदवले क्या है?’’
आता माझ्या मित्राला अधिकच आश्चर्य वाटलं.
त्यानं तसबिरीकडे बोट दाखवत विचारलं,
‘‘यांचं नाव तुम्हाला माहीत नाही?’’
तो म्हणाला,
‘‘नाही.’’
मित्राला वाटलं, आधीच्या मालकानं ही तसबीर ठेवली असावी आणि ती यानं काढली नसावी.
म्हणून त्यानं विचारलं, ‘‘मग ही तसबीर इथं कोणी लावली?’’
तो मालक थोडं हळूवारपणे म्हणाला,
‘‘मीच!’’
‘ज्या माणसाला गोंदवले माहीत नाही,
गोंदवलेकर महाराज माहीत नाहीत,
त्यानं त्यांची तसबीर आपल्या दुकानात गल्ल्याच्या मागे पूजास्थानी का लावावी?’
हा प्रश्न माझ्या मित्राला पडला आणि त्यानं आश्चर्यभरल्या स्वरात विचारलं,
‘‘मग ही तसबीर तुम्ही इथे का लावलीत?’’
त्याचं जे उत्तर आहे ते सर्वच साधकांनी हृदयात साठवून ठेवावं, असं आहे!
त्यानं आपली जीवनकहाणीच माझ्या मित्राला सांगितली. जन्मापासून त्याला आपल्या आईबापाचा पत्ता माहीत नव्हता.
कळू लागलं तेव्हापासून तो रस्त्यावरच वाढत होता. खरंच त्या बालपणाची आपण कल्पनाही करू शकत नाही. कुणी दिले तर कपडे होते, कुणी दिलं तर खाणं होतं.. राहणं, झोपणं सारं रस्त्यावरच.
लहान पोराची दया येते, वय वाढू लागलं तसा तो अवचित दयेचा ओघही आटला.
मग चोऱ्यामाऱ्या सुरू झाल्या.
वाढत्या वयानं व्यसनंही शिकवली. त्या व्यसनांच्या धुंदीचीच काय ती जवळीक होती. चोरी करावी, मारामाऱ्या कराव्यात, व्यसनं करावीत, असं आयुष्य सरत होतं. आयुष्य दिशाहीन होतं आणि आयुष्याला काही दिशा असावी, याची जाणीव परिस्थितीही होऊ देत नव्हती.
एकदा रात्री दारूच्या नशेत तो रस्त्याच्या कडेला कोसळला होता. सकाळी वाहनांच्या आणि पादचाऱ्यांच्या पावलांच्या आवाजानं जाग आली.
सहज त्याचं लक्ष पदपथावरच्या झाडाच्या तळाशी गेलं. तिथं कोणीतरी श्रीगोंदवलेकर महाराजांची त्याच्या शब्दांत सांगायचं तर ‘या बाबाची’ ही तसबीर ठेवली होती.
डोळे चोळत त्यानं काहीशा कुतूहलानं ती तसबीर हाती घेतली आणि तसबिरीतल्या ‘बाबा’ कडे नजर टाकली.
त्याच्याच शब्दांत पुढची कहाणी सांगण्यासारखी आहे.
तो म्हणाला, ‘‘मी तसबीर उचलली आणि या बाबाकडे पाहिलं.
या बाबानं माझ्याकडे इतक्या करुणेनं आणि दयामय दृष्टीनं पाहिलं की तसं कोणीही कधी पाहिलं नव्हतं.
या जगात माझं कोणीतरी आहे, या जाणिवेनं मी हेलावलो.
ती तसबीर छातीशी धरून खूप रडलो.
माझं कुणीतरी या जगात मला भेटलं होतं!
मग मी पदपथावर जिथं पथारी टाकत असे तिथं ही तसबीर लावली.
त्यानंतर दिवसागणिक आश्चर्यच घडू लागलं.
रात्री निजण्याआधी तसबिरीकडे पाहिलं की मला वाटे, आज मी चोरी केलेली या बाबाला आवडलेली नाही.
मी फार अस्वस्थ होई. मग हळूहळू मी चोऱ्या करणं सोडलं. मग कधी तसबिरीकडे पाही, तेव्हा जाणवे, मी दारू पितो हे या बाबाला आवडत नाही.. मग दारू सुटली.
असं करता करता सारी व्यसनं सुटली. मारामाऱ्या थांबल्या. शिवीगाळ थांबली.
मग मी छोटीमोठी कामं करू लागलो. कष्टाचे पैसे जमवू लागलो.
या बाबाच्या चेहऱ्यावर रोज वाढता आनंद दिसत होता. असं करत करत या टपरीपर्यंत मी आलोय.”
माझ्या मित्राचाही ऊर भरून आला.
तो म्हणाला, ‘‘अरे हे सारं खरं, पण ही यांची जागा नाही. त्यांना अधिक चांगल्या जागी ठेव.’’
तो पटकन म्हणाला, ‘‘ते मला माहीत नाही. जिथं मी आहे, तिथं हे असणारच आणि जिथं ते आहेत, तिथं मी असणारच!’’
मला सांगा. आपल्याला गोंदवलेकर महाराज कोण, श्री स्वामी समर्थ कोण, साईबाबा कोण, गजानन महाराज कोण हे माहीत आहे.
त्यांचे चमत्कार, त्यांचा बोध सारं माहीत आहे.
तरी आपल्यात पालट होत नाही.
आणि त्यांचं नाव-गाव काही माहीत नसताना केवळ त्यांच्यावरच्या निस्सीम प्रेमामुळेही अंतरंगातून बोध होत जातो,
आणि त्यानं जीवनाला कलाटणी मिळते, ते पूर्ण पालटू शकतं!
याचं याइतकं दुसरं उदाहरण माझ्या तरी पाहण्यात नाही.
त्या टपरीला भेट दिली तेव्हा त्या टपरीत आणि त्या चहावाल्याच्या डोळ्यांत मला गोंदवल्याच्या दर्शनाचंच समाधान मिळालं.
तेव्हा सद्गुरू सगुण देहात नसले तरी ते बोध करतात.
आणि त्या बोधाचं पालन हीच खरी नीती.
कारण जीवनातली सर्व अनीतीच ती थोपवते!
लेखिका : अज्ञात
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈