सुश्री अरुणा मुल्हेरकर
वाचताना वेचलेले
☆ ढिली है डोरी… ☆ सुश्री अरुणा मुल्हेरकर ☆
कुठलीही गोष्ट फार काळ ताणून धरली की ती तुटतेच! मग ती पतंग असो,श्वास असो,नात्यातील वादविवाद असो, हट्ट असो काही ताणले की गोष्ट तुटतेच! म्हणूनच “योग्य वेळी योग्य गोष्टींना ढिल देता आलाच पाहिजे.”असे बाराव्या वर्षांपासून शैव पंथीतील काश्मीरमधील संत लल्लादेवी सारख्या म्हणायच्या!
कधीकधी माणसातील अहंकारच काही गोष्टींना ढिल देऊ देत नाही.पण ताणल्यामुळे जर काही तुटले तर दोष मात्र माणूस लगेच देवाला देतो.माणसं कित्येक वेळा वाईट गोष्टींचे खापर देवावर फोडतात.तेव्हा शंकराच्या असीम भक्त लल्लादेवी म्हणतात तुम्ही कितीही देवाचे करा देव तुम्हाला मृत्यू दिल्याशिवाय रहाणार नाही.मृत्यू अटळ आहे. तुम्हाला मोक्ष हवा असेल तर तुम्ही श्रध्दा ठेवा देवावर!
हेच तत्वज्ञान संत लल्लादेवी ढिल हा एक शब्द घेऊन आपल्या अभंगातून सांगतात. ताणून धरणं हा माणसाचा स्वभाव आहे.आणि आपण ताणून धरल्यावर ढिली डोरी छोडना हा देवाचा स्वभाव आहे.कारण वो शंकर भोळा आहे.तो कधीच रागवत नाही.
हे रब्बा
ढिली है डोरी
कैसे संभालू गठडी
मैं ये मिठाई
एक ढिल दिल्यावर सगळ्या गोष्टी सुरळीत होऊ शकतात.हा ढिल इतर माणसं आचरणात का आणत नाही ह्याचे लल्लादेवींना दुःख होते.
लोंग ढिले है
ढिल नहीं जानते
असं म्हणत आपलं दुःख कधीही दुसऱ्याला न सांगता, समाधानी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करणाऱ्या संत लल्लादेवी ह्या आजच्या काळाला नक्कीच प्रेरणादायी ठरतील! संत लल्लनदेवी प्रज्ञावंत होत्या.परंतु शक्ती पेक्षा सहनशक्ती श्रेष्ठ हे तत्व उराशी बाळगून मनाच्या आणि शरिराच्या जखमा कधीच त्यांनी इतरांना दाखवल्या नाहीत.उलट ८० टक्के जखमा ह्या केवळ नामस्मरणाने भरतात हे त्यांनी आपल्या दिवसरात्र नामस्मरणाने दाखवून दिले.तुम्ही जितकं देवा जवळ जाता तितक दुःख कमी होत.कोणत्याही अंधाराला आपण सामोरी जाऊ शकतो.एक अलौकिक उजेड लल्लनदेवींना मिळाला होता.म्हणूच लहान वयात लग्न होऊन काश्मीरला सासरी आल्यावर सासरकरांच्या प्रचंड त्रासाचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही.
रस्सी कच्चे धागे की
खिच रही है नाव
जाने कब सुन मेरी पुकार
करे दे भवसागर पार
आपल्या श्वासांना रस्सीची उपमा देत संपूर्ण काश्मीरी लोकांवर, काश्मिरी पंडितांवर भावनिक शब्दांचे गारूड घातले लल्लनदेवींनी!
जर गुराखी नसेल तर गुरं इकडे तिकडे जाणारच.म्हणून आपल्या इंद्रियांचे आपण गुराखी बनलं पाहिजे म्हणजे वासना इकडे तिकडे जाणार नाहीत.मोह उरणार नाही.असे म्हणत हजारांहून अधिक अभंग त्यांनी लिहिले.
सासू त्रास देऊन थकली परंतु लल्लनदेवी त्रास सोसून थकल्या नाहीत.लल्लादेवींशा जेवायला वाढायच्या आधी सासू कंकर ( छोटे दगड ) आधी ताटात वाढून त्यावर चावल ( भात ) वाढायची.लल्लन सगळी शीत कंकर मधुन वेचून वेचून खायची.जेवण झालं की लल्लनदेवी ते कंकर टाकून न देता, प्रामाणिकपणे ते सगळे कंकर स्वच्छ धुऊन पुन्हा सासूला नेऊन द्यायची.म्हणजे सासूला तेच कंकर पुढच्या जेवणामध्ये सासूबाईंना सहज टाकता येतील. लल्लादेवींना वाटायचं ज्या गोष्टीने सासुबाईंना आनंद मिळत असेल ,तर तो त्यांचा आनंद आपण का हिरावून घ्यायचा.इतकी साधीभोळी विचारसरणी लल्लनदेवींची होती.
स्वतःला शिवतत्त्व मानणाऱ्या लल्लादेवींना साक्षात शिवाने ज्ञानबोध दिल्याने त्यांच्या हृदयातही शिवा सारखा भोळा भाव नांदत होता.केवल इश्वरके साथ ही मनुष्य का असली रिश्ता है…वही असली परमसुख है| बाकी तो माया है|….पती मुलं संपत्ती ह्या सगळ्यांवर भरभरून प्रेम करतात स्त्रिया कारण त्यांना ते आपले समजत असतात.पण आपल्याच आत असणाऱ्या आत्म्यावर त्या प्रेम करत नाही. शिवशंकराचा शोध घेणं हाच त्यांचा ध्यास होता.त्यासाठीच रानावनात भटकंती व्हायची.तासंनतास शिवाच्या नामस्मरणात गुंग असणाऱ्या लल्लादेवींना लोक नंतर वेडी समजायला लागले.एकदा लल्लनदेवींच्या अंगावर फाटकी वस्त्रे पाहून एका व्यापाराने एक चुनरी त्यांना दिली. लल्लनदेवी खांद्यावर चुनरी टाकून निघाल्या! निघताना लल्लनदेवीनीं त्या चुनरीचे वजन केले.दिवसभर त्या इकडे तिकडे ती चुनरी घेऊन फिरत होत्या.कोणी त्यांची निंदा केली की त्या डाव्या खांद्यावरच्या चुनरीला गाठ मारायच्या… आणि कोणी त्यांच्याशी प्रेमाने वागवले की उजव्या खांद्यावरच्या चुनरीला गाठ मारायच्या! दिवसभर त्या कधी डाव्या कधी उजव्या बाजूला गाठी मारत होत्या…. संध्याकाळी लल्लनदेवी पुन्हा त्या व्यापाऱ्याकडे आल्या…..गाठीच्या चुनरीचे त्यांनी व्यापाऱ्याला वजन करायला सांगितले.व्यापारी म्हणाला वजनात काहीच फरक नाही.सकाळी होत तितकेच वजन आहे.
तेव्हा लल्लनदेवी व्यापाऱ्याला म्हणाल्या… वजनात फरक पडणारही नाही.पण ह्या गाठींच वजन किती मोठं तत्वज्ञान सांगतात आपल्याला की लोकांनी केलेली स्तुती आणि निंदा ह्य दोघांमुळे मुळ वस्तूत काहीच फरक पडत नाही.म्हणून ज्ञानी माणसांनी सुख आणि दुःख ह्या दोघांचा शांतपणे स्विकार केला पाहिजे.
इतक्या सहज तत्वज्ञानाला हात लावणाऱ्या लल्लादेवींचे अभंग लोकांना मौखिक पाठ होते.लल्लालेवीनीं मुद्दाम हे अभंग संस्कृतमध्ये न लिहिता ते काश्मिरी भाषेत लिहिले.आज सातशे वर्षा नंतरही त्यांचे २६५ वर अभंग काश्मीरमध्ये लोकप्रिय आहेत.
काळाचा संघर्ष असला तरी जुम्मा मशिदी समोर आपला देह सोडणाऱ्या लल्लनदेवींनी सुध्दा मुक्ताबाई,जनाबाई सारखीच देवाची आराधना केली.शिवशंकरात समरस होण्याच्या प्रयत्नातच सामान्यांना तत्वज्ञान सांगितले. म्हणूनच सर रिचर्ड टेंपल यांनी द वल्ड ऑफ लल्ला ह्या ग्रंथात आपण भारतीय तत्वज्ञानाकडे केवळ लल्लादेवीमुळे वळलो असे स्पष्ट लिहिले आहे.
सर ग्रीअरसन यांच्या लाल वाखीयनी ह्या ग्रंथरुपी पुस्तका मध्ये म्हंटलेच आहे की जातपात न मानणाऱ्या लल्लादेवींच्या अभंगना प्रत्येक भाषेत प्रसिद्धी मिळाली आहे.ग्रीक,फ्रेंच, जर्मन, उर्दू,सिंधी,कन्नड अशा अनेक भाषांमधून आजही लल्लनदेवी लोकांच्या हृदयात बसल्या आहेत. आजही लल्लनदेवींच्या सिंधी अभंगात योग , देव, धर्म ह्या गोष्टी आढळतात.
मन का आइना
साफ करोगे
तो अपनीही रूह
शैव धर्मातील अद्वैत तत्त्वज्ञान तसेच मुस्लिम सुफी तत्वांचा लल्लादेवींनी सुरेख संगम साधला आहे.
लेखिका : प्राची गडकरी
प्रस्तुती : अरुणा मुल्हेरकर
डेट्राॅईट (मिशिगन) यू.एस्.ए.
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈