सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ सैन्यष्टभुजा – ‘आर्मी बिहाइंड दी आर्मी‘ – लेखिका : सुश्री सायली साठे वर्तक ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
सैनिकाशी लग्न करण्याचा निर्णय घेण्यापासून ते अनेक आव्हाने पेलत तो प्रभावीपणे निभावण्यापर्यंत सैनिकांच्या पत्नी म्हणजे एका अर्थी अष्टभुजाच असतात. सिव्हिल मधल्या बिनधास्तपणे जगत असलेल्या आयुष्यातून एक स्त्री जेव्हा सैन्याधिकाऱ्याची पत्नी बनते तेव्हा तिचे जग संपूर्णपणे बदलते. पीस पोस्टिंग असेल तरी ठीक पण फिल्ड पोस्टिंग असेल तर प्रथम बरोबर राहता येईल की नाही इथपासून तयारी असते आणि राहता आले तरी राहण्याचे ठिकाण कसे असेल, वातावरण कसे असेल इथपासून सगळ्याची मानसिक तयारी करावी लागते.
नवऱ्याच्या सैन्यातल्या नोकरीच्या स्वरूपामुळे बहुतांश आघाड्यांवर तिलाच लढावे लागते आणि ही एक एक आघाडी तिची एक एक भुजा बनत जाते. त्यांची ओळख या करून द्यावी असे मला मनापासून वाटते.
पहिली भुजा – स्वावलंबी भुजा – आपल्या पतीबरोबर कधीही न गेलेल्या, राहिलेल्या ठिकाणी आपला संसार मांडणे. सैन्याचे बहुतांश तळ जुने आहेत त्यामुळे आजकाल घरे कमी पडू लागली आहेत. कुठेही गेले तरी घर मिळायला वेळ लागतो आणि घर मिळेपर्यंत गेस्ट रूम किंवा 2 रूम सेट मधे राहावे लागते. तेव्हा घरचे जेवण मिळत नाही. मेसमधून जेवण घ्यावे लागते. मुलांना घेऊन अशा गेस्टरूम्स मधे 4-5 महिने राहणे फार अवघड असते. कित्तेकदा पती 2-3 महिने कॅम्प साठी गेलेला असतो तेव्हा तिलाच मुलांना संभाळावे लागते.
दुसरी भुजा – ये तेरा घर ये मेरा घर -एकदा घर मिळाले की बेसिक फर्निचर असले तरी घर पद्धतशीरपणे लावणे आणि आहेत त्या सोयींमधे, आहे त्या सामानात कल्पकतेने घर सजवणे ही एक जोखीमच असते. कारण घरात कधी काही दुरुस्त्या असतात तर कधी काही बदल करून घ्यावे लागतात. आणि दोन तीन वर्षांनी बदली झाली की परत चंबू गबाळे आवरून पुढच्या ठिकाणी किंवा स्वतःच्या घरी जाण्याची तयारी करणे. विविध ठिकाणाहून जमवलेल्या आपल्या वस्तू व्यवस्थित राहाव्या यासाठी एक एक वस्तू संदुकांमध्ये व्यवस्थित पॅक करणे यामधे सगळ्यात जास्त शक्ती आणि वेळ खर्च होतो पण तेही ती निगुतीने करते.
तिसरी भुजा – मस्ती की पाठशाला – बदली होणे हे सैनिकांसाठी त्यांच्या नोकरीचा एक भाग असल्यामुळे ते नवीन जागेत लवकर रुळतात आणि त्यांना त्यांच्या कामावर रूजू होणे क्रमप्राप्त असल्यामुळे पत्नीलाच बाकी सगळ्या गोष्टी सांभाळाव्या लागतात. मुलांच्या शाळा, क्लासेस आणि रुटीन सेटअप या सगळ्याची परत शोधाशोध आणि जोडणी अशा अथपासून इतिपर्यंत सगळ्या गोष्टी नव्याने आवडून घ्यायच्या असतात. मग त्यांना नवीन ठिकाण आवडो ना आवडो. यासाठी मुलांची मानसिक तयारी करण्याआधी ती आधी स्वतःच्या मनाची तयारी करते आणि मुलांना देखील हा बदल सकारात्मकतेने अंगिकारायला शिकवते.
उच्चशिक्षित असूनही बऱ्याचदा मनासारखी नोकरी तिला करता येत नाही. त्यावेळी बऱ्याचदा बीएड वगैरे पदवीचे नव्याने शिक्षण घेऊन ती शाळेच्या नोकरीत आपले मन रमवण्याचा प्रयत्न करते. काही जणी आपल्या आवडी जपण्याचा प्रयत्न करतात तर काही मात्र दुरावा सहन करून आपल्या नोकरीच्या ठिकाणीच राहण्याचा पर्याय निवडतात. पण या सगळ्यात आनंदी राहणे मात्र ती विसरत नाहीत
चौथी भुजा – अनोखे रिश्ते – नवीन बदलीच्या ठिकाणी नवीन माणसांशी जुळवून घेणे ही अजून एक मोठी आघाडी या पत्नी सहजपणे हाताळताना दिसतात. आपण आपल्या कॉलनीत राहत असतो तेव्हा ठराविक लोकच आजूबाजूला असतात आणि सगळ्यांशी आपले जमलेच पाहिजे असा काही नियम नसतो.
पण आर्मीमधे औपचारीक पद्धतीने झालेली ओळख आणि नाते तुम्हाला खूप काळजीपूर्वक निभवावे लागते आणि तेव्हा तुमची खरी कसोटी लागते. अर्थात बऱ्याचदा त्यातूनच काही नाती कायमसाठी घट्ट होतात आणि ती जपण्याचे काम ती उत्तमपणे करते.
पाचवी भुजा – मी अर्धांगिनी – सैन्यातल्या कार्यक्रमांच्या पद्धती, काही ब्रिटिश कालीन चालून आलेल्या परंपरा आत्मसात करणे ही फार अवघड गोष्ट असते. अगदी कुठल्या कार्यक्रमाला कुठला पेहराव करायचा, ऑफिसर्स मेस मधे अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या पत्नींना अभिवादन कसे करायचे, टेबल मॅनर्स शिकून घ्यायचे ते जेवण संपल्यावर प्लेट कशी क्लोज करायची इथपर्यंत सर्व काही अगदी योग्य पद्धतीने शिकावे लागते. पण कुठल्याही प्रकारचा बाऊ न करता हे नवे आयुष्य त्या सहजपणे अंगिकारतात.
सहावी भुजा – फॅमिली ट्री – हायरारकी आणि औपचारिकता तंतोतंत पाळणे हे सैन्यात पूर्वीपासून चालत आले आहे आणि ते पत्नीलाही लागू होते. तिच्या नवऱ्याला वरिष्ठ असलेल्या अधिकाऱ्याच्या पत्नीला उदा (मिसेस सिंघ) आणि कनिष्ठ अधिकाऱ्याच्या पत्नीला नावाने संबोधायची पद्धत सुरुवातीला अतिशय गंमतशीर वाटते पण नंतर सवय होऊन जाते. या औपचारिकेत जर तुम्ही चुकलात तर तुमच्या नवऱ्याचा क्लास लागला म्हणून समजा
मला आठवतंय आमचे लग्न झाले तेव्हा माझ्या नवऱ्याने शाळेत फॅमिली ट्री कशी शिकवतात तशी आमच्या युनिटची फॅमिली ट्री मला काढून ती लक्षात ठेवायला सांगितली होती.
सातवी भुजा – फाफा मेरी जान – FAFA म्हणजे फॅमिली फिल्ड अकोमोडेशन. नवऱ्याचे जेव्हा फिल्ड पोस्टिंग येते आणि कुटुंब बरोबर राहणे शक्य नसते. उदा- कधी कधी युनिटची जागा अगदी डोंगरदऱ्यात देखील वसलेली असते जिथे शाळाच काय पण काहीच सोयी नसतात आणि बऱ्याचदा तिथे कुटुंबासमवेत राहणे कदाचित धोक्याचे असते त्यामुळे राहण्याची परवानगी नसते. अशा वेळी काही बायका आपापल्या घरी राहणे तर काही जणी नवऱ्याच्या बदलीच्या ठिकाणापासून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या फाफा कॉलनीत राहणे पसंत करतात.
फाफा मधे राहणे तसे आव्हानात्मक असते कारण घरापासून दूर असतो, नवरा जवळ नसतो शिवाय एकूणएक गोष्ट स्वतः सांभाळावी लागते. अगदी पेट्रोल भरण्यापासून ते एकट्याने प्रवास करण्यापर्यंत सगळे आपले आपणच करायचे. पण त्यात सुद्धा एक वेगळी मजा असते. खूप काही शिकायला मिळते, नवीन मैत्रिणी बनतात, वेगवेगळ्या प्रांताचे रीति रिवाज जवळून अनुभवायला मिळतात. कुटुंबापासून दूर असूनही त्यांच्याशी संपर्कात राहणे, मुलांचे संगोपन करता करता स्वतःचा फिटनेस राखणे हे सगळे या सैन्याधिकाऱ्यांच्या पत्नीच करू जाणोत. त्याचे एक उत्तम उदाहरण म्हणजे माझी एक ख्रिस्त मैत्रीण आर्मीच्या प्रभावामुळे कारवाचौथ करू लागली आहे
आठवी भुजा – कणखरपणा हाच आमचा बाणा
कुठल्याही सैनिक पत्नीसाठी सण तेव्हाच खऱ्या अर्थाने साजरा होतो जेव्हा तिचा पती तिच्या सोबत असतो. त्यामुळे तिच्यासाठी -जेव्हा पती येई घरा, तोच दिवाळी दसरा हेच सत्य असते.
सैनिकाला कधी कुठे पाठवतील, जायला लागेल काही सांगता येत नाही. कित्तेक वेळा तर आधीपासून घेतलेली सुट्टी आधल्या दिवशी सुद्धा रद्द होते. त्यावेळी त्याच्या न येण्याने उदास झालेल्या भावना चेहऱ्यावर मात्र ती कधी दाखवत नाही. लग्नानंतर कमावलेला हा कणखरपणाच तिला बळ देत असतो.
तुम्ही कुठल्याही आर्मी ऑफिसरच्या पत्नीला भेटलात तर एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल की आहे त्या परिस्थितीत ती स्वतःला कायम आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत असते. कारण कुठले दुःख बाळगणे हे तिच्या स्वभावातून तिने वजा करायला ती एव्हाना शिकलेली असते. बारा गावचे पाणी पिऊन आणि अनेकविध अनुभव घेऊन तिने एक जाणलेले असते – आजचा दिवस काय तो खरा.. तो आनंदाने घालवायचा. कल किसने देखा है?
तर अशी ह्या अष्टभुजेची एक एक भुजा तिच्या लग्नाच्या प्रत्येक वर्षी भक्कम होत जाते आणि त्यामुळेच त्यांचे वजन ती लीलया पेलू शकते. आणि अशी कणखर आर्मी घरी असल्यामुळेच सैनिक आपले काम निश्चिन्तपणे करू शकतात.
अशा माझ्या सर्व अष्टभुजा असलेल्या मैत्रिणींना आजचा लेख मी समर्पित करते ☺️
लेखिका : सायली साठे -वर्तक
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈