श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ “निळंशार गवत…” – लेखक : वैद्य परीक्षित शेवडे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆
एक जुनी लोककथा आहे
एकदा एक गाढवाने वाघाला म्हटलं; “कसलं निळंशार गवत आहे बघ.”
वाघ म्हणाला; ” निळं गवत? उगाच काहीही काय सांगतो रे? गवत हिरवं असतं. हेही तसंच हिरवं आहे की.”
“अरे बाबा निळंच आहे हे गवत. तुझे डोळे खराब झाले आहेत.” असं म्हणून गाढवाने “वाघाचे डोळे खराब झाले आहेत” म्हणून सगळीकडे आरडाओरडा सुरू केला.
यामुळे वैतागलेला वाघ सिंहाकडे गाढवाची तक्रार घेऊन गेला. पूर्ण प्रकरण सांगितल्यावर वाघ म्हणाला;
“महाराज; गवत हिरवं असूनही गाढव मला मात्र निळंच असल्याचं सांगत राहिला. आणि बाकीच्या लोकांना पूर्ण प्रकरणही न सांगताच थेट माझे डोळे खराब आहेत म्हणून खुशाल माझी बदनामी करत सुटलाय. याला शिक्षा करा महाराज.”
सिंहाने बाजूला पडलेल्या हिरव्यागार गवताच्या गंजीकडे शांतपणे पाहिलं आणि वाघाला चार चाबकाचे फटके मारायची शिक्षा सुनावली आणि गाढवाला सोडून दिलं !
या निर्णयामुळे हैराण झालेल्या वाघाने सिंहाला शिक्षेबद्दल विचारलं.
” महाराज; इतकं हिरवंगार गवत समोर दिसत असूनही तुम्ही त्याला सोडलं आणि मलाच उलट शिक्षा? असं का महाराज?”
सिंह म्हणाला; ” शिक्षेचं गवताच्या रंगाशी काही देणंघेणं नाहीये. ते हिरवंच आहे; हे तुला मलाच काय .. सगळ्या जगाला माहिती आहे. पण तू वाघ असूनही एका गाढवाशी वाद घालत बसलास यासाठी तुला शिक्षा दिली आहे “
आपल्या आयुष्यात; त्यातही विशेषत: सोशल मीडियावर कोणाशी वाद घालत बसायचं याचा निर्णय नीट घेत चला ! सुप्रभात !!
☆
लेखक – वैद्य परीक्षित शेवडे; आयुर्वेद वाचस्पति
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈