श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
☆ बायको असतेच जरा सर्किट… – अनुवाद : सॅबी परेरा ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
[डॉक्टर ज्योत्स्ना मिश्रा ह्यांच्या ‘औरतें अजीब होती है’ ह्या हिंदी कवितेचा मुक्तानुवाद]
☆
बायको असतेच जरा सर्किट
रात्रभर झोपत नाही धड
पापण्यांची सुरूच असते फडफड
झोपेच्या दऊतीत बुडवून पापण्या
दिवसभराची डायरी लिहीत असते
दरवाजाची कडी, पोरांचं पांघरूण, नव-याचं मन
पुन:पुन्हा चाचपडून बघत असते
*
बायको असतेच जरा सर्किट
धड उठतही नाही सकाळी
झोपेतच सुरू होते कर्तव्याची दिवसपाळी
टिफीनमधे घेऊन कविता
कुंडीतल्या आशेला देऊन पाणी
ओठांवर गुणगुणत गाणी
नव्या दिवसाच्या नव्या आव्हानाला
भिडत जाते झाशीची राणी
जुळवून घेते सा-यांशी सूर
सर्वांच्या जवळ राहता-राहता
जाते स्वत:पासूनच दूर
*
बायको असतेच जरा सर्किट
स्वप्नंही धड पूर्ण पाहत नाही
अर्धवट स्वप्नं वा-यावर सोडून
पाहू लागते …
चुलीवरचं ऊतू जाणारं दूध
दोरीवरचे उडू पाहणारे कपडे
गॅलरीच्या कडेपर्यंत रांगत गेलेलं बाळ
अजूनही शाळेतून न परतलेली लेक
अडखळत पाय-या चढणारा नवरा…
*
बायको असतेच जरा सर्किट
कुठलंच काम धड करीत नाही
मधेच सोडून शोधू लागते
पोरांचे मोजे, पेन्सिली, पुस्तकं
स्वत:च्या काॅलेजच्या पुस्तकातलं मोरपिस,
स्कर्टच्या खिशातली बोरं, करवंदं
लपाछपीतल्या लपायच्या जागा
मैत्रिणींचे चुकलेले, चुकवलेले हिशेब
उघडझाप करणा-या खिडक्या
पितळेच्या डब्यातल्या चवल्या, पावल्या, दिडक्या
*
बायको असतेच जरा सर्किट
भेटत राहते, दिवसाचे चोवीस तास
वेगवेगळ्या रूपात, अवतारात
कधी नाक्यावर काॅंन्स्टेबल
कधी ब्युटीकमधे ब्यूटीशियन
कधी बसमधे कंडक्टर
कधी आॅफीसात सहकारी
ती वहिणी, ती लेक, ती ताई
ती नर्स, ती दाई, ती आई
चपलेचा तुटलेला पट्टा
साडीच्या फाॅलपाठी लपवणारी
शाळेतली ती शिस्तप्रिय बाई
काॅरीडाॅरमधे झपझप चालत
नखातला आटा झटकणारी
सकाळी घाईत अंघोळ आटोपून आलेली
ती डाॅक्टरीन बाई
*
बायको असतेच जरा सर्किट
ओढत-ढकलत कसाबसा, दिवस पार करते मात्र
क्रूस घेऊन समोर, उभी असते रात्र
दिवसाइतक्याच सहजतेने रात्रीलाही भिडते
लेकरांसाठी भुतांना पिडते
सत्यवानासाठी देवालाही नडते
*
बायको असतेच जरा सर्किट
दुष्काळात पावसासाठी आसवं ढाळते
हाताच्या ओंजळीत फुलपाखरं पाळते
सरसरून वाहू लागतो वारा
भरभरून बरसू लागतात धारा
धरतीला येते ज्वानीची भरती
ती धावत सुटते … वाचवायला
दोरीवर वाळणारे कपडे,
अंगणातले पापड, मसाले
छतावरील लोणचं, खारवलेले मासे …
*
बायको असतेच जरा सर्किट
सुखाच्या तीन-दगडी आश्वासनावर
अवघ्या आयुष्याचं आंधण ठेवते
हरेक डोंगरातून रस्ता खोदते
हरेक दरीवर पूल बांधते
कळीसारखी उमलत राहते
वा-यासारखी वाहत राहते
अंगणात पडलेला चांदण्यांचा सडा
वेणीत गुंफून केसात माळते
दिनरात डोळ्यांतून पाझरत राहते
आसवांच्या नदीत वाहत जाते
समुद्रात मिळतानाही आपला गोडवा जपते
*
बायको असतेच जरा सर्किट
डोक्याचं काम खुशाल सोपवते ह्रदयाकडे
कपाळाच्या क्षितिजावर मावळला सूर्य जरी
पहात राहते आशेने उदयाकडे
कारण…
बायको असते दुष्काळातली बरकत
बायको असते गाण्यातली हरकत
बायको असते तर्काच्या खुंटीवरून निसटलेलं तर्कट !-
☆
अनुवाद : सॅबी परेरा
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈