श्रीमती उज्ज्वला केळकर
वाचताना वेचलेले
☆ “कालजयी…” – लेखक : प्रा. डॉ. श्रीकांत तारे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर ☆
वपुंसोबत शेअर केलेलं असंख्य अविस्मरणीय क्षण मी मनाच्या गाभाऱ्यांत जपून ठेवले आहेत. मधूनच कुणीतरी भेटतं, वपुंचा विषय निघतो, नवीन काही आठवणी बाहेर येतात, अलगद मी भूतकाळांत शिरतो. ‘ज्या चहेत्यांमुळे आज आपण एका विशिष्ट उंचीला पोहोचलोय, ते चहेते म्हणजे आपलं सर्वस्व’ हे ब्रीदवाक्य असणारा आणि माणुसकी जपत आभाळाची ऊंची गाठणारा असा एक ‘कालजयी’ माणूस त्याच्या निर्वाणापर्यंत आपल्या मित्रपरिवारांत होता याकरता स्वत:चाच हेवा वाटू लागतो.
काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमांत, मंगला गोडबोल्यांची मुलाखत घ्यायला आलेली लेखिका नीलिमा बोरवणकर भेटली. कार्यक्रमानंतर एकत्र बसून जेवताना मी वपुंचं नाव घेतलं आणि नीलिमा रोमांचित झाली. खांदे उडवत म्हणाली ,
‘वपुंच्या ऐन उमेदीतील हा किस्सा तुला ठाऊक नसणार’. प्रीमियर ऑटोमोटिव्ह कंपनीचे उपाध्यक्ष होते केशव पोळ. पुण्यात कोथरूडला रहायचे. वृद्धत्वाच्या उंबरठ्यावर किडनी बिघडल्या आणि आठवड्यातून दोनदा डायलिसीस करायचा सल्ला डॉक्टरांनी दिला.’
‘बाप रे, वय वाढत गेलं की डायलिसीस कठीण होत जातं.’ मी ऐकीव माहितीवर ज्ञान पाजळलं.
‘हो ना. त्यातून तीस वर्षांपूर्वीचं डायलिसिस आजसारखं सोपं नव्हतं. पेशंटचे हाल व्हायचे. दोन दिवस दवाखान्यात रहावं लागायचं. घरी आलं की पुढल्या डायलिसिसची मानसिक तयारी करावी लागायची.
दवाखान्यातील त्रासाच्या धसक्यानं रात्र रात्र झोप लागायची नाही. पोळांची पत्नी मग वपुंच्या कथाकथनाची कॅसेट त्यांच्या डोक्याशी लावून त्यांचे पाय चेपत बसायची, वपुंनी सांगितलेली कथा डोक्यात घोळवीत, पोळ झोपी जायचे.’
माझ्या चेहऱ्यावर स्मित आलं. वपुंच्या कॅसेट्ची किमया मी स्वत: कितीदातरी अनुभवली आहे. एकबोटे, भदे, दामले, नळात जाऊन बसलेली भुताची पोरं वगैरे पात्रं, त्यांच्या तोंडचे संवाद मला अक्षरश: तोंडपाठ होते. कॅसेटच्या रूपाने वपु आमच्या घरांत शिरले आणि आमच्या कुटुंबाचा एक भाग झाले. मी नीलिमाला हे सारं सांगणारच होतो, तर मला हाताने थांबवत ती म्हणली,
‘थांब, रे, ही नुसती प्रस्तावना होती, खरा किस्सा तर पुढे आहे. पोळांची दगदग कमी व्हावी म्हणून प्रीमियर कंपनीनं त्यांना घरीच डायलिसीसचं मशिन बसवून दिलं. ओळखीचे एक डॉक्टर, बरोबरीला एक सहाय्यक, एक नर्स अशी टीम यायची, पोळांना घरीच डायलिसिस लावलं जायचं. गंमत म्हणजे, या दरम्यानही वपुंच्या कथाकथनाची कॅसेट त्यांच्या डोक्याशी लावून त्यांचं दुखणं हलकं करण्याचा प्रयत्न केला जायचा.’
मी ऐकतच राहिलो. तीस वर्षापूर्वी घरच्या घरी घरी डायलिसीस करता यायचं ही बातमी माझ्यासाठी आजही थक्क करणारी होती. मी माझं आश्चर्य नीलिमाला बोलून दाखवलं आणि तिनं समोरच्या टेबलवर हलकीशी थाप मारली.
‘बरोबर हेच वपुंना वाटलं. म्हणजे झालं काय की पोळांच्या पत्नीने वपुंना फोन केला एकदा. नवऱ्याचा आजार, घरी लावलेली मशीन, डायलिसीसचे निश्चित दिवस. हे सगळं बोलून झाल्यावर त्यांनी वपुंचे मनःपुर्वक आभार मानले. तुमच्या कथांचा आणि त्या रंगवून सागणाऱ्या तुमच्या आवाजाचा खूप आधार वाटतो माझ्या नवऱ्याला, डायलिसीस होत असतां मी त्यांचे पाय चेपते पण त्यांच्या चेहऱ्यावर स्मित येतं ते तुमच्या आवाजाने. तुमचे ऋण फेडणं कठीण आहे वगैरे बोलल्या. वपुंनीही अगत्याने पोळांच्या प्रकृतीची माहिती करून घेतली, बाईंना धीर दिला. डोळे पुसतच, अतीव समाधानाने बाईंनी फोन ठेवला.’
निलीमा बोलत होती आणि मला वपुंबरोबर माझे टेलिफोनवर घडणारे संवाद आठवत होते. आपल्या चहेत्यांचे फोन घेताना एक नैसर्गिक आनंद त्यांच्या प्रत्येक शब्दांत जाणवायचा. वाचकाने केलेली त्यांच्या लेखनाची तारीफ, समीक्षा, आलोचना, त्याचे व्यक्तिगत प्रश्न, सल्ले, वपु श्रद्धेनं ऐकायचे. एखाद्या वाचकाशी बोलताना त्यांनी वेळेचा विचार केलेला माझ्या ऐकिवात नाही. वपुंच्या मधाळ आवाजाने, आणि आपण त्यांचे ‘खास’ आहोत या जाणीवेनं तृप्त होऊन वाचक फोन ठेवायचा. आठवून माझ्या चेहऱ्यावर आगळी चमक आली असावी, कारण आणि नीलिमा हसली. माझ्या मनातले विचार तिने नेमके ओळखले. माझी उत्कंठा पुरेशी ताणली गेलीय याची खात्री करून घेत तिने पुन्हा सुरुवात केली,
‘तर, या टेलिफोन संवादानंतर दोनेक आठवडे उलटले आणि एके दिवशी अचानक, वपुंचा फोन आला पोळांकडे. कथाकथनाच्या कार्यक्रमा निमित्त पुण्यांत येतोय, कार्यक्रम रात्री आहे, पण पोळसाहेबांच्या डायलिसीसचा दिवस असल्याने डायलिसीस मशीन ऑपरेट होताना बघण्याची इच्छा आहे अश्या अर्थाचा तो फोन होता. वपु आपल्या घरी येणार या नुसत्या कल्पनेनं पोळांकडे उत्साहाला उधाण आलं. त्याकाळी मोबाईल हातात आले नव्हते पण मुंबईहून ते येणार म्हणजे मुंबईहून कितीही लवकर निघाले तरी सकाळी दहा साडे दहाच्या आधी त्यांचं येणं शक्य नाही असा अंदाज पोळ कुटुंबीयांनी बांधला. आपला आवडता लेखक, कथाकथनसम्राट प्रत्यक्ष आपल्या घरी येणार म्हणून शक्तिहीन पोळही वेगळ्याच विश्वात वावरत होते. आणि तुला गंमत सांगते श्रीकांत, सकाळी आठ वाजताच पोळांच्या दारांत वपु हजर होते. भल्या पहाटे चार वाजता त्यांनी मुंबई सोडलं आणि सकाळी लवकर डायलिसीस करायचं असतं हे ठाऊक असल्यामुळे स्पेशल टॅक्सी करून वपुंनी पोळांची ही वेळ गाठली.’
‘माय गॉड. व्हेरी इंटरेस्टिंग.’
‘हो ना. पोळांकडे हीsSSS धांदल. डॉक्टर येऊन बसलेले, सहायक कामाला लागले आणि वपु घरात. एका खुर्चीवर शरीराचा डॉक्टर बसलेला तर दुसरीवर मनाचा. श्री व सौ पोळ यांना तर काय करावं सुचेना,डायलिसीस नित्याचं असलं तरी आज उडालेली त्यांची तारांबळ काही वेगळीच होती.’
निलिमाच्या कथेत मी गुंगत चाललो. पोळ कुटुंब, वपु आणि डॉक्टर यांचे सोबत एका खुर्चीवर मीही जाऊन बसलो. पोळांकडील गड्याने वपुंसोबत मलाही चहा दिला, घड्याळाकडे बघत असलेल्या डॉक्टरांना आग्रहाने मी चहा दिला, वातावरण अधिकाधिक खेळकर करणाऱ्या मस्त गप्पा मारत वपुंनी चहा संपवला, आपला आजार विसरून पोळ, वपुंच्या बोलण्याला, कोट्यांना खळखळून दाद देताहेत, टाळी घेण्यासाठी पुढे केलेला हात माझा आहे कि वपुंचा याकडे लक्ष न देता उत्साहाने टाळी देताहेत हे सारं मला स्पष्ट दिसत होतं. वपु माझ्या घरी आल्यावर होणारी धावपळ आठवत, काही वेळासाठी मी पोळांच्या घरचा एक सदस्य झालो. निलिमाचंही असचं काहीसं झालं होतं. या क्षणी माझ्याबरोबर बहुधा तीही पोळांकडे पोहोचली असावी. तिचा स्वर गंभीर झाला. रणांगणावरील देखावा धृतराष्ट्राला सांगताना संजयचा झाला असेल तसा.
‘तर डायलिसीसची तयारी झाली, पोळांना पलंगावर झोपवलं, सौ पोळांनी कपाटातून कथाकथनाची कॅसेट काढली आणि टेपरेकॉर्डरच्या खटक्याचा आवाज ऐकून, आतापर्यंत डायलिसीस मशीनचं सूक्ष्म निरीक्षण करत असलेले वपु अचानक पलंगापाशी आले. सौ पोळांना थांबवत म्हणाले, आज कॅसेट नाही, वपु आज स्वत: पोळांजवळ बसून नवीन कथा त्यांना सांगतील. सौ पोळ ह्बकल्याच हे ऐकून, मग भानावर येत त्यांनी गड्याला खुर्ची लावायला सांगितली, पोळांच्या डोक्याशी खुर्ची ठेवली गेली, आणि वपुंनी नम्रपणे ती खुर्ची नाकारली. सौ पोळांसाठी राखीव खुर्चीवर पोळांच्या पायाशी बसू द्यायची त्यांनी विनंती केली आणि सौ पोळ गहिवरल्या. डोळे पुसतच त्यांनी पायथ्याची खुर्ची रिकामी केली. वपुंची कथा प्रत्यक्ष त्यांचेकडून फक्त आपल्याला ऐकायला मिळणार या अवर्णनीय आनंदानं डॉक्टर, त्यांचे सहकारी, सौ पोळ प्रचंड भारावले. पोळांचं डायलिसीस सुरु झालं, त्यांच्या पायाशी वपु बसले, आपलं चिरपरिचित स्मित चेहऱ्यावर खेळवीत, धीरगंभीर आवाजांत त्यांनी कथा सांगायला सुरुवात केली.’
किस्सा सांगता सांगता नीलिमा थबकली. शब्दांची जुळवाजुळव तिला करावी लागत असावी. ‘श्रीकांत, आणि….आणि कथा सांगता सांगता वपु चक्क पोळांचे पाय चेपू लागले. चारच श्रोते, पण सारेच अंतर्बाह्य थरारले, स्वप्नातही कल्पना न करू शकणारं दृश्य आपण आज बघतोय याची जाणीव तिथल्या साऱ्यांनाच होत होती. वपुंची कथा विनोदी असूनही श्री व सौ पोळांच्या डोळ्याला धार लागली.’
किस्सा संपवताना निलिमाच्या अंगावरील रोमांच मला स्पष्ट दिसत होता. माझ्या तर संवेदनाच खुंटल्या होत्या. मागे कधीतरी वपुंशी बोलत असतां, ’माझ्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ कथाकथनाच्या प्रयोगाला फक्त चारच श्रोते हजर होते’ असं त्यांनी म्हटलेलं मला नेमकं तेव्हाच आठवलं, कधीच सुटणार नाही म्हणून मनाच्या कोपऱ्यांत दडवून ठेवलेलं कोडं अचानक उलगडलं.
माणसं समजून घेत त्यांना आनंदात ठेवण्याची सातत्याने धडपड करीत जगलेल्या या ग्रेट लेखकाच्या स्मृतीस विनम्र अभिवादन.
☆
लेखक : प्रा डॉ श्रीकांत तारे
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈