? वाचताना वेचलेले ??‍?

☆ सह्याद्री :- बाबासाहेबांच्या नजरेतून ☆ संग्राहिका – सौ.स्मिता पंडित ☆ 

babasaheb purandare felicitation ceremony: बाबासाहेब पुरंदरेंचा उद्या नागरी सत्कार; निमंत्रितांच्या यादीत 'या' दिग्गजांचा समावेश - shiv shahir babasaheb purandare turns 100 ...

(बाबासाहेब बळवंत मोरेश्वर पुरंदरे यांनी केलेले सह्याद्रीचे वर्णन … हे वाचून छातीच दडपून गेली.)

अग्नि आणि पृथ्वी यांच्या धुंद प्रणयांतून सह्याद्रि जन्मास आला. अग्नीच्या धगधगीत उग्र वीर्याचा हा अविष्कारहि तितकाच उग्र आहे! पौरूषाचा मूर्तिमंत साक्षात्कार म्हणजे सह्याद्रि!

त्याच्या आवडीनिवडी आणि खोडी पुरूषी आहेत, त्याचे खेळणे-खिदळणेहि पुरूषी आहे, त्यांत बायकी नाजूकपणाला जागाच नाही.  कारण सह्याद्री हा ज्वालामुखीचा उद्रेक आहे. अतिप्रचंड, अतिराकट, अतिदणकट अन् काळा कभिन्न. रामोशा सारखा. पण मनाने मात्र दिलदार राजा आहे तो! आडदांड सामर्थ्य हेच त्याचे सौंदर्य! तरीपण कधीकाळी कुणा शिल्पसोनारांनी सह्याद्रीच्या कानात सुंदर आणि नाजूक लेणी घातली, त्याच्या घोटीव अन् पिळदार देहाला कोणाची दृष्ट लागू नये म्हणून मराठी मुलुखाने त्याच्या दंडावर जेजुरीच्या खंडोबाच्या आणि कोल्हापूरच्या ज्योतिबाच्या घडीव पेट्या बांधल्या, त्याच्या गळ्यात कुणी सप्तशृंग भवानीचा टाक घातला, मनगटात किल्ले कोटांचे कडीतोडे घातले…

सह्याद्रीला इतके नटवले सजवले, तरीपण तो दिसायचा तसाच दिसतो– रामोशासारखा ! तालमीच्या मातीत अंग घुसळून बाहेर आलेल्या रामोशासारखा ! सह्याद्रीचा खांदाबांधा विशाल आहे, तितकाच तो आवळ आणि रेखीव आहे. त्याच्या घट्ट खांद्यावरून असे कापीव कडे सुटलेले आहेत की, तेथून खाली डोकावत नाही, डोळेच फिरतात! मुसळधार पावसात तो न्हाऊ लागला की, त्याच्या खांद्यावरून धो धो धारा खालच्या काळदरीत कोसळू लागतात आणि मग जो आवाज घुमतो, तो ऐकावा. सह्याद्रीचे हसणे, खिदळणे ते ! बेहोश खिदळत असतो.

पावसाळ्यात शतसहस्त्र धारांखाली सह्याद्री सतत निथळत असतो. चार महिने त्याचे हे महास्नान चालू असते. काळ्यासावळ्या असंख्य मेघमाला, त्याच्या राकट गालावरून अन् भालावरून आपले नाजूक हात फिरवित, घागरी घागरींनी त्याच्या मस्तकावर धारा धरून त्याला स्नान घालीत असतात. हे त्याचे स्नानोदक खळखळ उड्या मारीत त्याच्या अंगावरून खाली येत असते. त्याच्या अंगावरची तालमीची तांबडी माती या महास्नानात धूऊन निघते. तरी सगळी साफ नाहीच. बरीचशी. दिवाळी संपली की सह्याद्रीचा हा स्नानसोहळा संपतो. त्या हसर्‍या मेघमाला सह्याद्रीच्या अंगावर हिरवागार शेला पांघरतात. त्याच्या आडव्या भरदार छातीवर तो हिरवा गर्द शेला फारच शोभतो. कांचनाच्या, शंखासुराच्या, सोनचाफ्याच्या व बिट्टीच्या पिवळ्या जर्द फुलांची भरजरी किनार त्या शेल्यावर खुलत असते. हा थाटाचा शेला सह्याद्रीला पांघरून त्या मेघमाला त्याचा निरोप घेतात. मात्र जातांना त्या त्याच्या कानांत हळूच कुजबुजतात, “आता पुढच्या ज्येष्ठांत मृगावर बसून माघारी येऊ हं ! तोपर्यंत वाट पहा !”

रिकामे झालेले कुंभ घेऊन मेघमाला निघून जातात. दाट दाट झाडी, खोल खोल दर्‍या, भयाण घळी, अति प्रचंड शिखरे, उंचच उंच सरळ सुळके, भयंकर तुटलेले ताठ कडे, अस्ताव्यस्त पसरलेली पठारे, भीषण अन् अवघड लवणे, घातकी वाकणे, आडवळणी घाट, अडचणीच्या खिंडी, दुर्लंघ्य चढाव, आधारशून्य घसरडे उतार, फसव्या खोंगळ्या, लांबच लांब सोंडा, भयाण कपार्‍या, काळ्याकभिन्न दरडी आणि मृत्यूच्या जबड्यासारख्या गुहा ! —–

असे आहे सह्याद्रीचे रूप. सह्याद्री  बिकट, हेकट अन् हिरवट आहे. त्याच्या कुशी-खांद्यावर रहायची हिम्मत फक्त मराठ्यांत आहे. वाघांतही  आहे. कारण तेही मराठ्यांच्याइतकेच शूर 

आहेत ! सह्याद्रीच्या असंख्य रांगा पसरलेल्या आहेत. उभ्या आणि आडव्याही. सह्याद्रीच्या पूर्वांगास पसरलेल्या डोंगरामधील गल्ल्या फार मोठमोठ्या आहेत. कृष्णा आणि प्रवरा यांच्या दरम्यान असलेल्या गल्ल्यांतच चोवीस मावळे बसली आहेत. दोन डोंगर- रांगांच्या मधल्या खोर्‍याला म्हणतात मावळ. एकेका मावळांत पन्नास-पन्नास ते शंभर-शंभर अशी खेडी नांदत आहेत. प्रत्येक मावळामधून एक तरी अवखळ नदी वाहतेच. सह्याद्रीवरून खळखळणारे तीर्थ ओढ्या-नाल्यांना सामील होते. ओढेनाले ते या मावळगंगांच्या स्वाधीन करतात. सगळ्या मावळगंगा हे माहेरचे पाणी ओंजळीत घेऊन सासरी जातात. या नद्यांची नावे त्यांच्या माहेरपणच्या अल्लडपणाला शोभतील अशीच मोठी लाडिक आहेत. एकीचे नाव कानंदी, दुसरीचे नाव गुंजवणी, तिसरीचे कोयना. पण काही जणींची नावे त्यांच्या माहेरच्या मंडळींनी फारच लाडिक ठेवलेली आहेत. एकीला म्हणतात कुकडी, तर दुसरीला म्हणतात घोडी ! तिसरीला म्हणतात मुठा, तर चौथीला वेलवंडी ! काय ही नावे ठेवण्याची रीत ? चार चौघीत अशा नावांनी हाक मारली की, मुलींना लाजल्यासारखे  नाही का होत ? कित्येक मावळांना या नद्यांचीच नांवे मिळाली आहेत. कानंदी जेथून वाहते ते कानद खोरे. मुठेचे मुठे खोरे. गुंजवणीचे गुंजणमावळ, पवनेचे पवन मावळ, आंद्रेचे आंदरमावळ आणि अशीच काही. मावळच्या नद्या फार लहान. इथून तितक्या. पण त्यांना थोरवी लाभली आहे, ती गंगा यमुनांची. सह्याद्री हा सहस्त्रगंगाधर आहे. मावळांत सह्याद्रीच्या उतरणीवर नाचणी उर्फ नागली पिकते. नाचणीची लाल लाल भाकरी, हिरव्या मिरचीचा ठेचा आणि कांदा हे मावळचे आवडते पक्वान्न आहे. हे पक्वान्न खाल्ले की बंड करायचे बळ येते ! भात हे मावळचे राजस अन्न आहे. आंबेमोहोर भाताने मावळी जमीन घमघमत असते. अपार तांदूळ पिकतो. काही मावळांत तर असा कसदार तांदूळ पिकतो की, शिजणार्‍या भाताच्या पेजेवर तुपाळ थर जमतो. खुशाल वात भिजवून ज्योत लावा. नाजूक व सोन्यासारखा उजेड पडेल. महाराष्ट्राच्या खडकाळ काळजातून अशी ही स्निग्ध प्रीत द्रवते. मावळे एकूण चोवीस आहेत. पुण्याखाली बारा आहेत व जुन्नर-शिवनेरीखाली बारा आहेत.

मोठा अवघड मुलूख आहे हा. इथे वावरावे वार्‍याने, मराठ्यांनी नि वाघांनीच.

—शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे

संग्राहिका – सौ. स्मिता पंडित

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments