सुश्री प्रभा हर्षे
वाचताना वेचलेले
☆ थोडा अंधार हवा आहे … – लेखक : योगिया ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
हल्ली सगळ्यात मोठा प्रॉब्लेम कुठला असेल तर तो म्हणजे कधी अंधारच होत नाही. सगळीकडे इन्व्हर्टर असतात आणि अगदीच नसले तरी लोकं दुसऱ्या सेकंदाला मोबाईलचा लाईट लावतात आणि अंधार घालवतात. त्यामुळे दुसऱ्या क्षणी तुम्हाला तुमच्या पुढचं, आजूबाजूचं दिसू लागत. पण तिथेच खरा प्रॉब्लेम आहे.
मला आठवतं आहे, आमच्या लहानपणी इन्व्हर्टर, मोबाईल नव्हते. मेणबत्त्या, कंदील हे ऑप्शन होते. पण कधी रात्री लाईट गेले तर दुसऱ्या सेकंदाला आजीचा आवाज यायचा. “कोणीही जागचे हलू नका. आहे त्या जागेवर बसून आपापले डोळे २ मिनिटे घट्ट बंद करा आणि आम्ही डोळे घट्ट मिटायचो. मग २ मिनिटांनी आजीचा आवाज यायचा.. आता हळूहळू डोळे उघडा आणि आपोआप अंधारात दिसू लागेल. आणि खरंच मगास पेक्षा आता थोडं दिसू लागलं असायचं. मला अजूनही याचं अप्रूप आहे. मुळात अंधारात असताना डोळे का मिटायचे, त्याने काय होणार पण डोळे मिटून उघडले की दिसू लागायचं हे खरं. मला वाटतं की जुन्या पिढीला हीच सवय होती कि अंधारात असलो की अजून घट्ट डोळे मिटून आत डोकावायचे. स्वतःचे डोह धुंडाळायचे. आपल्या जाणिवा, नेणिवाचे झरे मोकळे करायचे आणि मग वाटा स्पष्ट होतं असाव्यात / दिसत असाव्यात. आणि आपणच शोधलेली आपली वाट असेल तर मग ती सुकर होते, त्याचं ओझं होत नाही आणि त्या वाटेवरचा प्रवास समाधान देणारा असतो.
माझ्या आजोबांचा पण लाईट गेले की एक आवडता डायलॉग होता. “अंधारात रस्ता दिसतो आणि उजेडात फक्त खड्डे दिसतात.. दिवे येई पर्यंत तुमचे रस्ते शोधा”.. लहानपणी मला हा विनोद वाटायचा पण हल्ली आजोबा आठवतात, त्यांचं वाक्य आठवतं आणि आता कुठे त्याचा अर्थ ५० वर्षांनी थोडाफार कळतो. स्वतःच्या तरुणपणी परिसस्थितीच्या अंधारात त्यांनी कष्ट सोसले, वार लावून जेवले, शिकले, नोकरी केली, आपला रस्ता शोधला. स्वतःच्या पोटाला चिमटा काढून मुलांना इंजिनिअर केलं, त्याची फळं आम्ही उपभोगतोय. कधी नव्हे तर परवा खूप वेळ लाईट गेले, इन्व्हर्टर बंद पडला तर किती चिडचिड. डेटाचा स्पीड थोडा कमी झाला आणि लॅग आला तर त्रागा. पिझ्झा अर्ध्यातासात डिलिव्हर नाही झाला तर फ्री ची मागणी. उजेडात फक्त खड्डे दिसतात हेच खरं.
पण हल्ली अंधारच होत नाही. मुळात अंधारच माहित नाही. आजूबाजूला सारखा लाईट असतो पण तो एनलायटन करू शकत नाही आणि डोळेच कघी न मिटल्यामुळे आत डोकावायची वेळच येत नाही. इन्व्हर्टर / मोबाईल च्या लाईट ने आजूबाजूचं दिसतं आणि फक्त आजूबाजूचं दिसलं तर फक्त स्पर्धा वाढते, पण वाट काही सापडत नाही. वाट सापडायची असेल तर आत डोकावता आलं पाहिजे. आपापले डोह धुंडाळता आले पाहिजेत. अंधारात तळाशी पोहोचणं सोपं होतं असावं. म्हणून अधून मधून थोडा मिट्ट अंधार हवा आहे.
लेखक : योगिया
संग्रहिका : प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈