? वाचताना वेचलेले ?

हो.. आम्ही मध्यमवर्गीय होतो..!! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. स्मिता पंडित

साधारण 20-25 वर्षांपूर्वी  “मध्यमवर्गीय” ही जमात अस्तित्त्वात होती. तसं तर संपूर्ण भारतभर ती पसरली होती, पण महाराष्ट्रात तिचा स्वतः चा असा ‘ब्रँड’ होता.

घरात एक कमावता पुरुष,दोन तीन भावंडं, नवराबायको, कुठे कुठे आजी आजोबा, क्वचित प्रसंगी भाचा-पुतण्या शिकायला अशी एकूण कुटुंबसंस्था होती. एक कमावता आणि खाणारी तोंड 5-6  हे चित्र सगळीकडे सारखंच होतं. काही ठिकाणी महिलावर्ग नोकरीसाठी बाहेर पडला होता, पण आजच्याइतका नाही.  म्हणूनच की काय घर, किचन ह्यावर स्त्रीवर्गाची सत्ता होती…..एकहाती सत्ता !! पण तिथलं तिचं स्वतःचं एक गणित होतं…पक्कं गणित..!!त्या वरच सगळे हिशोब जुळत होते.

अन्नाच्या बाबतीत,”पोटाला खा हवं तेवढं , पण नासधूस नको” असा शिरस्ता होता. माझी आजी नेहमी म्हणायची,”खाऊन माजावं, पण टाकून माजू नये.”

कढी, डाळभाजी करायची त्या दिवशी वरण कमी लावायचं, आंब्याचा रस असेल तर भाजी कमी करायची, रवी लावली की त्या ताकाची कढी करायची, त्याच तुपाच्या भांड्यात दुसऱ्या दिवशी पोळ्या टाकायच्या… अशी साधी साधी समीकरण असायची. घरातली पुरूषमाणसांची आणि मुलांची जेवणं आधी करून घेतली की बायका मागून जेवायच्या. उरलंसुरलं त्या खावून घ्यायच्या. त्यांच्या पंगतीला पुरवठा म्हणून खमंग थालीपीठ किंवा गरमागरम पिठलं असायचं. इतकंही करून पोळी – भात उरलाच तर दुसऱ्या दिवशी त्याचा व्हायचा ‘कुचकरा’ किंवा ‘फोडणीचा भात’.  जगातले सगळ्यात चविष्ट पदार्थ आहेत हे. सकाळच्या नाश्त्याचा प्रश्न परस्पर मिटायचा.

मुलांची शाळा म्हणजे ‘टेन्शन’चा विषय नव्हता. आपली साधी मराठी शाळा. 200-300 रू वर्षाची फी. पण युनिफॉर्म, पुस्तके आपले आपल्याला घ्यावे लागायचे. जरा मोठाधाटा युनिफॉर्म घेतला की सहज 2 वर्ष जायचा. 

पुस्तकांचा जरा ‘जुगाड’ असायचा. म्हणजे समजा ‘अ’ ने दुकानातून कोरीकरकरीत पुस्तकं विकत घेतली असतील, तर तो ती पुस्तकं वर्ष संपल्यावर ‘ब’ ला 70% किमतीत विकायचा.. अन् मग ‘ब’ तीच पुस्तकं  ‘क’ ला 40% मधे विकायचा.

Purchase Cost, Selling Cost, depreciated Value हे कामापुरतं “अर्थशास्र”  सगळ्यांनाच येत होतं. एकदा विकत घेतलेली पुस्तकं तीन वर्षं सर्रास वापरली जायची. 

पुस्तकाच्या या 3 वर्षाच्या प्रवासात कधी कधी बेगम हजरत महल,अहिल्याबाई अशा “दूरदृष्टी च्या” व्यक्तिमत्त्वाला चष्मा लागायचा, कोणाला दागिने मिळायचे, तर कोणाला दाढी मिशी यायची. आणि हे असे उद्योग अ ब क पैकी कोणी तरी नक्कीच करत होतं.

बंगालच्या उपसागरात हमखास दोन तीन जहाज फिरत असायची. पण शाळेत असतांना, ते मॉरिशस, अंदमान निकोबार, केरला बॅकवाॅटर अशी Destinations मला नकाशात सुद्धा कधी भेटली नाहीत.

पुस्तकातल्या रिकाम्या जागा भरा,जोड्या जुळवा अशी बिनडोक कामे सहसा ‘अ’ करून मोकळा व्हायचा… म्हणूनच की काय त्यानंतर ब आणि क ह्यांना फक्त  चित्रकलेतच “स्कोप” उरलेला असायचा. आणि त्याचा प्रत्यय पुस्तकाच्या पानापानावर यायचा…

शाळेचा युनिफॉर्म असल्यामुळे खूप कपडे लागत नसत.मोठ्या भावा बहिणींचे कपडे घालणं,त्यांचे दप्तर- स्वेटर वापरणं ह्यात ‘ इगो बिगो’ कोणाचा आड येत नव्हता..

स्वेटरचा तर मोठा प्रवास असायचा.. त्यातही लहान बाळाचं स्वेटर,कपडे,दुपटे,झबले इतके फिरायचे की त्याचा मूळ मालक कोण हेही कोणाला अाठवायचं नाही..

पण आमच्या आधीच्या पिढीने शिक्षणाचे महत्त्व जाणले होते. त्यामुळे अभ्यास सगळ्यांना करावाच लागायचा. मुलींना “यंदा नापास झालीस किंवा कमी मार्क्स मिळाले तर तुझं लग्न लावून देवू..” आणि मुलांना, “तुला रिक्षा  घेवून देवू चालवायला” अशी  “जागतिक” धमकी मिळायची..

12 वी नंतर कुठल्या शाखेकडे जायचं, कोणता कोर्स करायचा, घरातल्या मोठ्या दुरुस्त्या, उपवर-उपवधू ह्यांना आलेली स्थळं ….Proposals.. हे आजच्या काळातले  “Highly Personal Issues”  त्या काळात बिनदिक्कतपणे गोलमेज परिषद भरवून चर्चिले जात. हातपाय पसरायला लागते, तेवढीच काय ती प्रत्येकाला घरात  Space.. …बाकी सगळा ‘लेकुरवाळा’ कारभार!!

आठवडी बाजारातून भाज्या आणणे, किराणा आणणे, लांबच्या लग्नाला हजेरी लावणे हा ‘बाबा’ लोकांचा प्रांत होता.प्रत्येक बाबांच्या तीनचार तरी  RD , LIC काढलेल्याच असायच्या…..आणि  त्यासुद्धा बहुतेक वेळा एजंटवरील प्रेमापोटी !!! बाकी शेअर्स, Mutual Fund वगैरेचा ‘एजंट’ त्या काळी उदयाला आलेला नव्हता.आणि कोणी काही वेगळ्या स्कीम आणल्याच, तर अगदी पाचच मिनिटात त्याच्या उत्साहाला अन् पर्यायानं त्याच्या कमीशनला सुरुंग लागायचा… Share market म्हणजे जुगार.. हा ‘समज’ अगदी पक्का होता..

‘फॅमिली डॉक्टर’ हा एक जिव्हाळ्याचा विषय होता. प्रत्येक कुटुंबाचा वेगळा डॉक्टर असायचा. आजीच्या दम्यापासून ते बाळाच्या तापापर्यंत सगळ्या व्याधीवर त्याच्याकडे औषध असायचे. तसे ते डॉक्टर पण ‘नीतिमत्ता’ वगैरे बाळगून होते. उगाचच आजच्या सारखं भारंभार टेस्ट अन् सोनोग्राफी करायला सांगायचे नाहीत.. गरज असेल तरच करूया,  पेशंटला परवडेल आणि ह्यांचा दवाखाना पण चालेल, असा त्यांचा ‘व्यावहारिक’ पवित्रा असायचा.

जसा ‘फॅमिली डॉक्टर’ तशीच एक फॅमिली ‘बोहारीण’ पण असायची. पण ती फक्त आईची मैत्रीण.. बाकी कोणी तिच्या वाट्याला जात नसत.. आई सगळे जुने कपडे एका गाठोड्यात बांधून ठेवे. मग ही  ‘बोहारिण’ एका दुपारी अवतरायची.. आधीच दुपारच्या झोपेचं खोबरं झाल्याने, आई  जरा वैतागलेली असायची.. भलं मोठं कपड्यांचं गाठोडं विरुद्ध चहाची गाळणी अशी ‘तहा’ ला सुरवात व्हायची..तिची गाळणी खपवायची घाई….तर आईचा मोठ्या पातेल्यावर डोळा!!! खूप घासाघीस करून  ‘Deal’ चहाच्या पातेल्यावर फिक्स व्हायची.. ह्या  कार्यक्रमात 2-3 तास आरामात जायचे, शेजारच्या सगळ्या आत्या, मावशी, काकू ह्या वाटाघाटीत सक्रिय सहभाग घ्यायच्या.शेवटी त्या नवीन चहाच्या पातेल्यात चहा व्हायचा आणि मगच सगळं महिला मंडळ परागंदा व्हायचं..

खरं सांगू का.. …मध्यमवर्गीय ही काही ‘परिस्थिती’ नाहीये, ती  “वृत्ती” आहे……साध्या, सरळ, कुटुंबवत्सल, पापभीरू माणसांची. मध्यमवर्गीयच आहेत ह्या समाजाचा ‘कणा’.. ते आहेत म्हणून तर ह्या समाजात चांगल्या वाईटाची चाड आहे.. आम्हीच आहोत नियमित ‘कर’ भरणारे, वाहतुकीचे काटेकोर ‘नियम’ पाळणारे आणि प्रत्येक निवडणुकीत ‘मतदान’ करणारे.

असे आम्ही सगळेच मजेत होतो बघा..अचानक 1990-91 मध्ये जागतिकीकरणाचे वारे वाहू लागले.. ते आमच्यापर्यंत यायला 10-12 वर्षे गेली पण तोपर्यंत त्या वाऱ्याचं  ‘ वादळ ‘ झालं होत.. अन् मग त्या वादळात उडून गेलं आमचं मध्यमवर्गीयपण..

प्रेमळ, मिळून-मिसळून राहणारे, सामाजिक बांधिलकी जपणारे आम्ही……अचानक ‘प्रोफेशनल’ झालो. माणसामाणसातलं आपलेपण कोरडं झालं. कालांतराने ते भेगाळलं.

पुढे पुढे त्या भेगांच्याच भिंती झाल्या.Busy Schedule, Deadlines, Projects Go Live अश्या ‘गोंडस’ नावाखाली आम्ही ते स्वीकारलं. गलेलठ्ठ  Packages  मधे गुंडाळल्या गेला आमच्यातला चांगुलपणा, प्रेमळपणा आणि आपलेपणा सुद्धा…

कवी :अज्ञात

प्रस्तुती : स्मिता पंडित 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments