📖 वाचताना वेचलेले 📖

☆ रिकामटेकडीलेखिका :श्रीमती स्नेहल अखिला अन्वित ☆ प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर 

जवळजवळ दोन वर्षांनी लांबच्या शहरात राहणारे काका काकू आले म्हणून प्राजक्ता मनातून खूपच आनंदी होती. आणि तिची मुले, त्यांचे आवडते मामा मामी आले म्हणून! काका काकू अगदी सहकुटुंब आले होते प्राजक्ताच्या घरी.

तिला तर काय करू अन् काय नको, असं झालं होतं. लहानपणी काही वर्ष एकत्र कुटुंबातच वाढली असल्याने, काकू म्हणजे तिच्यासाठी दुसरी आईच होती जणू. त्यांच्या मुलाबरोबरच वाढली होती प्राजक्ता. त्यामुळे अगदी सख्ख्या भावंडासारखंच प्रेम होतं. प्राजक्ता दहावीत गेल्यावर मात्र तिच्या वडिलांची बदली झाली आणि नंतर हळूहळू कुटुंबातली सगळीच माणसं वेगवेगळ्या दिशेनं पांगली.

पण ओढ मात्र तशीच राहिली.

त्याच ओढीनं एकमेकांकडे जाणं येणं होत होतं.

म्हणूनच दिवाळीनंतर काका काकू आपल्या मुलाला आणि सुनेला घेऊन चार दिवस प्राजक्ताकडे राहायला आले होते.

आल्यादिवशी संध्याकाळी प्राजक्ताने मस्त भरल्या वांग्याची भाजी केली आणि सर्वांसाठी जवळच असणाऱ्या पोळीभाजी केंद्रातून मस्त खरपूस गरमागरम भाकरी आणल्या. सर्वांची छान जेवणं झाली.

दुसऱ्या दिवशी सकाळी पोळ्यांना बाई आली. चहा पाणी झाल्यावर, दोन्ही घरचा दिवाळीचा फराळ खाल्ल्यावर प्राजक्ता सर्वांशी गप्पा मारत बसली असता तिचा भाऊ म्हणाला, नाष्ट्याला कर काहीतरी पोहे, उप्पीट.

प्राजक्ताला कळेना,आत्ता फराळ झाला, परत का नाष्टा? पण कधीतरी आलेल्या पाहुण्यांना नको कशाला बोला, म्हणून तिने गरमागरम उप्पीट केलं.

ते झाल्यावर गप्पा टप्पा करतच प्राजक्ताने भाजी, कोशिंबीर केली. गुलाबजाम त्यांच्या एरियातल्या प्रसिद्ध हलवाईकडून आणले होते. खास आपल्या माणसांसाठी म्हणून!

पोळ्या बाईने केलेल्या होत्या म्हणून पटकन जेवण तयार झालं सुद्धा. वहिनीला तर तिने स्वैपाकघरात फिरकूसुद्धा दिलं नाही.

मुलांना मामा मामी भेटले होते, म्हणून प्राजक्ताला जे हवं ते मनसोक्त करू दिलं त्यांनी.

दुपारची जेवण आटोपली. पाहुणे आडवे झाले. प्राजक्ताच्या घरी दुपारी झोपायची सवयच नसल्याने ती मुलांबरोबर खेळत राहिली.

संध्याकाळी सर्व मस्त बाहेर फिरून आले. सकाळच्या पोळ्या उरल्या होत्या, प्राजक्ताने विचारलं पोळ्या तर आहेत, भाजी कोणती करू?

तर तिचा भाऊ पटकन म्हणाला, पोळ्या नको भाकरी कर.

प्राजक्ता म्हणाली,भाकरी खायचीय का तुला?

ठीक आहे, मी आणते कालच्यासारखी.

छे, छे बाहेरच्या नको. तू कर……

अरे पण तुला काल तर आवडल्या होत्या त्या भाकरी?

हो. पण तू कर की. मी कालपासून बघतोय. तू काहीच करत नाहीस घरात. तू करून दे आम्हाला भाकरी…….

प्राजक्ताला खरंतर रागच आला होता, त्याच्या बोलण्याचा. तरी तो गिळून ती म्हणाली, मी नाही करत भाकरी. मला येतही नाहीत. एवढे फिरून आलो आपण, आता कुठे भाकरी करत बसू? आणि जवळच तर मस्त गरमागरम मिळतात. मी का कष्ट घेत बसू उगाच? लागेल तेव्हा आणते मी.

तेवढ्यात काकू म्हणाली, “पोळ्या तुझी बाई करते. धुण्याभांड्यालाही बाई आहे. घरातली कामं सगळ्यांना वाटून टाकलीयेस. अगं, नवराही ऑफिसवरून आल्यावर काम करतो तुझा, अगदी मुलीलाही काम लावलंयस. तू काही करताना दिसतच नाहीस. त्यातून तू घरातच आहेस.आमची सुनबाई बरी की. ती तर ऑफिसला जाऊनही स्वैंपाकासकट किती कामं करते!”

“अगं काकू, घरातली कामं घरातल्या सर्वांनी वाटूनच करायची असतात. ज्याला त्याला त्याचं आवडतं काम दिलंय. ते त्यांच्या सवडीने करतात. कुणावर काही जबरदस्ती नाही केली मी. नवरा ऑफिसवरून आल्यावर काम करतो, तर ते त्याला आवडतं म्हणून. मुलीने तर हौस म्हणून मागून घेतलंय. घरी आहे म्हणून मीच सर्व केलं पाहिजे असं कुठे लिहिलंय?”

“पण बाईच्या जातीला असं नुसतं बसून राहणं शोभतं तरी का?” काकूला तर पटलंच नाही तिचं बोलणं.

“अगं काकू , तुला कुणी सागितलं, मी नुसतं बसते. माझे मला उद्योग आहेत चिक्कार!

आता तुम्ही आलात म्हणून मी तुमच्याबरोबर माझी रोजची कामं सोडून गप्पा मारत बसलीये एवढंच. उलट तुम्हाला तर छान वाटलं पाहिजे. पाहुणे आलेत म्हणून स्वतःला स्वैपाकघरात गाडून न घेता मी तुमच्याबरोबर एन्जॉय करतीये म्हणून!

इकडे येऊन पण तुम्ही एकमेकांची तोंडं बघत बसलात तर फायदा काय? मला भेटायला आलात ना प्रेमाने. मग मीही तुमच्याबरोबर राहून, तुमच्याबरोबर सतत गप्पा मारून तुमचे आणि माझे चार दिवस सुखाचे करतीये तर त्यात काय चुकलं माझं?

आता तुम्ही आल्यावर मी माझी कामच करत बसले तर काय म्हणाल, बघा आम्हाला बोलावलं आणि तिच्याकडे काही वेळच नव्हता आमच्यासाठी!”

तेवढयात तिचा भाऊ म्हणाला, “पण कामं तर काही दिसतच नाही तुला. रिकामटेकडीच तर बघतोय दोन दिवस.”

“दादा, मी रिकामी दिसतेय कारण मुलं तुमच्यामागे आहेत. पाहुणे आल्याचा त्यांना आनंद झालाय, म्हणून त्यांनी मला सोडलंय. तुम्ही सकाळी सातला उठताय. मी ही अगदी तेव्हाच उठते रोज. चहा पाणी करते. पटकन भाजी टाकते. पोळ्या बाई करते. तेवढा वेळ मिळतो त्यात मी व्यायाम, योगा करते माझ्यासाठी. मग मी माझी आवडती पुस्तकं वाचते. कधी आवडती गाणी ऐकते. माझा वेळ मी हवा तसा घालवते. अगदी मोजके दीड-दोन तास मिळतात रे मला माझ्यासाठी. नऊला मुलं उठली की चक्र सुरू होतं माझं. मग त्यांचं सर्व झालं की चार वाजल्यापासून मी ऑनलाईन क्लासेस घेते आठवी ते दहावीच्या मुलांचे संस्कृतचे. ते अगदी आठपर्यंत चालतात. ते संपल्यावर मुलं इतका वेळ मी बिझी होते, म्हणून खेळायला सांगतात त्यांच्याशी. त्यांना मी त्यांच्याबरोबर रहावी, वाटतं . मग त्यांना बाजूला सारून स्वैपाकपाणी करत बसणं, त्यासाठी जिवाची मारामारी करणं, नाही पटत मला. सुटसुटीत मोकळं राहायला आवडतं मला. आणि अगदी घरच्या चवीची भाजी भाकरी गरमागरम मिळते बाजूलाच, तर का उगाच करत बसू मी?

भले घरी असते, घरातून थोडं बहुत काही करते, म्हणून रिकामं मोकळं राहायचा अधिकार नाही का मला? मला आवडतं, आणि माझ्या घरी सर्वाना चालतंही.

“उद्या आमची सुनबाई म्हणाली असं तर आम्हाला नाही चालणार मात्र,” काका मधेच म्हणाले.

“तुम्ही थोडा तिच्या बाजूने विचार केलात तर नक्की चालेल तुम्हालाही. अर्थात तिची तशी इच्छा असेल तरच.

काय रे दादा, तू विचारलं का तिला कधी?”

“मला हे तुला असं बघूनच त्रास होतोय, तर ती ही अशी वागली तर काय होईल! ए, तू हिला शिकवू नको बाई असलं काही.”

“मी कशाला शिकवू, दादा? आपली मतं कुणावर लादता येतात का कधी? जो तो स्वतःच्या अनुभवाने शिकतो. जमलं तर बदलतो नाहीतर मन मारून जगतो वर्षानुवर्ष.

आता तुम्ही आलात म्हणून माझं रुटीन थांबवलंय मी. सगळा वेळ तुमच्यासोबत घालवतेय. क्लासला चक्क सुट्टी दिलीये मी तुम्ही असेपर्यंत!

तर तुम्हाला माझं रिकामपण टोचायला लागलंय.”

“आम्हाला बघायला वेगळं वाटतं असं,” काकू नाराजीने म्हणाली.

“वेगळं कुणाला पटकन पचत नाही, हे खरं. बघणाऱ्या बाईला नाही आणि पुरुषाला तर नाहीच नाही.

वर्षानुवर्षे बाईला कामात गढलेलीच बघायची सवय ना डोळ्यांना. मोकळेपण डोळ्यात सलतं बाईचं. मोकळ्या मनाने मोकळी राहू देणारच नाहीत कोणी तिला. बोलण्यातून नाहीतर नजरेतून घायाळ करणारच तिला.” प्राजक्ताने आपली बाजू मांडायचा केलेला प्रयत्न फारसा कोणाला रुचलाच नाही. ते त्यांना स्वतःच्या सोयीचं वाटलं नसावं बहुतेक, म्हणून प्राजक्तानेही पुढे जास्त बोलणं टाळलं.

पाहुण्यांचे चार दिवस संपले, तसे ते निघाले. जाताना मात्र प्राजक्ताच्या भावाच्या बायकोने आजूबाजूला कोणी नाही बघून तिला हाताला धरून ‘Thank you’ म्हटलं.

 “चार दिवस मी जो मोकळेपणा अनुभवला तुमच्याकडे तो बाकी कुठेच कधी अनुभवला नाही, अगदी माझ्या माहेरी पण. जरा निवांत बसले, की कुणाच्या ना कुणाच्या डोळ्यात खुपायचंच हो! काही ना काही करत राहणारी बाईच आवडते सर्वांना. जरा बसली की नावं ठेवणं सुरू, मग ते घरचे नाहीतर दारचे कोणी का असेना!

सध्या तरी माझी मानसिक तयारी नाही कुणाच्या विरोधात जाण्याची, पण हळूहळू झाली की मला आवडेल तुमच्यासारखं रहायला!”

प्राजक्ताने गोड हसून तिला निरोप दिला. ‘सर्वांनाच जमणाऱ्यातलं नाही ते,’ असं मात्र आवर्जून मनात वाटलंच तिला.

लेखिका :श्रीमती स्नेहल अखिला अन्वित

प्रस्तुती :सौ. रेखा जांबवडेकर

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments