सौ. मंजुषा सुनीत मुळे
वाचताना वेचलेले
☆ “माझी पहिली देवी…” – लेखक – अज्ञात ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
अन्नपूर्णेमध्ये पहिली देवी आपली आई!
आज जेव्हा आपण वयस्कर व्हायला लागलो, तेव्हा कळतं की आईने आपल्याला बिनतक्रार, किती कष्ट करून, रांधून खाऊ घातलं! घरात माणसं भरपूर. एकत्र कुटुंबपद्धती. येणारा पैसा तुटपुंजा. पण त्याही परिस्थितीत तिने सगळ्याची सांगड घालून आपल्याला चटणी, कोशिंबीर, भाजी, आमटी, भाकरी- पोळी असे रोजचे सुग्रास जेवण दिले. त्याकाळी इडली- वडे नव्हते. पण त्यातल्या त्यात जे नवनवीन करता येईल ,—-कधी सांजा, कधी उपीट, कधी गोडाचा शिरा, कधी थालीपीठ, धपाटी, डाळफळ, उपवासाची खिचडी भात, तांदळाची खिचडी, पोह्याचे पापड, उडदाचे पापड, तांदळाचे पापड, भरली मिरची, लोणच्याचे अनेक प्रकार, चिवडा, लाडू, साध्या पिठाचे लाडू….. किती सुंदर करत होती ते!
कोणतीही गोष्ट तिने वाया घालविली नाही. दुधाचे साईचे पातेले स्वच्छ धुऊन ते कणकेत मिसळले. बेरी काढून, त्यातच कणीक भाजून, साखर घालून त्याचे लाडू केले. भाकरीच्या उरलेल्या छोट्याशा पिठात थोडेसे डाळीचे पीठ घालून शेवटचे धिरडे म्हणजे पर्वणी असायची. त्याशिवाय सणावाराला होणारे वेगवेगळे पदार्थ, चारीठाव स्वयंपाक, गरमागरम पुरणपोळ्या, आटीव बासुंदी, श्रीखंड– घरच्या चक्क्याचे–, खरवसाच्या वड्या–, कणसाची उसळ, वाटल्या डाळीची उसळ…. आपण केलेल्या भोंडल्यासाठी केलेले दहा दिवसाचे विविध प्रसादाचे पदार्थ… हे सगळं करताना तिच्याजवळ श्रीमंती नव्हती. पण कोंड्याचा मांडा करण्याची युक्ती मात्र होती आणि मनामध्ये इच्छाशक्ती होती. कोणताही पदार्थ बाहेरून मागवल्याचे कधी आठवत नाही. कारळ, जवस, शेंगदाणे यांच्या चटण्या सदैव डबा भरून घरात असत.भरली मिरची, कांद्याचे सांडगे, कोंड्याच्या पापड्या… किती पदार्थाने घरातले डबे भरलेले असायचे!
खरंच या सर्व माउलींनी आपलं सगळं आयुष्य घराला जपण्यात घालवलं. त्या सगळ्या अन्नपूर्णांना आज साष्टांग दंडवत ! त्यामुळे आपण सुदृढ, उत्तम विचारांचे, बळकट मनाचे झालो. अगदी टोपलीभर भांडी आणि बादलीभर धुणं पडलं तरी चिंता न करता खसाखसा घासून मोकळे होणारी, कधीही कुठेही न अडू देणारी सुदृढ पिढी झालो, ही त्या माऊलींची पुण्याई आहे!
अन्नपूर्णांनो, तुम्ही होतात, म्हणून आम्ही अंतर्बाह्य सुदृढ झालो. तुम्हाला पुन्हा एकदा साष्टांग दंडवत!
लेखिका :अज्ञात
संग्राहिका: सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈