डॉ. ज्योती गोडबोले
वाचताना वेचलेले
☆ वटपॊर्णिमा तुझी… कवयित्री : सुश्री संजीवनी बोकील ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले ☆
☆
मैत्रिणींसारखी सज धज
नव्या पैठणीची घडी मोड
नाजूक कलाकुसरीचे दागिने घाल अंगभर
पण आरशात बघशील
स्वतःकडे
ते तुझ्या नजरेनं,
तुझ्यासाठी,
माझ्या नाही…..
दुसऱ्यासाठी सजवणं
हा अपमानच तुझ्या
आभूषणांसाठी !!
*
असणं सिद्ध केल्यावर
दिसणं सिद्ध करायचा
हा आटापिटा कशासाठी ?
गळ्याला काचणा-या,
बोटांना रुतणाऱ्या,
कानांना टोचणाऱ्या
या दागिन्यांपेक्षा
तुला- मला सुखवणारे किती दागिने
आहेत ना आपल्यापाशी?
*
चढावर बळ देणारा तुझा धीर,
उतारावर थोपवणारा माझा संयम,
होडी बुडत असताना
आलटून पालटून मारलेल्या
वल्हयातील इच्छाशक्ती….
माझ्या आधी तुला वाचवण्याची
माझी असोशी….
तुझ्यापेक्षा माझ्या उपाशी पोटानं
तुझी कासाविशी….
जिव्हाळ्याच्या एकाच विहिरीत सापडणारे
किती किती अस्सल मोती…!
*
वडाच्या फेऱ्यांपेक्षा
घाल मला बाहूंची मिठी
आणि माझा विळखा
तुझ्या कमरेभोवती….
*
सवाष्ण म्हणजे सवे असणं
मध होऊन दुधात राहणं
सात जन्म पाहिलेत कोणी
साथ निभावण्याची शपथ घेऊ…
माझ्यासाठी तू धागा
तुझ्यात मला गुरफटून घेऊ…
*
तू आधाराचा पार
बांध माझ्या भोवती,
पारंबी होऊन मी
झेपावेन तुझ्यासाठी…
*
अंगण असेल तुझ्या
आरस पानी हृदयाचे,
पौर्णिमा होऊन
बरसेन मी तिथेच…
अवतीभवती !
☆
कवयित्री : संजीवनी बोकील
संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈