सौ. गौरी गाडेकर
वाचताना वेचलेले
☆ क्षणभर – लेखिका : सौ. कांचन दीक्षित ☆ प्रस्तुती – सौ. गौरी गाडेकर ☆
हल्लीच्या काळात चोवीस म्हणजे तसं फारच लवकर लग्न झालं होतं तिचं. कोकणातल्या एका गावात , खटल्याच्या घरात राहत असलेली ती. माहेरी नारळी पोफळीच्या बागा, अस्सल हापूस दारात आणि घरामागे समुद्राची गाज. एकत्र कुटुंब असल्याने तिला भरपूर लोकांची सवय होतीच पण घरात लहान असल्याने स्वयंपाक घरात जायची फार वेळ आली नव्हती.
तिचं लग्न होऊन ती गेली जवळच्याच गावात. अंतराने जवळ असलं तरी शेवटी दुसरं गावच. इथे प्रत्येक गावाची वेगळी पद्धत. नवीन गावाहून आलेल्या मुलीला बघायला पुर्ण गाव येणार आणि बायका अगदी बारीक निरखून बघणार तिला. कोणी कौतुकाने, कोणी असुयेने तर कोणी असच मायेने.
लग्नानंतर आलेला पहिलाच सण गुढी पाडव्याचा. दोन दिवस आधी बेत ठरला. गोणीतून समान काढून झालं. आंब्यांची रास लागली. दुसऱ्या दिवशी कोणी कधी उठून काय काय करायचं याची उजळणी झाली. ती नवीन नवरी असल्याने तिला अर्थात च लिंबू टिंबू कामे दिली होती, पण ही लगबग तिला नवीन नव्हती.
जसा पाडवा जवळ आला तशी ती वेगळ्याच चिंतेने ग्रासली. ते एकमेव कारण ज्यामुळे तिला या पंक्ती च जेवण अजिबात आवडत नसे, ते म्हणजे बायकांची पंगत बसेपर्यंत होणारी उपासमार!
लहान होती तेव्हा मुलांच्या पंगतीत तिचं जेवण व्हायचं, पण मोठी झाल्यावर तिलाही थांबावं लागायच च. सकाळपासून तयारीची गडबड, स्वयंपाक घरातल्या धुराने चुरचुरणारे डोळे, वाढताना वाकून वाकून दुखायला लागलेली कंबर याने ती अगदी वैतागून जायची. बायकांची पंगत बसायला जवळ जवळ चार वाजायचे, मग समोर यायच्या गार भजी, उरलेल्या मोडक्या कुरडया, तळाशी गेलेला रस आणि कोमट अन्न. कितीही सुग्रास असलं तरी दमल्याने, भूक मेल्याने आणि गार अन्नाने तिची खायची इच्छा मरून जायची.
तिथे तरी आई मागे भुणभुण करता यायची. इथे? भूक तर सहन होत नाही आपल्याला, मग काय करायचं? असो, होईल ते होईल म्हणत ती झोपी गेली.
सकाळी पाच वाजता बायका उठल्या. अंगणात सडा पडला, दोन धाकट्या नणंदा रांगोळी काढायला बसल्या. सगळ्यांना चहा फिरला आणि बायका जोमाने स्वयंपाक घरात कामाला लागल्या.चटणी , कोशिंबीर, पापड, गव्हल्यांची खीर, कुरडया, भजी , कोथिंबीर वडी,बटाटा भाजी,मटकी उसळ, पोळ्या, पुऱ्या, वरण भात , रस, रसातल्या शेवया आणि नावाला घावन घाटलं. पटापटा हात चालत होते. फोडण्या बसत होत्या. विळीचा चरचर आवाज येत होता. खमंग वास दरवळत होते.
हिने दोन चार सोप्या गोष्टी करून मदत केली.अध्येच पोहे फिरले. वाटी वाटी पोहे असे काय पुरणार? पण पोटाला आधार म्हणून खाल्ले.
बारा वाजत आले. नैवेद्याचे ताट तयार झाले. देवाचा , वास्तूचा, गायीचा, पितरांचा नैवेद्य वाढला गेला.
आता पंगती बसणार! ती तयारीतच होती. माजघर पुन्हा एकदा केरसुणीने स्वच्छ झाले. ताटे मांडली, रांगोळ्या घातल्या गेल्या. पोरी सोरींनी लोटी भांडी ठेवली.
मुलांची पंगत बसली. अर्धेमुर्धे खाऊन मुले उठली. तिने खरकटे काढले आणि माजघर पुसून घेतले. पुन्हा ताट मांडली, रांगोळ्या काढल्या.
आणि आतून सर्व पुरुष मंडळी आत आली. “चला सर्व अन्नपूर्णा !” आजे सासर्ऱ्यांचा दमदार आवाज आला तशा सगळ्या जणी बाहेर आल्या. “बसा पानावर” ते म्हणाले.
ही गांगरलीच ! हे काय वेगळंच? आता पुरुष मंडळींची पंगत असते ना?
पण सगळ्या बायका जाऊन पानावर बसल्या. हिलाही सासूबाईंनी हाताने खूण केली. ही पण अवघडून एका पानावर जाऊन बसली.
आजे सासर्ऱ्यांनी तिथूनच सर्वांना नमस्कार केला आणि पान सुपारी ठेवली.
“आज काय आणि रोज काय, पण या अन्नपूर्णा आपल्यासाठी जेवण रांधतात आणि आपल्याला गरम जेवू घालतात. म्हणून आजचा मान त्यांचा. त्यांनी केलेले गरम अन्न आधी त्यांना मिळावे म्हणून हा खटाटोप. अर्थात तो गरम घास आधी आपल्याला मिळावा हीच त्यांची धडपड असते पण आज आपण त्यांना आग्रह करायचा. सूनबाई, तुला माहित नसेल म्हणून सांगतो” ते तिच्याकडे बघत म्हणाले “तुझी आजे सासू एकदा अशीच उपाशी पोटी चक्कर येऊन पडली सणाच्या दिवशी. तेव्हा कुलदेवी स्वप्नात येऊन म्हणाली की जी अन्नपूर्णा राबते ती उपाशी राहून कशी चालेल? तेव्हापासून प्रत्येक पंगत ही पहिली मुलांची आणि दुसरी बायकांची असते आपल्याकडे!”
ती स्तिमित राहून ऐकत होती.
इतक्यात खड्या थरथरत्या आवाजात “वदनी कवळ घेता” सुरू झाले. “रघुवीर समर्थ” चा घोष झाला आणि जेवणं सुरू झाली. मागून मुलं, पुरुष एक एक वाढायला आली. आग्रह कर करून भजी, रस वाढला जात होता. ती अजूनही धक्क्यातच होती ! गरम गरम पोटभर जेवण झालं आणि आपसूकच तिच्या तोंडून उद्गार निघाले
“अन्नदाता सुखी भव !”
लेखिका : सुश्री पूजा खाडे पाठक
संग्राहिका : सौ. गौरी गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈