डॉ. ज्योती गोडबोले

📖 वाचताना वेचलेले 📖

☆ जेथे गुणांची पारख नाही तेथे गुणी जनांनी जाऊ नये… लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – डॉ. ज्योती गोडबोले  

एक छान संस्कृत सुभाषित आहे आणि त्याला साजेशी जी एं ची एक भन्नाट कथा…

रे राजहंस, किमिति त्वमिहागतोऽसि?

योऽसौ बकः स इह हंस इति प्रतीतः।

तद्गम्यतामनुपदेन पुनः स्वभूमौ

यावद्वदन्ति न बकं खलु मूढलोकाः॥

हा हंसान्योक्ति अलङ्कार

हे राजहंसा, तू इथे आलास कशाला? इथे तर हा जो बगळा आहे त्यालाच हंस समजतात. तेव्हा जोवर हे मूर्ख लोक तुला बगळा म्हणत नाहीत तोवरच तू तुझ्या मायभूमीला जा कसा!

(जेथे गुणांची पारख नाही तेथे गुणी जनांनी जाऊ नये. )

जी. एन च्या ‘ काजळमाया ‘ मधील एक कथा….

एकदा असंख्य कावळे मानस सरोवराजवळ जमले. त्या ठिकाणी शुभ्र पंखांचा, लाल चोचीचा एक हंस आपल्या हंसीबरोबर जलक्रीडा करत होता. कावळ्यांनी एकदम कलकलाट केला नि त्यांनी हंसास मानससरोवर सोडून जाण्यास सांगितले, कारण त्यांच्या आगमनाच्या क्षणापासून मानससरोवरावर त्यांची सत्ता चालू झाली होती.

“अनादिकालापासून मानससरोवर हंसांसाठीच आहे.” हंस म्हणाला.  ‘शिवाय तुम्हाला पोहता येत नाही, तर मानससरोवर हवे कशाला?”

“आम्हाला पोहता येत नसेल, पण त्याचा आणि स्वामित्वाचा काय संबंध आहे? आपल्या सत्तेची नृत्यशाला अथवा गायनशाला असेल तर आपल्याला नृत्य-गायन आलंच पाहिजे असं कोठे आहे?” कावळ्यांच्या नेत्याने राजकारणी हसून विचारले. हा नेता मोठा व्युत्पन्न होता व त्याने कृष्णद्वीपात जाऊन न्याय नि राजनीतीचा प्रगाढ अभ्यास केला होता.

“आणि आत्ताच्या आत्ता तू मानससरोवर सोडून गेला नाहीस, तर आम्ही सगळे तुझ्यावर तुटून पडू व तुझा आणि तुझ्या निवासस्थानाचा पूर्ण नाश करू!” एका तरुण कावळ्याने गर्जून सांगितले. परंतु त्याच्या या कर्कश शब्दांनी नेत्यास क्रोध आला व त्याचे संस्कारित मन फार व्यथित झाले. त्याने आपल्या उतावीळ अनुयायांस गप्प बसवले. अशा तर्‍हेच्या आततायी उपायांची योजना आता रानवट झाली होती आणि तिला कृष्णद्वीपात स्थान नव्हते. त्याने पुन्हा सौजन्यपूर्वक हसून म्हटले “आपलं म्हणणं मला मान्य आहे. मानससरोवर हे हंसांसाठीच आहे. ही आपली प्राचीन परंपरा मला अढळ राखायची आहे. उलट त्या पवित्र परंपरेच्या सामर्थ्यशाली आश्रयाने मला मातृदेशाची कीर्ती वृद्धिंगत करायची आहे. पण त्यासाठी ‘हंस कोण’ हे आधी ठरलं पाहिजे. आपण हंस आहात कशावरून?”

हंसाला या प्रश्नाचाच मोठा विस्मय वाटला. त्याने आपल्या शुभ्र पंखांकडे पाहिले. त्याला जलातील प्रतिबिंबात आपली डौलदार मान, तिच्या अग्रभागी असलेली कमलदलासारखी लाल चोच दिसली. पण आपणच हंस आहो हे सांगण्यास त्याल प्रमाण सुचेना. कावळ्यांचा नेता नम्रपणे हसला. तो म्हणाला “तेव्हा आपण त्या प्रश्नाचा प्रथम निर्णय लावू. येथे उपस्थित सर्वांना आपण एकेक पान आणावयास सांगू. जर आपण हंस असाल तर त्यांनी ‘लाल’ पान आणावं. जर त्यांना मी हंस आहे असा विश्वास असेल तर त्यांनी हिरवे पान आणावं.” “पण या ठिकाणी कावळेच संख्येने जास्त आहेत.” हंसी म्हणाली. “देवी, आपले शब्द सत्य आहेत. पण तो आमचा का अपराध आहे?” नेता विनयाने म्हणाला.

थोड्याच वेळात तिथे हिरव्या पानांचा ढीग जमला. हंसीने जाऊन कमळाची एक अस्फुट कळी आणून ठेवली.

कावळ्यांचा नेता म्हणाला “पाहिलंत. न्यायनीतीनुसार निर्णय होऊन मी हंस ठरलो आहे. हे इतर सारे माझेच आप्तगण असल्याने अर्थात ते देखील हंसच आहेत. आणि आता आपणच मान्य केलंत की मानससरोवर हंसांसाठीच आहे. तेव्हा आता तुम्ही येथून जावं हेच न्यायाचं होईल.”

हंस खिन्न होऊन सरोवराबाहेर आला. हंसीने त्याचे सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. “प्रिया तू खिन्न का?” ती म्हणाली. “पानांच्या राशीने का हंसत्व ठरत असतं? चल, आपण येथून जाऊ. तू ज्या जलाशयात उतरशील ते मानससरोवर होईल. जेथे तू दिसशील ते तीर्थक्षेत्र ठरेल.”

हंस हंसीबरोबर जाण्यासाठी उठून सिद्ध झाला. तोच वेगाने उडत चाललेल्या सुवर्णगरुडाशी त्याची भेट झाली. त्याने विचारले की “हंस म्हटला की त्याचे मुख मानससरोवराकडे असायचे. पण तू असा विन्मुख होऊन कुठं चाललास?” मग हंसाने सारी हकीकत सांगताच गरुडाच्या अंगावरील पिसे उसळली व डोळ्यात अंगार दिसला.

“मित्रा, मी गरुड आहे की नाही हे पानं गोळा करून ते क्षुद्र ठरवणार? माझ्या चोचीचा एक फटकारा बसला की त्या गोष्टीचा तात्काळ निर्णय होत असतो. त्या क्षुद्रांची तू गय करणार? जा आणि आपल्या देवदत्त मानससरोवराकडे पाठ वळवू नकोस. उद्या हेच कावळे पानांचे भारे जमा करत माझ्या नंदादेवी कांचनगौरीवर अधिकार सांगू लागतील.”

हंसीने त्याला आवरण्याचा प्रयत्न केला पण हंस आता प्रज्वलित झाला होता. त्याला शब्दांची धुंदी चढली होती. हंसी हताश चित्ताने त्याच्याबरोबर मानससरोवरापाशी आली. त्यांना पाहून कावळ्यांचा समुदाय त्यांच्यावर धावून आला. कावळ्यांचा नेता म्हणाला “मी अत्यंत शांतताप्रिय आहे.” त्याचा स्वर खेदापेक्षा दु:खाने कंपित झाला होता. “पण आमच्या न्याय्य हक्कासाठी आम्ही प्राणार्पण करू. हंस कोण याचा न्याय आणि नि:पक्षपाती निर्णय लागलेला आहे.” आता त्याचा स्वत दु:खापेक्षाही अनुकंपेने आर्द्र झाला होता. त्याची अनुज्ञा होताच ते असंख्य कावळे हंस-हंसीवर तुटून पडले व त्यांचे शुभ्र पंख आणि लाल चोची यांचा विध्वंस झाला.

पण झाडाच्या ढोलीतून एक खार ती हत्या पहात होती. ती चीत्कारत म्हणाली “गरुडाची गोष्ट निराळी. त्यानं एकदा नखं फिरवली की दहा कावळ्यांच्या चिंध्या होतात. पण तुम्ही झुंजणार कशानं? पांढर्‍या पंखांनी, डौलदार मानेने की  माणकांसारख्या चोचीने? प्रतिपक्षप्रतिपक्षाला चांगलीच समजेल अशी भाषा वापरण्याचं सामर्थ्य नसेल तर शहाण्यानं त्या ठिकाणी सत्य खपवायला जाऊच नये.

खारीचा चीत्कार काही कावळ्यांनी ऐकला आणि त्यांनी तिला देखील टोचून मारून टाकले. म्हणजे ते सत्य माहित नसलेला हंस आणि ते सत्य माहित असलेली खार या दोघांचाही सर्वनाश झाला.

तात्पर्य काय, स्वसंरक्षणाच्या संदर्भात सत्याचे ज्ञान-अज्ञान या गोष्टी पूर्णपणे असंगत आहेत. कारण अनुयायांच्या रक्षणाबाबत सत्य पूर्णपणे उदासीन असते. दुसरे एक शेष तात्पर्य असे की, तो स्वर मग कितीही तात्त्विक असेना, भोवती कावळे असताना खारीने चीत्कारू नये.

कथासंग्रह:  काजळमाया –  जी. ए. कुलकर्णी.

संग्रहिका : डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments