? वाचताना वेचलेले ?

☆ ‘निरागसता आणि इमानदारी…’ लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अनंत केळकर ☆

निरागस आणि मनातल्या रामासोबत इमान जपणारी सोन्यानं बनलेली माणसं..

साधारण आठ दहा वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. त्यावेळी विनावाहक विनाथांबा अशी सांगली कोल्हापूर बससेवा सुरू होती. बरोबर सकाळी आठ वाजताची बस मी पकडली. नवरात्र आणि त्यात शुक्रवार असल्यामुळे बसला बर्‍यापैकी गर्दी होती. माझ्या शेजारी 65 ते 70 वर्षाची वृद्ध महिला बसली होती. तिच्या पेहरावावरून ती सांगलीच्या कुठल्यातरी खेडेगावातनं आली होती हे कळत होतं. गाडी सुरू झाली. खिडकीतून येणारं गार वारं मनाला आनंद देत होतं. साधारणतः हातकणंगले ओलांडल्यानंतर आजी मला म्हणाल्या, “व्हय दादा, मास्तर बरं न्हाय आलं अजून?” मास्तर मंजे कंडक्टर.

मी म्हटलं आजी, ह्या गाडीला मास्तर नसतंय. गाडीवर लिव्हलया की तसं.

आरं देवा… मंग तिकीट??

त्ये खालीच, ST मध्ये बसायच्या आधीच काढायचं असतंय.

मग आता???

“तिकीट तपासायला वाटेत कुणी चढलं, आणि पकडलं तर दंड भरावा लागेल. तरी पण आपण समजावू त्यांना की वाचायला नाही येत, त्यामुळं चढल्या तुम्ही.”

“दुसरी इयत्ता पास हाय म्या. म्होरंबी शिकले असते,पण बानं चुली पुढं बशीवलं.

त्ये मरुदे तिकडं. वाचाय येतंया मला.

सांगली कोल्हापूर पाटी बघूनच तर चढले. गडबडीत बाकी न्हाय वाचलं.”

“अहो आज्जी. आपण फक्त सांगू तसं. असंबी त्ये बेंन कुणाचं काय ऐकत नाहीत, तरिबी उगा वाईच खडा टाकून बघू. त्येबी, तपासणीसाठी आले तर मग बघू…”

दोन मिनिटं म्हातारी काहीच बोलली नाही.

डोक्यावरचा पदर सावरत, हळूच म्हणाली,

“नशिबी गरिबी पूजल्या, त्ये परवडलं, पण अडाणीपणाचा शिक्का लई बेक्कार.”

ह्या सगळ्या झांगड गुत्त्यात गाडी केव्हा कोल्हापूर स्टॅण्ड मध्ये शिरली कळलंच नाही. मी खिडकीतून डोकावून पाहिलं, बाहेर कुणी तपासनीस नव्हता. आजीला म्हटलं, “आज्जी, आता सुमडीत उतरा. अन हिकडं तिकडं न बघता लगेच स्टँडच्या भैर पडा.”

आजी कैच बोलली नै.

बाहेर आल्यावर मी गाड्यावर मस्त चहा मारला. तेवढ्यात पुन्हा आज्जी दिसली. म्हंटलं…

“आज्जी अजून इथंच?”

आज्जीनं चोळीत खुपसलेलि पर्स काढली, त्यातून एक तिकीट बाहेर काढलं आणि माझ्या हातात दिलं.

आज्जीनं उतरल्यावर कोल्हापूर सांगली असं तिकीट विना वाहक विना थांबाच्या काऊंटर वरनं काढलं होतं. मला म्हणाली

“टाक फाडून. म्या भैर आल्यावर फाडणारंच व्हते.

माघारी जाताना मात्र, न इसरता आधी तिकीट काढील.”

म्हटलं, आज्जी…. “पैकं जास्त झालं असतील तर नाष्टा द्या हॉटेलात…”

आज्जी हसली…. म्हणाली “जिच्या दर्शनाला आले, त्या अंबा बाईनं तिची जबाबदारी पार पाडली.

कुठलं गालबोट नं लावता आणलं इथवर. वाटेत उतरवलं असते मला, पकडलं गेले अस्ते तर. पण त्या अंबा बाईनं चार चौघात लाज राखली.

दंड भराय इतकं पैकं न्हाईत पण मग आता म्या किमान हाय तेव्हढं तिकीट काढून, फाडून टाकलं म्हंजे झालं की रं हिशेब बराबर….आता जाताना मात्र इस्रायची न्हाई तिकीट काढायला.

महालक्ष्मीच्या दारात जायचं अन त्येबी कुणाची तरी लक्ष्मी लुबाडून… हे बरं न्हाई …”

मी काहीच नं बोलता हातातलं तिकीट फाडून टाकलं. आज्जी गेली अंबाबाई च्या दर्शनाला. मी मात्र तिथनंच हात जोडले.

ढीग इयत्ता गिरवल्या तरी ही अशी नीतिमत्ता येतेच असं नाही, हेच खरं.

असली गोडं माणसं म्हणजे आपल्या समाजातली श्रीमंती आहे, एखादेवेळी आर्थिकदृष्ट्या दुबळं असतीलही, तो भाग अलाहिदा पण निरागस आणि मनातल्या रामासोबत इमान जपणारी ही लोकं, मातीशी घट्ट जोडलेली आपल्या महाराष्ट्राची मुळ ओळख म्हणजे हीचं सोन्यानं बनलेली माणसं.

लेखक : अज्ञात 

प्रस्तुती : श्री अनंत केळकर.

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments