श्री सुहास रघुनाथ पंडित
वाचताना वेचलेले
☆ “बाप” एक माणूस….!! – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री सुहास रघुनाथ पंडित ☆
एकदा “बाप” ही उपाधी मागे लागल्यावर सगळ्या मृदु, कोमल भावनांची मक्तेदारी बायकोच्या नांवावर करून हा माणूस कधी निर्विकार, मख्ख तर कधी कर्तव्य-कठोर मुखवटा धारण करून बसलेला एक खडक बनतो.
पोटच्या पोरांसाठी सतत कष्ट करणारा, त्यांच्यासाठी अनेक गोष्टी चुपचाप सहन करणारा, त्यांची कोड- कौतुकं पुरविण्यासाठी वेळप्रसंगी जीवाचा आकांत करणारा बाप, तसा आईच्या थोरवी पुढे दुर्लक्षितच पण त्याचे त्याला कधीच वैषम्य वाटत नाही. जाहीर कौतुकाची तर त्याला कधी अपेक्षाही नसते. आपली लेकरं आपल्यापेक्षा मोठी व्हावीत ह्या एकाच ध्यासापोटी आपला ‘बापा’चा कठोर मुखवटा सांभाळत त्याचे आयुष्य सरत असते….
पण एका समाधानाच्या क्षणी, हा मुखवटा गळून पडतो… अंतरंगामध्ये झुळुझुळु वाहणाऱ्या मायेच्या निखळ पाण्याचा थोपवून धरलेला झरा, मुलांच्या कर्तृत्वाची झेप पाहतांना जेंव्हा त्याच्या डोळ्यांचे बांध फुटून वाहू लागतो तेंव्हा त्याच्याच लेकरांना उमगतं की अरे, आपला बाप हाच खरा आपल्या आयुष्यातला “बाप माणूस” आहे ….!
अशा सगळ्या “बाप-माणसांना” त्रिवार वंदन..!!
☆
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सुहास रघुनाथ पंडित
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈