श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ बटाट्याची चाळ आता जमीनदोस्त झाली आहे… – लेखक / संकलक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
त्रिलोकेकर सोमण गुप्ते च्या पुढच्या पिढ्या आता स्वतःच्या गाड्यांनी फिरू लागल्या आहेत.
असा मी असा मी मधले गिरगांवातले रस्ते आता भलतेच रुंदावले आहेत. हातात जीपीएस फोन आणि गुगल मॅप्स आल्यामुळे बेंबट्या आता भर उन्हातान्हात पत्ता शोधत फिरत बसत नाही, मॅप लावून झटदिशी डेस्टिनेशन गाठतो.
लग्नातल्या जेवणावळी श्लोक आहेर कधीच इतिहासजमा झाले आहेत. नांव घेणं मात्र नाममात्र उरलं आहे.
कोकणातल्या अंतू बर्वा सुद्धा तब्येतीन् चांगलाच सुधारला आहे आणि विचारांनीही.
मुलाच्या घरची सगळी अपसव्य त्याला आता मान्य झाली आहेत, ना जातीची ना पातीची सून त्याची चांगली काळजी घेते आहे.
नामू परटान् आता लौंड्रि घातली आहे, आता तो स्वतःचे कपडे वापरतो आणि दुसरी कसली भट्टी पण लावत नाही.
नारायणाने पण आता नसते उद्योग करायचे सोडून आपल्या कुटुंबाकडे व्यवस्थित लक्ष द्यायला सुरुवात केली आहे, त्याचा मुलगा आता लग्नात फुल चड्डी आणि टाय घालून बुफे घेत असतो आणि नारायण देखिल त्याला एटिकेट्स शिकवित असतो.
हरितात्यांनी आता इतिहासातल्या गोष्टींचं पुस्तक लिहिलं आहे, त्यांना आता आजोबांनी पुरवलेल्या भांडवलावर बुडित धंदे करायची आवश्यकता राहिली नाही.
लखू रिसबुड आता चांगलाच सुधारला आहे, त्याच्या हातात सोन्याच्या अंगठ्या आणि गळ्यात सोन्याची जाड साखळी आली आहे. कुणाच्या बातम्या देऊन फायदा होईल हे त्याला चांगलेच उमगले आहे.
आता लखू शब्दकोडी लिहित नाही, मोठं मोठ्या नेत्यांना आपल्या लेखांतून कोडी घालतो आणि ती कोडी सोडविण्याची बक्षिसं देखिल पटकावतो.
सखाराम गटणे आता कॉम्प्युटरच्या भाषा शिकतो, त्याला सुवाच्य हस्ताक्षराची आणि नितीमत्तेची आवश्यकता उरली नाही. कॉम्प्युटरच्या अनेक भाषांत पारंगत झाल्यामुळे त्याची साहित्याची आवड पार मागे पडली.
नंदा प्रधान पहिल्या पासून जरा फॉरवर्डच होता, त्यानेही तीन ब्रेकअप्स नंतर आता लॉंगटर्म रिलेशनशिप करण्यात सक्सेसफुल झाला आहे.
नाथा कामत मात्र आहे तसाच राहिला आहे, त्याचा बुजरेपणा कधी जाईल देव जाणे.
बबडू आता राजकारणात शिरला आहे, तो कुठलातरी महापौर वगैरे झाला होता, पहिल्यापासूनच लटपट्या होता तो, कुठल्या युनिव्हर्सिटीचा चॅनसेलर सुद्धा झाला तर मला नवल वाटणार नाही.
पेस्तनकाका आणि काकी मात्र हल्ली दिसत नाहित आणि कधी दिसलेच तर ते १००% वाटत नाहित.
नाही म्हणायला चितळे मास्तर हरवल्याची खंत मात्र हृदयात बोचते.
ऑनलाईन टिचिंग, टेस्ट सिरीज, प्रोफेशनल टिचिंगच्या या जमान्यात संस्कार पेरणारे मास्तर मात्र हरवलेले आहेत.
भगवद्गीता पाठ न करता त्यातले तत्व जगणारे काकाजी आता सापडेनासे झाले आहेत, पण आचार्यांच्या वेश चढवून गीता मुखोद्गत करून नाही ते धंदे करणारे बोगस आचार्य फोफावले आहेत.
दोन तत्वांचा वाद त्यांच्यातल्या प्रामाणिकपणा बरोबरच मिटलाय आणि फक्त ऐहिक सुखांचा पाठलाग सुरू राहिला आहे.
पुलंनी लिहिलेल्या एक एक व्यक्तिरेखा हा बदलणाऱ्या संस्कृतीचा प्रवास सांगणाऱ्या होत्या.
त्यांनी लिहिलेली बटाट्याची चाळ आणि असा मी असा मी हे बदलत्या सामाजिक जीवनाचे प्रवासवर्णनच होते.
त्या संस्कृतीमध्ये एकेकाळी पुरता मिसळून गेलेल्या मला, आज मागे वळून बघताना ती संस्कृती अनोळखी वाटू लागली आहे आणि माझ्या मुलांकडे बघितल्यावर असे जाणवू लागते कि आज मी स्वीकारलेली हि आधुनिक संस्कृती सुद्धा फार वेगाने कालबाह्य होत चालली आहे.
पुलंनी हा बदल त्यांच्या लिखाणातून नेमकेपणाने दाखवला.
बदलत्या काळाची पाऊले कशी ओळखायची आणि त्या नव्या काळाचं हसतमुखाने स्वागत कसं करायचं हे पुलंनी आम्हाला शिकवलं.
काळ बदलला, संस्कृती बदलली, वेशभूषा बदलली, आर्थिक स्थिती बदलली तरी माणूस तोच आहे.
त्या बदललेल्या वेष्टणातला माणूस वाचायला पुलंनी आम्हाला शिकवलं.
भले त्यांच्या व्यक्तिरेखा जुन्या झालेल्या असोत किंवा त्यांची विचारसरणी आज पूर्णपणे बदललेली असो, पुलंनी टिपलेली त्यांची स्वभाव वैशिष्ठ्ये आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन अमर आहे.
नितळ मनानं केलेलं ते समाजाचं निरीक्षण आहे.
पुलं आज असते तर शंभरीत पदार्पण करते झाले असते, आणि आज बदललेल्या सुशिक्षित आणि श्रीमंत समाजाचीही त्यांनी तितक्याच कुशलतेने दाढी केली असती.
पुलंनी आम्हाला जगण्याची दृष्टी दिली, संगीताचा कान दिला, राजकारण्यांच्या भाषणातला आणि कृतीतला फरक हि दाखवून दिला.
आणिबाणीत वागण्यातला निर्भयपणा आणि सच्चेपणा दाखवून दिला.
खऱ्या अर्थाने आयुष्य बुद्धिनिष्ठ विचारांनी आणि प्रामाणिकपणे जगलेला मराठी साहित्यिक असे मी त्यांना म्हणेन.
त्यांच्या वैविध्यपूर्ण लिखाणाचा संपूर्ण वेध घेणे हे माझ्या बुद्धीच्या पलीकडले असले तरी माझ्या क्षीण बुद्धीला त्या ज्ञान समुद्रातल्या खजिन्याचे जेवढे दर्शन घडले त्यातील थोडेफार मांडण्याचा मी प्रयत्न केला आहे.
या व्यतिरिक्त त्यांची प्रवास वर्णनं नाटकं पुरचुंडी सारखे लेख, गोळाबेरीज हसवणूक सारखी पुस्तकं, भाषांतरं, चित्रपट पटकथा लेखन, दिग्दर्शन, एकपात्री प्रयोग, कथाकथन, मराठी साहित्याचा गाळीव इतिहास यासारखी विनोदी शैलीत लिहिलेली विद्वत्ता पूर्ण पुस्तकं, इत्यादी साहित्याचा आणि अंगभूत कलेचा वेध घेण्यासाठी एखाद्यास त्यांच्या साहित्यात डॉक्टरेट केले तरी आयुष्य कमीच पडेल यात काहिच शंका नाही.
या आमच्या आयडॉलला लक्ष लक्ष प्रणाम।।।
लेखक, संकलक : अज्ञात
संग्राहक : अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com