वाचताना वेचलेले
☆ ‘नातीगोती की नातीगोची’ – लेखिका : सौ. दीपा बंग ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆
खूप प्रतिष्ठित घरातलं चांगलं स्थळ समृध्दीसाठी चालून आलं होतं. पण पी.एच.डी.झालेली समृध्दी मात्र तयार नव्हती, ह्या विवाहासाठी.
तिला हवं असलेल्या कोणत्याच गोष्टी तिला त्या नात्यात दिसत नव्हत्या.
अमोल कमवता होता. देखणी, पीळदार शरीरयष्टी लाभलेल्या,एकुलत्या एक असलेल्या मुलामध्ये एकच अवगुण होता.
तो अवगुण म्हणजे त्याला आई ,वडील होते. त्याची शी,शू काढणारी, जगाच्या वाईट नजरेतून वाचवण्यासाठी रोज मीठ मोहरी ओवाळून टाकणाऱ्या त्याच्या आजीची तब्येत अजून ठणठणीत होती. थोडक्यात, घरात येणाऱ्या सुनबाईला एक नाही, दोन नाही, चक्क तीन लोकांना सांभाळायचं होतं.
धुणं,भांडी,फरशी , फर्निचर पुसायला, दिवसभर काम करायला होते दोन गडी आणि जरी पोळ्यांना बाई होती. तरी त्या तिघांसोबत राहणे म्हणजे फार मोठा जाच! असंच त्या भोळ्या मनाला वाटत होतं.
समृध्दीच्या आईला तिची व्यथा कळली. ती मनातून हळहळली. ही व्यथा दूर व्हायलाच पाहिजे, असा तिने चंग बांधला. तुर्तास हे स्थळ बाजूला सारले गेले.
एके दिवशी समृध्दी, आपल्या फुलांनी समृद्ध बागेत चहा पित असताना शेजारचा छोटू पेपर घेऊन आला. त्या पेपरमध्ये काही प्रश्न होते. ते सोडवण्यासाठी त्याला समृध्दीची मदत हवी होती.
प्रश्न होता, “अचानक रात्री नवरा आजारी पडल्यावर तुम्ही एकटे असताना काय कराल?”
दुसरा प्रश्न होता, “अचानक दोनच महिन्यांचं तुमचं बाळ रडू लागलं आणि तुम्ही एकटे आहात, तर तुम्ही काय कराल?”
तिसरा प्रश्न होता, “तुम्हाला ताप आला आणि तुमचा नवरा ऑफिसमधून सुट्टी घेऊ शकत नसेल तर तुम्ही काय कराल?”
कमनशिबी आहोत आपण. कारण आपल्या देशात पी.एच.डी.झाली तरी जीवनात असल्या प्रश्नांना सामोरे कसे जायचे ? ह्याचे शिक्षण देत नाहीत.
पेपर वाचून तिला अनुमान आला होता की हे पेपर छोटू घेऊन येण्यामागे नक्कीच आईचं सुपीक डोकं होतं. आपल्या आईला लहानपणापासून ह्याच पद्धतीने शिकवण देताना तिने अनेक वेळा पाहिले होते.
हो किंवा नाही अशी तट नव्हती.विचार करायला वेळ मिळाला. आणि समृध्दीला कळत होतं की जीवनात असे अनेक प्रसंग येतात, जेथे आपल्याला कुणीतरी सोबत हवंच असतं.
समृध्दी आज नावासारखी विचारांनी पण समृध्द झाली होती.सरळ उठून आईच्या गळ्यात पडून रडली.लगेच अश्रू पुसत, हसत हसत, लाजत म्हणाली , “आई मी अमोलशी लग्नाला तयार आहे.
“पण आई! ही नातीच सगळी गोची करतात.स्वतंत्रता हिरावून घेतात. म्हणून मनात शंका होती गं. मनासारखं जगता नाही ना येत इथं.”
आई तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली, “इथं तुझीच गोची होते.काळ बदलला. मग सासू कडे बघायचा दृष्टिकोन नको का बदलायला? आता विचारसरणी बदलली. मैत्रीचं नातं रुजायला लागलं. वैचारिक मतभेद असले तरी मने जिंकता आली पाहिजेत .
लग्नानंतर घरात सासू,सासरे असल्यावर जबाबदारी लवकर पडत नाही.
आमच्या काळात दहा बारा वर्षानंतर कुठं जबाबदारी पडायची. तुम्हा मुलींना मात्र एकटं राहून लग्नाच्या दुसऱ्याच दिवसापासून घरात काय हवं नको ते पहावंच लागतं. अनुभव कमी पडतो. मग भांडणतंटे आणि सगळंच अघटित घडू लागतं.
पटतंय का?”
समृध्दी डोळ्यावरचा चष्मा पुसत होती.चष्म्यावरची धूळ साफ होता होता तिच्या मनावरचं नात्याबद्दलचं मळभही दूर झालं होतं.
पण हे मळभ परत कधीच तिच्या जीवनात येऊ नये म्हणून आईने शेवटचे शब्द गरम तेला सारखे तिच्या कानात ओतले,
” बाळ! एकटं राहून जर माणूस सुखी राहु शकला असता तर आज सगळ्यात जास्त अनाथाश्रमातील मुलेच सुखी असती. “
नात्यातील गोची संपून आज नातीगोती सांभाळण्यास समृध्दी सज्ज होती.
लेखिका : सौ. दीपा बंग
प्रस्तुती : सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈