श्रीमती उज्ज्वला केळकर

? वाचताना वेचलेले ?

☆ “स्वयंपाकातील शब्द आटले…” – लेखक : श्रीसंजीव साबडे ☆ प्रस्तुति – सौ. उज्ज्वला केळकर

मी ‘महाराष्ट्र टाइम्स’ मध्ये असताना रेणुका खोत माझी सहकारी होती. फेसबुकवर तिच्या अनेक पोस्ट असतात. एका पोस्टमध्ये तिने गमतीने ‘विसळुनी डोळे’ असा शब्दप्रयोग केला. ते वाचताना आपण हल्ली विसळणे हा स्वयंपाक घरातील शब्द वापरेनासे झाल्याचं जाणवलं.

पूर्वी जी भांडी घासायची नसत ती विसळत. म्हणजे चहाचा कप व बशी वगैरे. भांडी घासली जात. आता अनेक जण ‘भांडी धुतली’ असं म्हणतात. खरं तर ती घासून मग धुवायची असतात. कपडे धुवायचे असतात, लादी पुसायची असते. भाजी चिरायची असते. आता ती कापली असं म्हणतात. चिरण्यासाठी विळी लागते, काही विळींना नारळ खवण्याची सोय असे. सुरी कापण्यासाठी. फळं कापली जातात. तिचाही उल्लेख चाकू होतो बऱ्याचदा.

पालेभाज्या ‘निवडून’ ठेवत, आता त्या ‘साफ करतात’. शेंगा, मटार, कणीस सोललं असंही ऐकू येत नाही फारसं. पूर्वी चिरलेली वा निवडलेली भाजी ‘निथळत’ ठेवत. देठ हा शब्द आता फक्त ‘पिकल्या पानांचा देठ की हो हिरवा’ या गाण्यातच राहिलाय.

‘चहाचं आधण’ हाही शब्दही गायब झाला. पूर्वी ‘दूध उतू येत’ असे, आता ते ‘वर’ येतं. तेव्हा ते पातेलं खाली उतरवलं नाही तर दूध आटतं, पातेल्याला लागतं आणि काही वेळा करपतं. ताकासाठी दही रवीने घुसळत, आता दह्याचं ताक केलं म्हटलं जातं आणि दह्याची बरणी नसते. चहात साखर, आमटी वा भाजीत मीठ मिसळू दे, असं फार कोणी म्हणत नाही. ‘परतताना’ भाजी ‘हलवतात’, आमटी किंवा पातळ भाजी डावाने ‘ढवळतात’.

चिनी मातीची बरणी खूप कमी घरात असते. पूर्वी लोणी कढवून तूप केलं जात असे. दही लावण्यासाठी विरजण नसेल, तर ते शेजारून आणलं जाई. कढवणे, कढ येऊ देणे, विरजण, केर या शब्दांचा वापर शहरात खूपच कमी झाला आहे.

मसाल्यांच्या डब्याला ‘मिसळणीचा’ किंवा ‘मिसळणाचा डबा’च म्हटलं जाई. चमचे, पळी, डाव, झारा, उलथणं याला आता ‘चमचाच’ म्हणतात. पातेले ऐकू येत नाही. त्यालाच ‘भांडं’ म्हटलं जातं. पेला शब्द तर जणू हद्दपारच झाला. काही घरात वाटीला ‘बाउल’ म्हणतात. पूर्वी घरात खल-बत्ता, पाटा-वरवंटा व काही घरात रगडा असे. आता तो नसतो आणि ते स्वाभाविक आहे आणि असले तर ते अडगळीत पडलेले असतात. पाखडण्यासाठी लागणारं सूपही नसतं शक्यतो. पीठ चाळण्यासाठीची चाळणी नसते.

हे सारं ‘विसळुनी डोळे’ मुळे झालं. तरी हे फक्त स्वयंपाक घरातील. त्याखेरीज विंचरणे, भांग पाडणे असे वेगळेच. अडगळीत गेलेले असे अनेक शब्द तुम्हालाही आठवत असतील. ते तुमच्या घरी वापरात असतील, तर उत्तमच! हे शब्द आटता कामा नयेत.

लेखक: श्री संजीव साबडे

प्रस्तुती : उज्ज्वला केळकर 

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments