वाचताना वेचलेले
☆ मी आता म्हातारी झाले असं अजिबात म्हणायचं नाही… कवी : प्रा. विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सुश्री स्वाती मंत्री ☆
कोण म्हणतं तू म्हातारी झाली
आत्ताशिक तर तू फक्त साठीची झाली
मी थकले, मी दमले
असं सारखं सारखं म्हणू नको
बाई गं तुला विनंती आहे
बळंच म्हातारपण आणू नको !
सून आली, नातू झाला
नात झाली, जावाई आला
म्हणजे म्हातारपण येतं नसतं
स्वतःकडे लक्ष द्यायचं सोडलं की
वार्धक्य येत असतं !
डाय कर नको करू हा तुझा
व्यक्तिगत प्रश्न आहे
नीट नेटकं टापटीप रहा
एवढंच आमचं म्हणणं आहे
बैलाला झुली घातल्या सारखे
गबाळे ड्रेस घालू नको
उगीचच अधर अधर
जीव गेल्यासारखं चालू नको
लोकांनी आपल्याला काहीही म्हणो
आपण स्वतःला सुंदर समजावं
रिटायर्ड झालं, साठी आली
तरी रोमँटिक गाणं गावं !
पोथ्या, पुराणं, जपतप, कुलाचार
याला आमचा विरोध नाही
पण मी आता म्हातारी झाले
असं अजिबात म्हणायचं नाही !
जरी साठी आली तरी….
स्वतःसाठी वेळ द्यायचा
मैत्रिणींचा ग्रुप करायचा
ट्रिपला जायचा प्लॅन करायचा
आणि जीवनाचा आनंद घ्यायचा !
आणि हो
दुःखाचे तुणतुणे वाजवायचं नाही
प्रारब्ध प्रारब्ध म्हणून रडायचं नाही
घराच्या बाहेर पडायचं
मोकळा श्वास घ्यायचा
आणि हिरवागार निसर्ग पाहून
धुंद होऊन ” मारवा गायचा !”
फिट रहाण्यासाठी सगळं करायचं
हलकासा व्यायाम, योगा
थोडा morning walk
फेशियल, मसाज, स्टीम बाथ……
सगळं कसं रेग्युलर करायचं !
कुढत कुढत जगायचं नाही
आणि म्हातारपण आलं
असं म्हणायचं नाही !
साठाव्या वर्षी फॅशन करू नये
असं कुणी सांगितलं ?
प्लाझो, वनपीस, जेगीन, टी शर्ट सगळं घालायचं
अन गळम्यासारखं नाही
मस्त ऐटीत, टाईट चालायचं !
नको बाबा! लोक काय म्हणतील?
अरे म्हणली का पुन्हा लोक काय म्हणतील ?
मग ट्रीपला काय नऊवारी लुगडं,
आणि तिखटा मिठाचा वास येणाऱ्या
मेणचट रंगांच्या साड्या घेऊन जाणार का ?
अग बाई, जगाची फिकीर करायची नाही
अन म्हातारी झाले असं म्हणायचं नाही !
हे सगळं तू का करायचंस,
ते नीट समजून घे
कारण तू घराचा आधार आहेस
कुटुंबाचा कणा आहेस
वास्तू नावाच्या पंढरपुरातली
मंजुळ वीणा आहेस !
तुझं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राहिलं तरंच घर आनंदी राहणार आहे,
देवघरात दिवा लागून स्वयंपाक घरात
” अन्नपूर्णा येणार आहे !”
घराघरात संस्काराचा सडा
आणि चैतन्याचा झरा वाहण्यासाठी
तुझं मन प्रसन्न असणं
खूप गरजेचं आहे !
कवी : प्रा. विजय पोहनेरकर
फोन नं. 9420929389
संग्राहिका : श्रीमती स्वाती मंत्री
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈