सुश्री प्रभा हर्षे
वाचताना वेचलेले
☆ महालक्षुम्या आल्या, टेन्शन नका घेऊ ! – कवी : विजय पोहनेरकर ☆ प्रस्तुती – सुश्री प्रभा हर्षे ☆
☆
महालक्षुम्या आल्या, महालक्षुम्या आल्या
घाबरून नका जाऊ
जेवढं होईल तेवढंच करा
टेन्शन नका घेऊ
*
काळाप्रमाणे काही गोष्टीत
बदल केले पाहिजे
सोळा भाज्या सोळा चटण्या
कमी केले पाहिजे
एवढेच लाडू तेवढ्या करंज्या
तरकटी नको बाई
काही धरायचं काही सोडायचं
काही होत नाही
☆
(पूर्वीच्या काळी……)
☆
एकत्र कुटुंब माणसं भरपूर
अन्न खाल्ल्या जायचं
थोडं जास्त झालं तरी
वाया नाही जायचं
*
गडी माणसं पाहुणे रावळे
चढाओढीने खायचे
Acidity, पोटात गुडगुड
काही नाही व्हायचे
*
आता काळ बदलला आहे
घरोघरी माणसं चार
माऊल्यांनो खरंच जास्त
होऊ नका तुम्ही बेजार
*
भला मोठा स्वयंपाक करून
फेकून देऊ नका
अन्न पूर्ण ब्रह्म आहे
कधीच विसरू नका
*
सण करणं श्रद्धा असणं
हा भाग महत्वाचा
लक्षुम्यांनाही नवैद्य चालतो
फक्त भाजी भाकरीचा
*
जिवंत लक्ष्मीची बेजारी करण्यास
गौरी-गणपती येत नाहीत
थोडं कमीजास्त झालं तरी
कुणावरही कोपत नाहीत
*
तुमच्यावर राग राग करायला
देव थोडाच माणूस आहे
महालक्ष्मी असो गणपती असो
फक्त भक्तीचा भुकेला आहे
*
ऐपतीप्रमाणेच सगळं करा
रिन काढून नको सण
नको लायटिंग नको माळा
फक्त हवे शुद्ध मन
*
सगळ्यांनी सामील होणं
हे महत्वाचं असतं
खरंच ताण घेऊ नका
काही कामाचं नसतं
*
आमच्याकडे असं असतं
अन त्यांच्याकडे तसं
ताण न घेता काम करावं
जसं जमेल तसं
*
गाठीभेटी गप्पागोष्टी
सणासुदीला अपेक्षित असतात
प्रेम आपुलकी वाढण्यासाठीच
दसरा दिवाळी लक्षुम्या असतात
*
मंत्र जोर जोरात म्हणायचे
अन सासुशी करायची कट्टी
असं वागल्यावर कशी होईल
महालक्षुम्याशी गट्टी ?
*
राग अहंकार चांगला नसतो
गोडीगुलाबीने वागलं पाहिजे
फटकळ बोलणं सोडून देऊन
घालीन लोटांगण म्हणलं पाहिजे
☆
कवी : प्रा. विजय पोहनेरकर
छत्रपती संभाजी नगर (औरंगाबाद) मो 9420929389
प्रस्तुती : सुश्री प्रभा हर्षे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈