वाचताना वेचलेले
☆ ‘आपलं घर…’ – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुति – सौ. शामला पालेकर ☆
माझ्या बाबांच्या नेहमी बदल्या व्हायच्या. आमचं पर्मनंट असं स्वतःचं घर नव्हतं. कायम भाड्याच्या किंवा कंपनीच्या घरात राहिलो.
विविध गावांतील नानाविध घरांमधून मी लहानाची मोठी झाले.
जिथे आईबाबा ते आपलं घर या विश्वासाने विसावले.
अशीच एकदा आईबाबांसोबत बाबांच्या कंपनीने दिलेल्या घरात बागडत असताना बाबा म्हणाले, ‘उद्यापासून तुला तुझे घर मिळणार’.
‘म्हणजे हे घर माझं नव्हतं?’
‘वेडाबाई, तुझ्या पतीचे घर तेच तुझं स्वतःचं हक्काचं घर’.
थुई.. थुई.. थुई.. थुई
पावलांनी ताल धरला. हृदयाने ठेका.
बाबांच्या कंपनीच्या घरातून नवऱ्याच्या कंपनीच्या घरात आले.
बदल्या इथेही होत्याच.
कधी हा प्रांत तर कधी तो.
ऊन वारा पाऊस झेलला, माझ्या नवरा नावाच्या चिमण्याच्या संगतीने, कंपनीच्या घरट्यात.
मी नवी नवरी चिमणी.
सजवलं नटवलं.
कंपनीच्या क्वार्टरला घर बनवलं.
आमची पिल्लं आली.
तेच घरटं पिल्लं ‘आपलं घर’ मानू लागली.
खेळू बागडू लागली.
आणि अचानक एक दिवस चिमणा दूर गेला
खूप दूर.. देवाच्या गावाला.
कंपनीने घर परत मागितलं.
‘आता आमचा मुलगाच नाही राहिला, तर कशाचं काय नि कसचं काय?’
सासरच्यांनी हात वर केले.
आशेने बाबांकडे पाहिले.
आम्हीच तर आता दादाघरी रहातोय…
परावलंबी आम्ही, काय तुला आधार देणार?
‘चांगलं घर बघून दिलं होतं, तुझ्या भाग्यात हे असं होतं. त्याला कोण काय करणार?’
हं.
अशी कशी आपली सामाजिक रचना असते- आहे?
आमचा मुलगा तर गेला आता हे सुनेचं लोढणं कोण वागवेल? जाईल ती तिकडे परत जिकडून आली होती, अशी सासरच्यांनी भूमिका.
काय करावं त्या मुलीने?
एकदाचं लग्न लावून दिलं की जबाबदारीतून मोकळे होणारे पालक.
‘जा मुली जा दिल्या घरी तू सुखी रहा’ म्हणणारे पालक जर ती परत आली तर आमचं-तुमचं करतात?
श्श… श्श… झोंबणारा परकेपणा
घायाळ करणारी अलिप्तता.
तिचं घर कोणतं?
दोन्ही घरी ती पाहुणीच असते? म्हणून उपाशी का, शेवटपर्यंत?
हा असाच नियम आहे समाजाचा.
……
मग काय झालं असेल पुढे चिमणीच्या जीवनात….
चिमणा देवाघरी गेल्यावर काही दिवस चिमणीने पिल्लांना स्वतःच्या पंखांखाली आडोसा दिला.
एक दिवस निग्रहाने तिने दोघींना वेगळे केले.
आई.. आई..
पिल्लांनी कल्ला केला.
हेतुपुरस्सर दुर्लक्ष केलं.
स्वतः दूर उभी राहून ती मार्गदर्शन करू लागली.
शोधा. सावली कुठे आहे?
सुरक्षित आडोसा आढळतो का बघा.
हं, काडी आणा.
अधिक काड्या आणा.
काडीत काडी गुंफायची.
ताणून मजबुतीची खात्री करून घ्यायची.
पिल्लं बरसूचना हालचाली करत होती.
दोन टुमदार घरटी तयार झाली.
चिमणीच्या दोन चिऊताईंची दोन स्वतंत्र त्यांची खऱ्या अर्थाने स्वतःची घरटी.
स्वतःचे घर
अभिमानाने उर भरून आला.
उद्या माझ्या चिऊताईंच्या जीवनात चिमणा राजकुमार येईल.
कदाचित तो पंखांवर बसवून उडवून घेऊन जाईल.
कदाचित नवं घरटं देईल.
दोघींचे आयुष्य सुखाने तुडुंब भरून वाहेल.
पण जर…
ते काहीही असो
मी मात्र दोघींना त्यांच्या हक्काचे, त्यांच्या नावाचे स्वतंत्र घर
आधीपासूनच सुरक्षित छत्र देऊन ठेवलेय.
गतानुगतिक आपण
साखळी कुठेतरी मोडायला हवी.
नाही का?
लेखक : अज्ञात
प्रस्तुती : सौ. शामला पालेकर
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈