📖 वाचताना वेचलेले 📖
☆ रिटायरमेंटनंतरचं आयुष्य… लेखिका: श्रीमती मानसी देशपांडे ☆ प्रस्तुती : सुश्री उषा नाईक ☆
रिटायरमेंटनंतरचे आयुष्य म्हणजे खऱ्या अर्थाने एकमेकांना वेळ देता येतो. आपण म्हणतो पण, काही क्षण हे त्या दोघांनीच स्वतःसाठी जगले पाहिजे. कशी गंमत असते, लग्नाच्या बेडीत अडकलं की जबाबदाऱ्यांमधून दोघांचीही सुटका नसते. नव्याची नवलाई संपली की छोटे छोटे रुसवेफुगवे होतात, कितीतरी वेळा मी श्रेष्ठ की तू श्रेष्ठ या वरुन तात्त्विक वाद होतात. पण, दोघांपैकी एक जण जरी घरी नसलं तरी आठवणींनी मन व्याकूळ होते. संसार करताना किती तडजोडी कराव्या लागल्या, काही नवीन अनुभव गाठीशी आले याचा हिशोब हा रिटायरमेंटनंतरच्या आयुष्यात समजतो. पण हे वय खरंच एकमेकांना सांभाळण्याचे असते ना!कारण, दोघे संसारात लोणच्यासारखे मुरलेले असतात. भाळणं संपलेलं असतं, आता जपणूक सुरू झालेली असते. म्हणून तर व. पु. म्हणतात, “आयुष्यात एक क्षण भाळण्याचा, उरलेले सगळे सांभाळण्याचे..”
हे लिहिण्याचे कारण म्हणजे मध्यंतरी ” शुक्रतारा मंद वारा.. ” या गीताला पन्नास वर्षे पूर्ण झाली. आणि मुख्य म्हणजे प्रेम, निर्मळ प्रेम काय असते त्याचा अर्थ सांगणारे हे भावगीत आहे. ज्याची मोहिनी आपल्या सर्वांच्या मनावर अजूनही आहे. व. पु. म्हणतात, ” प्रेम म्हणजे नेमके काय तर समोरच्याच्या डोळ्यांत आपली प्रतिमा पाहणं.. ” या गाण्यातील नायकाची इच्छा काय आहे तर, बाहेर इतके सुंदर वातावरण आहे, मनाच्या गाभाऱ्यात उमटलेली प्रेमाची स्पंदने ही तिच्याजवळ व्यक्त करताना, तिने डोळ्यातील भाव जाणून घेताना त्याचे डोळेच सारं काही सांगतील. तसंच, तिची साथ ही कायम त्याला हवी आहे. म्हणून तर गाण्याच्या ओळी आहेत,
” आज तू डोळ्यांत माझ्या, मिसळूनी डोळे पहा, तू अशी जवळी रहा.. “
तारुण्यात तुमचे तुमच्या जोडीदारासोबत कितीही वाद झाले तरी त्यांच्यापासून फार काळ दूर राहणे शक्य नसते. एकदा का वयाची पन्नाशी ओलांडली की खऱ्या अर्थाने मदतीची गरज असते. हळूहळू प्रकृतीच्या तक्रारी सुरू होतात. पण प्रेम कमी होते का? अजिबात नाही. व. पु. म्हणतात, ” भावना व्यक्त करायला शेवटी शब्द कमी पडतात हेच खरे.. ” प्रेमाची कबुली द्यायला वयाचं बंधन नसतं. स्त्री ही जन्मतः लाजरी असते. मनात आलेले प्रेमाचे हळुवार बंध जोडीदार समजून घेईल असे तिला वाटत असते, किंबहुना खात्री असते. पण हा जीव एकमेकांच्या सहवासाने इतका भारावून गेला आहे की, त्या प्रेमाचा, मुरलेल्या प्रेमाचा सुगंध वाऱ्यासारखा पसरला आहे. ही मनातली भावना आतादेखील ओठांवर आणताना थोडासा बुजरेपणा अजून आहे. पण एक मात्र नक्की, जसं व. पु. म्हणतात, ” सहवासाचा आनंद पैशात मोजता येत नाही.. ” त्याप्रमाणे हा जन्म मात्र तिच्या असण्यामुळे, तिच्या साथीमुळे सार्थकी लागला हे खरं. म्हणून तर म्हटलं आहे,
” भारलेल्या या स्वरांनी, भारलेला जन्म हा,
तू अशी जवळी रहा.. ”
हे रिटायरमेंटनंतरचे आयुष्य म्हणजे खरंच बोनस लाईफ म्हटले पाहिजे. आपल्याला जोडीदार कसा हवा आहे याची स्वप्नं आपण प्रत्येक जण बघतोच. आणि जेव्हा तसाच जोडीदार आपली साथ देतो तो आनंद शब्दात व्यक्त करता येत नाही. बघा ना, जेव्हा ही दोघं मिळून प्रवास करत असतात तेव्हा समोरची वाट कितीही काट्यांनी भरलेली असली तरी तो धरलेला हात हा न सुटणारा आहे, ही भावना मनात असते. आणि जेव्हा संसाराला अनेक वर्ष पूर्ण होतात, तेव्हा हाच प्रवास जेव्हा डोळ्यासमोर येतो, तेव्हा डोळ्यांतून येणारे अश्रू हे आनंदाचे असतात. कारण, सोबतीचा हात हा काही वेगळाच असतो. हेच व. पु. म्हणतात, ” पाऊलवाटेवरच सोबतीचा हात हवा असतो.. ” या गीतात आयुष्याचा कृतार्थ भाव फार सुंदर रीतीने व्यक्त केला आहे. सुरुवातीला जेव्हा सगळं नवीन नवीन असतं तेव्हा कितीतरी वेळा आपण म्हणतो, “जा, मला तुझी गरज नाही. ” पण जेव्हा गात्रं क्षीण होत जातात तेव्हा काळजी घेणारी आपली व्यक्ती समोर असावी हाच मनाचा हट्ट असतो. किती बदल होतो ना!
” वाकला फांदीपरी आता फुलांनी जीव हा,
तू असा जवळी रहा.. ”
एकमेकांची झालेली सवय, एकत्र घालवलेले क्षण हे आठवून खरंच वाटतं, किती मोठा प्रवास होता हा! या वयात जी जपणूक सुरू होते ती काही वेगळीच असते. कारण, हे वयच असे असते की शरीराला झालेली जखम तुम्हाला परावलंबी करू शकते, तर मनाला झालेली जखम सहन करण्याची क्षमताच उरलेली नसते. मी आधी देखील लिहिले होते, साठी, सत्तरी पार केलेल्या तसेच कोणालाही परावलंबित्व नको असते. आपल्या सवयी या जोडीदाराला माहित असतात आणि त्याच्या आपल्याला माहीत असतात. म्हणून तर हे सांभाळणं याचसाठी महत्त्वाचे असते. ज्येष्ठ गायक अरुण दाते आणि सुधा मल्होत्रा यांनी हे गीत इतकं सुंदर गायलं आहे की, जेव्हा ते म्हणतात, तू अशी जवळी रहा. तेव्हा डोळ्यांसमोर झोपाळ्यावर बसलेले आजी आजोबा दिसतात. ज्यांना फक्त सहवास हवाहवासा आहे. म्हणून तर, या गाण्याची पन्नास वर्षे पूर्ण झाली, पण कधीही कानावर पडले तरी कर्णसुख मिळाल्याशिवाय राहत नाही.
लेखिका: श्रीमती मानसी देशपांडे
प्रस्तुती :सौ. उषा नाईक
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈