सौ. मंजुषा सुनीत मुळे
📚 वाचताना वेचलेले 📖
☆ “धुक्यात हरवलेली ही पहाट…” – लेखक : श्री विलास कुमार ☆ प्रस्तुती – सौ. मंजुषा सुनीत मुळे ☆
धुक्यात हरवलेली ही पहाट…
अज्ञाताकडे घेऊन जाणारी ती वाट…
अशी धुक्याच्या दुलईमध्ये लपेटलेली पहाट ही पाहण्याची नसून अनुभवण्याची गोष्ट आहे. परतीचा पाऊस येऊन गेलेला असतो… थंडीची चाहूल लागण्यापूर्वीचा हा काळ… हवेत एक प्रकारचा उबदार गारवा असतो. आपल्या समोरचा काही भाग फक्त दृश्यमान असतो. जणू काही
नूतन जोडप्यामधील एकमेकांबद्दल समज! अजून एकमेकांच्या स्वभावाची पुरेशी ओळख झालेली नसते. नुसते काही ठोकताळे बांधलेले असतात. ते समज गैरसमज हळूहळू कळत जातात. खरे झाल्यावर कधी आनंद होतो, तर चुकल्यावर कधी किंचित निराशाही येते…. एकमेकांना समजून घेत संसाराच्या वाटेवर प्रवास सुरूच असतो.
कधी कधी वाट चुकू शकते…. धुक्यामध्ये हरवल्यासारखे अर्ध्या वाटेवर जोडीदाराला टाकून पुढे जावे लागते… नियतीच्या चकव्यापुढे कधी कधी शरण जावे लागते.
एकमेकांबद्दलचे गैरसमज नंतर हळूहळू वितळून जातात…. जणू काही धुके सरून लख्ख ऊन पडतं. भविष्यातील मार्ग स्वच्छ दिसायला लागतो. संसाररूपी उन्हाचा कडाका सहन करत जीवन प्रवास चालू होतो…. सहजीवनाच्या पहाटेस अनुभवलेल्या या धुक्याला मात्र कुणी विसरू शकत नाही…
पहाटेच्या ह्या स्वप्नाची कुपी जोडीदाराची ताटातूट झाल्यावरही मनपटलावर कायमची दिसत राहते…
धुक्या सारखीच…
अंधुक…
विरळ….
लेखक : श्री. विलास कुमार
प्स्तुती : सौ. मंजुषा सुनीत मुळे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈