श्री अमोल अनंत केळकर
वाचताना वेचलेले
☆ चोर – लेखक : अज्ञात ☆ प्रस्तुती – श्री अमोल अनंत केळकर ☆
☆
कालच इयत्ता सातवीची परीक्षा घेतली होती. त्या मध्ये एका विद्यार्थ्याने ‘ चोर ‘ या विषयावर लिहिलेला निबंध ….
” चोर हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे “
लोकांना हे खोटे वाटते, पण लक्षात ठेवा…..
चोरामुळे तिजोरी आहे, कपाट आहे, त्यांना लॉक आहे,
चोरामुळे खिडकीला ग्रील आहे, घराला दरवाजा आहे, दरवाजाला कुलूप आहे, बाहेर अजून एक सेफ्टी दरवाजा आहे,
चोरामुळे घराला/सोसायटीला कंपाउंड आहे, त्याला गेट आहे, गेटवर वॉचमन आहे, वॉचमनला वर्दी आहे,
चोरामुळे CCTV कॅमेरे आहेत, मेटल डिटेक्टर मशीन आहेत, चोरामुळे सायबर सेल आहे,
चोरामुळे पोलीस आहेत, त्यांना पोलीस स्टेशन आहे, त्यांना गाड्या आहेत, काठ्या, पिस्तुल आणि बंदुका आहेत, त्यात गोळ्या आहेत,
चोरामुळे न्यायालय आहे, तिथं जज आहेत, वकील आहेत, शिपायापासून कारकून आहेत,
चोरामुळे तुरुंग आहे, जेलर आहे, जेलमध्ये शिपाई आहेत.
मोबाईल, लॅपटॉप, तत्सम इलेक्ट्रिक आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच सायकल, बाईक, कार इत्यादी वस्तू चोरीला गेल्यावर माणूस नवीन वस्तू खरेदी करतो, आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेला हातभार लागतो,
चोर शब्दामुळे भाषेतील साहित्यकृतींमध्ये भर पडण्यास हातभार लागला आहे.
अलीबाबा चाळीस चोर ही कथा, प्रेम कथांमध्ये हमखास येणारा चोरटा कटाक्ष, चित्तचोरटी, क्रिकेट मधील चोरटी धाव व चोराची आळंदी हे गाव… यासारखे शब्दप्रयोग याची सर्वश्रुत उदाहरणं आहेत.
चोराच्या वाटा चोराला ठाऊक /चोरावर मोर /चोराच्या मनात चांदणे /चोर सोडून संन्याशाला सुळावर देणे /काडी चोर तो माडी चोर /चोराच्या उलट्या बोंबा /चोरांच्या हातची लंगोटी/ चोर तो चोर वर शिरजोर/ चोर चोरीसे जाये पर हेरा-फेरीसे न जाये…… यासारख्या अनेक म्हणी… यामुळे मराठी भाषा समृद्ध झाली आहे.
चित्रपटसृष्टीला अर्थ, प्रसिद्धी मिळवून देणारे चोरी मेरा काम / चितचोर /चोर मचाये शोर / चोरोंकी बारात यासारखे अनेक लोकप्रिय चित्रपट… अशा कित्येक घटकांना अस्तित्वात असणाऱ्या “चोर” या शब्दाचं सहाय्य मिळालं आहे.
राजकीय चोरांमुळे मात्र अर्थ-व्यवस्थेला कोणताही फायदा नाही….. ते फक्त स्वतः साठीच जगत असतात.
☆
लेखक : अज्ञात
संग्राहक : अमोल केळकर
बेलापूर, नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com