सौ. विद्या वसंत पराडकर
विविधा
☆ रामनवमी दिना निमित्त – कर्तव्यदक्ष, आदर्श, पुरुषोत्तम श्रीराम ☆☆ सौ. विद्या वसंत पराडकर ☆
भारतीय संस्कृतीचे श्रीराम एक व्यवच्छेदक वैशिष्ट्य आहे.परब्रम्हाचा तो सातवा अवतार आहे.पृथ्वीवर ज्यावेळी अत्याचार माजतो,मानवी जीवन विस्कळीत होते,दैत्याचे तांडव अमर्याद सुरु असते त्यावेळी पृथ्वीला हे सर्व सहन न होऊन ती गाय रुपाने वैकुंठात जगाच्या पालन कर्त्या कडे जाते.वत्याला विनवणी करते.या संकटातून मला वाचव.तेव्हा दुष्टांचा संहार व सृष्टांचे पालन करण्याकरता प्रभू पृथ्वीतलावर अवतार घेतात. श्रीरामांनी त्रेतायुगात भगवान विष्णूच्या दशावतारात सातव्या क्रमांकावर अवतार घेतला.तो दिवस होता चैत्र शुद्ध नवमीचा.पुष्य नक्षत्र,कर्क रास हा दिवस श्रीरामाच्या जन्माचा होय.भारतीय संस्कृतीच्या एका दैदिप्यमान हिर्याच्या तेजाने सर्व पृथ्वी चमकून गेली.एका आज्ञाधारक कर्तव्य दक्ष,आदर्श व्यक्तिमत्वाचा जन्म झाला..
त्रेतायुगानंतर व्दापार व नंतर आजचे कलियुग आहे.श्रीराम हे युगपुरूष आहे.रामायणाचा नायक श्रीराम आहे. आजही श्रीराम नवमी ठिकठिकाणी मोठ्या आनंदाने साजरी करतात.
रामायणाच्या कथेचा मध्यवर्ती बिंदू श्रीराम.गुरू वशिष्ठ यांचेकडून विद्या घेऊन पुढे ते विश्र्वास इतरांच्या मग रक्षणासाठी गेले.तेथे त्यांनी असुरांना आपल्या विद्येची चांगलीच चुणूक दाखवली.व आपल्या गुरुचे रक्षण केले.
आज्ञा शिरसावंद्य या न्यायाने आई व वडील यांच्या आज्ञेचे पालन केले.चौदा वर्षाचा वनवास पत्करला व राज्याचा त्याग केला.केवढी ही नि:स्वार्थी वृत्ती.
अंजनीसुत वीर हनुमान हा रामाचा प्रिय भक्त होता.श्रीरामाच्या संकट काळी तो वेळोवेळी कामास आला. लंकाधिपतीने जेव्हा सीतेचे हरण केले तेव्हा सीतेचा शोध लावण्यात हनुमानाला यश मिळाले.पुढे आपल्या विराट रुपाने लंकादहन केले. असा हा चिरंजीव हनुमान चारी युगात कार्यरत होता. व आहे.
रावण हे अंहकाराचे प्रतीक असलेला दुष्ट असूर.राम रावण युध्दात आपल्या युध्द नीतीने रावणाला पराभूत केले. ते श्रीरामानेच.
श्रीरामाचे अनेक गुण हे वाखाणण्यासारखे आहेत.तो एक अत्यंत प्रजादक्ष राजा, उत्कृष्ठ शासक, कर्तव्य निष्ठ राजा होता. आईवडिलांची आज्ञा पाळणारा आज्ञाधारक पूत्र ,एक पत्नीत्वाचा पुरस्कर्ता होता.एक बाणी,एक वचनी होता.
शुद्ध व निर्मळ मनाचे श्रीराम होते याचे उदाहरण म्हणजे वनवासातुन परत आल्यावर त्यांनी कैकयीच्या चरणावर प्रथम माथा ठेवला.
आज आपण कलियुगाच्या मध्यावर उभे आहोत.आजचा समाज बदलत आहे.संस्कृतीपासून लांब चालला आहे.संस्कृतीची मुल्ये लोप पावत आहे.
अशा परिस्थितीत भारतीय तत्वज्ञान व मुल्यांची जोपासना करण्यासाठी युगपुरुषांची गरज आहे.या भवसागरातून तरुन जाण्यासाठी श्रीराम व्यक्तीमत्व ही एक नौका आहे.
आजच्या दिनी युगपुरूषाचे स्मरण कृती युक्त अंत:कर्णाने केल्यास देशासमोर असणार्या बर्याचशा समस्यांचे निराकरण होऊ शकते.
© सौ. विद्या वसंत पराडकर
वारजे, पुणे.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈