सौ. अर्चना सुरेश देशपांडे
परिचय
बी.एससी, बीएड. २१ वर्षे हायस्कूल मध्ये नववी दहावी ला बीजगणित व सायन्स विषय शिकवले. मुख्याध्यापिका म्हणून निवृत्त झाले.
बोर्डाच्या बीजगणित परीक्षक व शास्त्र प्रात्यक्षिक परीक्षा परीक्षक एसएससी बोर्ड सेंटर कंडक्टर तीन वर्षे
छंद वाचन, लेखन व पर्यटन
दरवर्षी दोन तीन दिवाळी अंकात कथा छापून येतात
☆ विविधा ☆ अंगण ☆ सौ. अर्चना सुरेश देशपांडे ☆
ये ग ये ग चिऊताई! बाळाच्या अंगणी! तुला देईल चारा पाणी! माझी सोनुली राणी! असं म्हणताच माझा ५ वर्षांच्या नातवाने विचारले अंगण म्हणजे काय ग आजी? फ्लॅटमध्ये रहात असल्यामुळे प्रश्न पडणे स्वाभाविकच.
अंगण म्हणजे काय हे सांगताना मी बालपणी अंगणात रमून गेले.
अंगण म्हणजे घराची शोभा. अंगणातील तुलसी वृंदावन म्हणजे घराचं पावित्र्य. रेखीव रांगोळी काढलेल्या तुळशी समोर उदबत्तीचा सुगंध दरवळायला.याच अंगणात उंच मोरपिसाची टोपी घालून वासुदेव यायचा,माकडांचा खेळ रंगायच्या.बाहुला बाहुलीचे लग्न अंगणात लागायचे, वरमाई कोण आणि कोणाला वरमाईचा मान कोणाला द्यायचा याचं भांडण अंगणात जुंपायचे. दुपारी मुलींचे गजगे,काचकवडया,टिकरया तर संध्याकाळी मुलांचे गोटया, विटीदांडू, लगोरी हे खेळ रंगायचे.अबोली चे गुच्छ,तळहाताएवढे जास्वंदीचे फूल, मंजिऱ्या मुळे घमघमणारी तुळस अंगणात असायची. गुढीपाडव्याला गुढी, आषाढीला पालखी सजवून वारी निघायची.नागपंचमीला उंच झोक्याची चढाओढ चालायची. अंगणात हंडी फोडली जायची. काल्याचा प्रसाद खायचा काय सुरेख चव असायची काल्याची!
नवरात्रात फेर धरून हादगा चालायचा, उंच स्वरात हादगा गाणी चालायची. खिरापत हातात पडताच मुली शेजारच्या अंगणात धावत जात.
दिवाळीत किल्ला तयार करून त्यावर शिवाजी महाराज विराजमान व्हायचे. सर्व मुले आपल्या घरातील मावळे किल्ल्यावर उभे करायचे व किल्ला सजवायचे.
उन्हाळ्यात अंगणात पथारी पसरून गप्पा.विनोद, गाणी यांना ऊत यायचा.. मन भरलं की रातराणीचा,मोगरयाचा सुगंध घेत झोपी जायचं.
मी अंगणाच्या आठवणीत एवढी रमून गेले की “आजी मला दूध दे ना गं!” असे तो म्हणताच मी एकदम भानावर आले.
© सौ. अर्चना सुरेश देशपांडे
पुणे
मो. ९९६०२१९८३६
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈