श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ विविधा ☆ अहल्या – भाग-2 ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
(मागील भागात – इंद्रासारख्या देवराजाच्या विरुद्ध जाण्याची हिंमत कोण दाखवणार? त्यापेक्षा अहल्येला दोषी ठरवणं, अपराधी ठरवणं जास्त सोपं होतं. जास्त सोयीचं होतं. त्यामुळे त्यांनी तिच्याशी बोलणं टाकलं असेल. नातं तोडलं असेल. तिच्याबरोबर कुठलाही व्यवहार करणं टाळलं असेल. ती अगदी एकटी, एकाकी पडली असेल, रस्त्यावरच्या शीळेसारखी. ….. इथून पुढे -)
श्रीरामाने अहल्येचा उद्धार केला, याचा अर्थ एका बाजूने अहल्येच्या मनातली अपराधीपणाची भावना दूर केली असेल. संवेदनाशून्य आणि बधीर मनोवस्थेतून बाहेर यायला तिला मदत केली असेल. स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करून घ्यायला मदत केली असेल. तिच्यात संवेदना, चेतना निर्माण केल्या असतील. त्याचवेळी सामाजिकदृष्ट्या, अहल्या निरपराध आहे, हे ठामपणे सांगून, तिच्या कुटुंबियांनी आणि समाजाने तिचा स्वीकार करावा, असे आवाहन केले असेल.
‘नरेंद्र कोहली’ या हिन्दी लेखकाने रामायणावर आधारलेल्या आपल्या ‘दीक्षा’ या कादंबरीत ‘अहल्योद्धारा’चा हाच सामाजिक आशय उलगडून दाखवलेला आहे. राम हा युवराज. सम्राट दशरथाचा पुत्र. भावी सम्राट. तेव्हा त्याची मान्यता, ही सर्वसामान्य प्रजेच्या दृष्टीने महत्वाची ठरली. अनुकरणीय ठरली. अहल्येला रामाने समाजमान्यता मिळवून दिली. तिचं निर्दोषत्व ग्राह्य धरलं. तिला एक प्रकारे न्याय मिळवून दिला. या अर्थाने रामाने अहल्येचा उद्धार केला.
केव्हा तरी ‘विनय राजाराम’ या हिन्दी कवयित्रीची ‘तुम अहल्या नहीं हो’ ही कविता वाचली आणि ‘अहल्या’ या शब्दाचा एक वेगळाच अर्थ मनाशी उलगडला. इथे ‘अहल्या’ ही सामाजिक नीति-नियमांच्या, कल्पना- धारणांच्या प्रस्ताराखाली दबल्या गेलेल्या स्त्रीची प्रतिनिधी म्हणून यते. या स्त्रीला ना स्वत:चं मन, ना इच्छा-आकांक्षा, ना कल्पना-भावना, ना संवेदना-चेतना. म्हणून कवयित्री म्हणते, ‘समाजाच्या प्रतारणेच्या, फसवणुकीच्या प्रस्तराखाली दबलेल्या हे नारी, तू प्रस्तर ( दगड) नाहीस. तू परमाणू आहेस. (या विश्वाचे सृजन परमाणूपासून झाले, असे मानणारे एक तत्वज्ञान आहे.) त्यादृष्टीने तू विश्वाची जननी आहेस. निर्माती आहेस. ऊठ. जाग. स्वत:ला ओळख. आपल्या स्वत:च्या उद्धारासाठी, उन्नतीसाठी तू स्वत:च राम बन.
आपल्या स्वत:च्या विकल परिस्थितीला आपण स्वत:च अनेकदा कारणीभूत असतो, नाही का सख्यांनो? आपल्यातील ऊर्जेची, कार्यशक्तीची आपल्यालाच ओळख नसते. म्हणूनच आपली सखी कवयत्री ‘विनय राजाराम’ आपल्याला सांगते, ‘तू निश्चय कर, तू निश्चल नाही, चल बनशील.
‘अहल्या नहीं, हल्या बनोगी
मन-मस्तिष्क और कर्मशक्तीसे
अनुर्वरा नहीं, उर्वरा बनोगी’
हल म्हणजे नांगर. ‘हल्या’ म्हणजे नांगरण्यायोग्य, अर्थात सुपीक जमीन. ‘अहल्या’ म्हणजे बरड जमीन. ज्या जमिनीत नांगरणी-पेराणी करता येणार नाही अशी जमीन. ज्या जमिनीवर संस्कार करताच येणार नाहीत, ज्याच्यावा पडलेलं बीज, तसंच निष्फळ राहील, अशी अहल्या तू नाहीस. मन-बुद्धी, कर्म- शक्तीच्या योगाने तू ‘अनुर्वरा’ नाही, ‘उर्वरा’ बनशील. म्हणजे सुफलीत, सृजनशील बनशील. चांगल्या विधायक विचारांचं बी तुझ्या मन-बुद्धीत वाढेल. विकासेल. चांगलं कार्य तुझ्या हातून घडेल. नवसृजन होईल. ‘तू अहल्या नाहीस… अहल्या नाहीस…’
सखयांनो, आपल्या आसपास, जवळच्या- दूरच्या परिवारात एखाद दुसरी शिळेतील अहल्या आढळते. तिला दिलासा देणं, तिचा आत्मसन्मान जागृत करणं, तिला क्रियाशील बनवंणं, एवढं तरी आपल्याला करायलाच हवं नाही का?
समाप्त
© श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈