श्री अरविंद लिमये

☆ विविधा ☆ अनुकंपा…सहृदयतेतून उमटलेला हुंकार…!! ☆ श्री अरविंद लिमये ☆ 

‘परदु:ख शितल असतं’ असं म्हणतात.सर्वसाधारण अनुभवांती यात तथ्य आहे हे मान्य करावं लागतंच. तरीही या वास्तवाला छेद देणारे अपवादही आहेत आणि म्हणूनच त्या अपवादांच्या सत्कृत्यांच्या पायावरच हवेतीलच नव्हे, तर वैचारिक पातळीवरील प्रदूषणापश्चातही जग अजून अस्तित्त्वात आहे आणि जगणं आनंदी होण्यासाठीचा आशावाद सुध्दा..! हा आशावाद जागता ठेवलाय तो मानवी मनातल्या अनुकंपेने..!!

दुसऱ्याचं दु:ख, वेदना पहाताच स्वतः सुरक्षित अंतरावर न थांबता एखाद्या प्रतिक्षिप्त क्रियेसारखी तात्काळ मदतीला धावून जाण्याची मनात निर्माण होणारी असोशी ही अनुकंपेची जन्मदात्री..! त्या असोशीतून निर्माण झालेल्या सहवेदनेतूनच पाझरत रहाते तीच अनुकंपा! अशा सहवेदनेच्या स्पर्शानेच परदु:ख परकं न रहाता ते स्वतःचंच होऊन जातं. ते शितल नसतंच. चटके देणारं, कासावीस करणारच असतं. त्या कंपनांमधून परदु:खाला कवटाळण्याची जी ऊर्मी झेपावते तीच अनुकंपा..!

या अनुकंपेला त्या त्या वेळी,त्या त्या परदु:खाच्या तीव्रतेनुरुप पहाणाऱ्याच्या सहृदयतेतूनच अनेक वेगवेगळ्या भावना निर्माण होतात, ज्या करूणा, कळवळा, आस्था, कणव, कळकळ, अशा कोणत्याही रंगरुपाच्या असल्या, तरी सहानुभूती हा या सर्व भावनांमधला समान धागा असतो. कृपा, किंव, दया, या सारख्या तत्कालिक भावनांमधेही उपकाराची भावना ध्वनित झाली, तरी मूलत: असते ती सद्भभावनाच..!

अनुकंपा जगणं आणि जगवणं दोन्हीला पूरक असते. विध्वंसक विकृतीला परस्पर छेद देणारी अनुकंपा हा जगाच्या अस्तित्वाचाच मूलभूत भक्कम पाया असते. लहानपणा पासून कौटुंबिक पातळीवरुन होणारे संस्कार आणि शैक्षणिक पातळीवरील मूल्यशिक्षणातून अशा अनेक मूल्यांचे बिजारोपण होत असे आणि ती बिजं माती ओली असल्यामुळे खोलवर रुजतही असत.पण कालानुरुप वेग वाढवत सुरु असणाऱ्या कुटुंबसंस्थाच नव्हे तर शिक्षण आणि सामाजिक पार्श्वभूमीवरील सर्वदूर पडझडीमुळे खिळखिळी होत चाललेली मूल्यव्यवस्था पुन्हा पूर्ववत करणं ही आपल्या सर्वांचीच जबाबदारी आहे. त्यासाठी आवश्यक आहे ती थोडी जागरुकता आणि जाणवायलाच हवी अशी निकड!

अनुकंपेसारख्या सहवेदनांच्या हुंकाराला आवर्जून प्रतिसाद द्यायची सजगता ही आता काळाची गरज आहे एवढं खरं!!

© श्री अरविंद लिमये 

सांगली

९७२३७३८२८८

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
दीपा पुजारी

जगणं आनंदी होण्यासाठी आशावाद म्हणजे अनुकंपा!! किती सहज, सुंदर वाक्य!! लेख आवडला