श्री अरविंद लिमये

? विविधा ?

☆ अत्तर…… ☆ श्री अरविंद लिमये ☆

हास्य एक वरदान असतं विविध हसऱ्या रंगछटांचं..!

हास्य स्मितहास्य असतं..

कधी निरागस..कधी अवखळ.. कधी कांहीसं गूढही..!!

ते मिश्कील असतं..कधी खळखळाटी मस्तीखोर..   प्रसन्नही असतं कधी..उमलत्या फुलांसारखं टवटवीत..!

हास्य तुषार असतं..

क्वचित झंझावाती कल्लोळही..

कधी अस्फुट.. कधी मनमोकळं..

दिलखुलाससुध्दा…!!

क्वचित कधी फसवंही असतं हास्य.. अनाकलनीय..! एखादं दुःख लपवण्यासाठी चढवलेल्या किंवा कूट कारस्थानी चेहरा झाकू पहाणाऱ्या मुखवट्यासारखं..!!

क्वचित कधी कुत्सितही असतं ते.. कधी उपहासीही.. तरीही मुखवट्यांपेक्षा चेहऱ्यांवरच खुलून दिसतं हास्य..!

हास्य दुःखावर फुंकर घालणारं मैत्र असतं.. वेदनेला दिलासा देणारा स्पर्श असतं..!

… संकटांचं वादळवारं शमवणारं सरींचं शिंपण असतं.. कधी मन भरल्या अंधाराला छेद देणारा प्रकाशकिरणही असतं हास्य..!!

हास्य प्रसन्नचित्त चेहराच असतं माणसाचा.. मनाला हळुवार जोजवणारा झुलाही..!

ते माणसाच्या अंगभूत वृत्तीतूनच नजरेत विखरतं..

झिरपत हळूहळू पाझरतं..न्.. चेहऱ्यावर अलगद विलसतं..!!

हास्य कधी प्रखर नसतं.. कोवळं असतं.. सूर्याच्या गुलाबी पहाट-किरणांसारखं सुखवणारं!

चित्तवृत्ती फुलवणारं.. आसमंत सुगंधित करणारं जणू.. अत्तरच असतं हास्य..!

हास्य असं वरदानच असतं..  विविध सुगंधी रंगछटांचं..!!

©️ अरविंद लिमये

सांगली (९८२३७३८२८८)

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments