श्रीमती सुधा भोगले 

? विविधा ?

☆ असाही शेजारधर्म !! ☆ श्रीमती सुधा भोगले ☆ 

आम्ही राहत असलेल्या त्या इमारतीत खालच्या दोन सदनिकाच भाड्याने दिल्या होत्या. वरच्या दोन सदनिका मोकळ्याच होत्या. बँकेतील अधिकारी, सरकारी अधिकारी, अशा व्यक्तींची काही कालांतराने बदली होतेच. त्यामुळे मालकानी अशा व्यक्तींनाच घर भाड्याने देण्याचे ठरविले होते. आम्हीही बदलीमुळे या शहरात आलो होतो. त्या सदनिका ऐसपैस, चांगल्या होत्या. तेथे आम्ही आमचा बाड-बिस्तरा हलवला.

शेजारी एक जण राहतात एवढंच ठाऊक होतं. पुढे सामान लावल्यावर सवड झाली तेव्हा कळले की आपले शेजारी आयकर अधिकारी राहतात. त्यांची मुले माझ्या मुलांपेक्षा वयानं मोठी होती. मुलांच्या आई फारशा कोणात मिसळत नसत. पण बोलक्या होत्या. त्यानंतरही दोन कुटुंबे येऊन गेली.

नंतर खालच्या सदनिकेत एक बँक अधिकारी राहायला आले. वरच्या मजल्यावरची सदनिकाही दिली गेली. शैला, तिची दोन लहान मुले, यजमान, एवढेच मर्यादित कुटुंब होते. ते व्यावसायिक होते. खाली राहणाऱ्या बँक अधिकाऱ्यांशी त्यांची आधीपासून ओळख होती. शैलापेक्षा मी प्रौढ होते. तिचा लहानबाळ श्रेणिक सहा महिन्यांचाच होता. आम्हाला लहान मुलांची आवड असल्याने तो आमच्याकडे बरेच वेळा असे. त्याला आमचा लळा लागला होता. शैला कर्नाटकातील होती. सुरुवातीला तिला मराठी भाषा अवगत नव्हती. हळूहळू बोलायला शिकली.

ती स्वयंपाकात, लहान वय असूनही सुगरण होती. करणं-सवरणं, सर्वच पदार्थ खमंग होत. ती नेहमी असे खमंग पदार्थ घेऊन येई. तिची वांग्याची भाजी अजूनही जिभेवर रेंगाळते. आता स्वत:ची घरे झाली. सहवासात अंतर पडलं. खायचा योग येत नाही. मुले म्हणतात एकदा शेटे काकूकडूनच वांग्याची भाजी करून आण. आमची मनं छान जुळली होती.

सगळ्या जणीच अशा सरमिसळून वागणाऱ्या असतातच असे नाही. नवीन शेजारीण कुलकर्णी वहिनीही अशाच मिसळून जातील असे वाटले होते. आता शेजार मिळाल्याने मी आनंदात होते. सर्वांनी एकत्र यावं. अंगतपंगत करावी. सणासुदीला एकमेकांनी सण साजरा करावा, अशी विचारसरणी मी बाळगून होते.

माझी फार वर्षांपूर्वीची पद्मा ही मैत्रीण ह्याच गावात बदलून आली होती. ती ह्यांच्या ऑफीसमधील मित्राची बहीण होती. ठाण्यात असताना हे मित्र आमचे शेजारीच राहत. तीही मधूनमधून भावाकडे येई. त्यामुळे आमची ओळख मैत्रीत रूपांतरित झाली. तिचा आमचा पाठशिवणीचा खेळ चालू होता. आमची बदली कोल्हापूरला झाली. तीही कोल्हापुरात बदलून आली. इथे सांगलीतही आम्ही मागे-पुढे दाखल झालो. त्यामुळे पुन्हा मैत्रीचे धागे जोडत होतो.

पद्मा उत्तम लोकरीचे स्वेटर, मफलर मशीनवर करीत असे. तशी ती कलाकारच होती. आम्ही तिचे कौतुक करीत असू. मी कधीतरी करून आणलेला स्वेटर घातला की सर्व जण विचारीत कोठे घेतला. किती छान आहे.

असेच एकदा शेजारी गप्पा मारताना, स्वेटरचा विषय निघाला. नवीन आलेल्या कुलकर्णी वहिनीही होत्या. त्यांनाही तो स्वेटर आवडला. मी त्यांना माझ्या मैत्रिणीचा स्वेटर करण्याचा व्यवसाय असल्याचे सांगितले. त्यांनी माझ्याकडे पद्माचा पत्ता विचारून घेतला. मधले काही दिवस मी माझ्या दैनंदिन कामात व्यग्र होते. मधल्या काही दिवसांत आम्ही शेजारणींची गप्पाष्टकेही रंगली नाहीत. एके दिवशी, कुलकर्णी वहिनी, येऊ का, म्हणत घरी आल्या. मी म्हटलं, “आवरलं सकाळचं सगळं!” त्या “हो” म्हणाल्या. थोड्या वेळ इकडल्या तिकडल्या गप्पा झाल्या. बोलता, बोलता त्यांनी त्या पद्माकडे स्वेटर करायला दिल्याचेही सांगितले. पुढे आणखीन काहीतरी त्यांना सांगायचे होते. मी चहा करायला आत गेले. चहा पिऊन झाल्यावरही त्या घुटमळत होत्या. त्या पद्मा वहिनी आहेत ना. “त्या तुमच्याविषयी सांगत होत्या!”

“काय सांगत होत्या?” मी विचारले. “तुम्ही ठाण्याला त्यांच्या भाऊ-वहिनी शेजारीच राहत होतात ना!” मी हो म्हटले. मग तेव्हा तू-तुम्ही म्हणे त्यांच्या भावजयीला, नणंदेशी चांगले वागू नका असे सांगत होता. “कशाला चोळी-बांगडी करता, काही देऊ नका वगैरे वगैरे. हे खरंच त्यांनी मला सांगितले. मी म्हटलं, “अहो, असे ती म्हणणार नाही. आमचे खूप वर्षांचे संबंध आहेत. तुमचा ऐकण्यात गैरसमज झाला असेल!” त्या नंतर घरी गेल्या.

मनातून मी अर्धमेली झाले. जिच्याबरोबर एवढ्या वर्षांची ओळख आहे. दोघी शिवण क्लासला बरोबर जात होतो. कोल्हापूरलही जवळजवळ राहत होतो. कशावरून कधीच धुसफूस झाली नाही. ह्या कुलकर्णी वहिनी अंगचेच काही सांगतात की पद्मा तसे…? मी कधीच चुगल्या खाल्ल्या नाहीत असे शिकवायला, त्या वेळी मी नवविवाहित, पोरसवदा होते. तिच्या वहिनी सहा मुलांची आई. हे पटणारच नव्हतं. कळ लाव्या नारदाची भूमिका मी कधीच केली नाही. आजपर्यंत हे तत्त्व पाळलंय. ज्येष्ठ नागरिक असून पुढच्या हयातभर ह्या तत्त्वाशी एकनिष्ठच राहीन.

थोडे दिवस मनस्ताप झाला. काही सुचत नव्हतं. पद्मा, तिच्या वहिनी साऱ्यांचे चेहरे डोळ्यांपुढे नाचत. जे कधीच केले नाही त्याचे बालंट माथी का घेऊ? मग सरळ पद्माकडे जायचे ठरविले. तिला विश्वासात घेऊन, कुलकर्णीबाईंचे वक्तव्य सांगायचे. त्या दिवशी तिच्या घरी गेले. तिचे यजमानही घरीच होते. मी सर्व हकिकत दोघांना सांगितली. दोघांनाही धक्काच बसला. तिच्यावरही हा नसता आरोप केल्यासारखे झाले होते. माझ्याविषयी तिचे असे मत कधीच नव्हते. त्यामुळे, गैरसमजाचं मळभ दूर झाले. मनावर आलेला ताण एकदम ओसरला. आम्हा दोघींत पूर्वीचा जिव्हाळा, आपुलकी व प्रेम तसेच राहिले. पुढे उलट अधिक गडद झाले. पुढे माझ्या बॅडमिंटन ग्रुपला तिला जोडून घेतले. तिची बदली पुण्यात झाली तरी आम्ही भेटत राहिलो. आमचं नातं रेशीमबंधांनी बांधलेलं घट्टच होतं. ते काही कोणाच्या साध्या माऱ्यानं तुटणार होतं थोडंच!

या इमारतीत वरच्या सदनिकेत राहणारी शैला अशीच काही दिवसांकरिता माझ्यापासून दूर केली गेली. तिच्या समभाषिक या भगिनींनी येऊन तिला आपलंसं केलं. पुण्या-मुंबईसारख्या शहरात राहिल्याने नोकरी केल्यामुळे, अंगी तरतरीतपणा बाणला होता. दुचाकीवरून पटापट कामे करायला जाणे, बॅडमिंटन खेळणे, तीन मुलं असूनही उरकून सगळ्यात पुढे असणे, असे इतरांपेक्षा वेगळेपणही काहींना खुपत असते. बायकांचा हेवा, मत्सर करण्याचा अनादिकालापासूनचा स्वभाव, आर्थिक बाबतीत केलेली तुलना इत्यादी अनेक क्षुल्लक कारणांकरिता ‘बायका एकमेकींना पाण्यात पाहतात. त्यामुळे चांगली नाती जोपासणं, बांधणं वेळप्रसंगी अवघड होतं. उलट मनावर तणावच वाढतो.

माझे तसेच झाले. या नव्या शेजारणींनी शैलाला आपलंसं केलं. आपल्या गटात ओढून घेतलं. मला, माझ्या मुलांना बाजूला टाकलं. पण मी स्थितप्रज्ञ राहण्याचा प्रयत्न केला. माझ्या दैनंदिन कामात, खेळात स्वत:ला गुंतवून ठेवले. एकमेकींशी हसत-खेळत वागावे. मोकळेपणे बोलावे. याला काही पैसे पडत नाहीत. पण या नव्या शेजारणीचा दुही पाडण्याचा अनुभव मनाला टोचत राहिला.

पुढे या बदलीवाल्या, आपलं बिहाड-बाजलं घेऊन नवीन ठिकाणी गेल्या. आमच्या स्मरणातूनही त्या गेल्या. आम्ही दोघी मात्र या गावचेच होऊन राहिलो. शैला माझी शेजारीण घरच्या सारखीच राहिली आहे. तिला माझ्या जुन्या भिशीत जोडून घेतलं आहे. लांब राहत असलो तरी भिशीच्या माध्यमातून निदान महिन्यातून एकदा भेटतोच.

मध्यंतरी माझ्या सासूबाई अत्यवस्थ आजारी होत्या. ते इस्पितळ शैलाच्या घराजवळच होते. त्यादिवशी मी रात्री घरी जाऊ शकत नव्हते. हक्काने दोन घास जेवायला तिच्या घरी गेले. पुढचे काही दिवस ती सकाळचा नाश्ता घेऊन माझ्याकडे इस्पितळात येत असे.

मैत्रीची, नात्यातील माणसामाणसांतील प्रेमाची, स्नेहाची, आपुलकीची रेशीमबंधने विणली जातात. घट्ट धागे जुळतात कधी न तुटण्यासाठी, क्षणैक आलेल्या वादळामुळे, कु-प्रवृत्तीच्या माणसांमुळे थोड्या कारणाकरिता जरी तुटायचे म्हटलं तरी इतके चिवट असतात की ते तुटत नाहीत आणि तुटले तरी पुन्हा जोडले जातात. चरख्यावर सूत काढताना धागा तुटला तर आपण पुन्हा दोन धागे बेमालूम जोडतोच ना. तशी ही मनं पुन्हा सांधली जातात, जुळतात. जगाची रीतंच आहे तशी!

© श्रीमती सुधा भोगले 

९७६४५३९३४९ / ९३०९८९८९१९

≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
3 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments