सौ. दीपा नारायण पुजारी

? विविधा ?

☆ अनमोल भेट ☆ सौ. दीपा नारायण पुजारी 

भेटवस्तू. . .  

” एक साधन असतं, नात्यांना जपणारं

                  एक माध्यम असतं, भावना जाणणारं”

आपल्याला प्रत्येकाला हवीहवीशी वाटते भेटवस्तू, छान छान गोष्टी भेट म्हणून मिळाव्यात अशी इच्छा असतेच सगळ्यांचीच. . भेट म्हणजे काय हे न समजणाऱ्या अजाणांची आणि आत्तापर्यंत अनेक गोष्टी भेट म्हणून मिळालेल्या सुजाण ज्येष्ठांची देखील. बाहुला-बाहुली, चेंडू, खेळणी या बालभेटीतून सुरु होत असलेला हा खजिना . . . वयानुसार कात टाकतो. . महागड्या, आराम देणाऱ्या, मौल्यवान वस्तूंची लयलूट भेट म्हणून केली जाते. कपडे, दागिने, मोबाईल एवढंच कशाला काहींना तर चारचाकी सुध्दा दिली जाते बरं का भेट म्हणून… . काहींना मात्र चॉकलेट, बिस्किटे, लाडू, पिझ्झा, केक अशा रसदार, चवदार पदार्थांची भेट घ्यायला आवडते.

असो.आस प्रत्येकाची, हो ना?

मी ही काही वेगळी नाही बरं. मलाही गिफ्टस् द्यायला आवडतात. घ्यायला तर त्याहूनही आवडतात. काही खास दिवस, खास लोकांनी गिफ्ट दिलीच पाहिजे असा आग्रह नसला तरी आस लागलेली असतेच मनात.. . माझ्या एका  वाढदिवसाला मला अशीच एक आगळी भेट मिळाली. वाढदिवसाच्या निमित्तानं मी नानामामांना भेटायला गेले होते. त्यांना नमस्कार करताच भरभरून तोंडभरून आशीर्वाद मिळाला.”अगं, ते पाकीट दे तुझ्या कडं ठेवायला दिलंय ते.”, मामांनी सुमनमामींना सांगितले. मामींनी दिलेलं पाकीट पर्स मध्ये ठेवतच होते तोच मामा म्हणाले,

“अगं, उघडून बघ ना बाळ.”

मामी हसून म्हणाल्या, “हो ना, काय आहे त्या पाकिटात मलाही माहित नाही. तुझ्या मामांनी बघू दिलंच नाही.”

सुमन मामी नेहमी हसून बोलत.”अय्या! खरंच.” माझी उत्सुकता आता शिगेला पोहोचली. मी चटकन उघडलं पाकीट. अरे हे काय? उघडंच तर होतं ते. आतून एक फोटो बाहेर आला. तो बघून माझ्या हातातलं ते रिकामं पाकीट गळून पडलं. तो फोटो दोन्ही हातात अलगद धरुन मी मामींच्या शेजारी बेडवर बसले. दोघींच्या डोळ्यात पाणी आलं. गळा भरुन आला. ओठांवर मात्र किंचितस स्मित होतं.

फोटो माझ्या लग्नातला होता. कार्यालयात शालू नेसून बसलेली मी आणि माझ्या शेजारी माझी आजी. . . . हा फोटो कुणी काढला ? मला कळलंच नव्हतं तेंव्हा. नानांनी तो जवळपास दहा वर्षे सांभाळून ठेवला. इतका आनंद झाला म्हणून सांगू. आठवणी फेर धरुन नाचू लागल्या.

नऊवारी नेसणारी, उंच, कृश, गोरी आजी. तिचा सात्त्विक साधा चेहरा. घट्ट दुमडलेली लहान, नाजूक जिवणी. मऊसूत, गुलाबी सायीचे हात.मी एकदा खेळताना जोरात आपटले होते. हातपाय मोडले नाहीत, पण त्यांनी काही दिवस अस्मादिकांशी असहकार पुकारला होता. याच हातांनी तेंव्हा माझे दात घासले होते.. . .  फोटोतून माझ्याकडं बघून हसणारे तिचे डोळे एकदा माझ्यासाठी रडले होते. फॅशन च्या नावाखाली  लांब केस कापून मी घरी गेले तेंव्हा. तशी हळवी वाटणारी आजी; कृष्णाच्या, रामाच्या गोष्टी रंगवून सांगताना, आयुष्याचं तत्त्वज्ञान सहज सांगून जात असे ती.  किती रविवार गेले तिच्या बरोबर रेडिओ वरची प्रवचनं ऐकण्यात. जास्त करुन तिच्या तल्लीन चेहऱ्यावरील भक्ती निरखण्यात. तिची भक्ती श्रीकृष्णावर आणि माझी तिच्यावर. नारळ कसा खवणावा इथंपासून ते पुरणपोळी जिभेवर विरघळण्यासारखी झाली पाहिजे पर्यंत स्वैपाकघरातल्या खास टिप्स तिनं दिल्या. याबरोबरच व्यवहारज्ञान दिलं. नुसती डिग्री नको प्रोफेशनल डिग्री प्रत्येक मुलीनं घेतली पाहिजे या बाबतीत ती आग्रही होती. काम केल्यानं बोटं झिजत नाहीत, असं म्हणे ती.. पाय जमिनीवर ठेवा. . प्लेगच्या साथीत आई वडील, भाऊ गमावल्यामुळं की काय. . . नाती जपण्यात, भावनांची कदर करण्यात तिला समाधान लाभे.

. . . अशा कितीतरी गोष्टी तिच्याकडूनच शिकले.

इतकंच कशाला हसतमुख, प्रेमळ सुमनमामी आणि आमचे नानामामा यांची पहिली भेट तिच्याच घरी झाली. माझी आजी म्हणजे नानामामांची काकू. माझी आई आणि नाना मामा चुलत बहीण भाऊ. माझे हे मामामामी मेड फॉर इच अदर. नात्यातला गोडवा वानप्रस्थाश्रमापर्यंत टिकून राहिला होता. किंबहुना जुन्या मोरावळ्यागत मुरला होता. पण हे स्वतः तच गुरफटलेलं, रमलेलं जोडपं नव्हतं.काही माणसांना देव आनंद वाटण्यासाठी या जगात पाठवत असावा. समाधानाचा पिंपळ त्यांच्या अंगणात सदैव सळसळत असे. प्रसन्न चेहरा, प्रसन्न व्यक्तिमत्त्व, लाघव अशा स्वभाव वैशिष्ट्यांमुळे कुणालाही वश करत असत दोघं. सगळ्यांच्या आवडीनिवडी लक्षात ठेवून तशा गिफ्ट्स देण्याचा त्यांचा आग्रह असे . त्यात त्यांना परमानंद मिळे. त्यांच्या भेटीत आपुलकीचा ओलावा जाणवे. कोरडा व्यवहार न बघता, हिशेब न ठेवता, भावनेची कदर करणाऱ्या त्यांच्या भेटींनी कितीक रेशीम बंध गुंफले!!

पारिजातकाच्या फुलांच्या सड्यासारख्या आजोळच्या आठवणींनी मनाच्या अंगणात केशरसडा शिंपला. या स्मृती फुलांनी माझं मन सुगंधीत केलंय.  महागड्या, मोठ्या, किंमती वस्तूंपेक्षा नानामामांनी दिलेला तो फोटो माझ्यासाठी अमूल्य आहे. आजीची आठवण जागवणारा  तो फोटो मी मनापासून जपून ठेवलाय.

कुणीसं सांगितलंय. . .

    “भेट द्यावी भेट घ्यावी

    त्यात व्यवहार नसावा

   आपुलकीचा ओलावा

   वस्तूत खोल जाणवावा. . . .

 

             दिले काय घेतले काय

             हिशेब नको ठेवायला

             भावनेची कदर करावी

             नात्यांना जपायला.”

© सौ. दीपा नारायण पुजारी

इचलकरंजी

9665669148

[email protected]

≈संपादक–श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

1 Comment
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments
सौ अपर्णा देशपांडे

सुंदर लेख.मलाही द्यायला आवडते आणि देवून झाले की मी ते लक्षात ठेवत नाही.पुढील कितीतरी भेटीत ती व्यक्ती आपणहून सांगते तेव्हा परत आनंद मिळतो