श्री अरविंद लिमये
☆ विविधा ☆ अनेकरंगी शब्द-बहारदार ☆ श्री अरविंद लिमये ☆
‘बहारदार’ हा एरवी मी अनेकदा ऐकलेला, वाचलेला आणि स्वत: ही बर्याचदा वापरलेला शब्द..! पण आज लेखनाचा विषय म्हणून याचा विचार सुरु झाला,तेव्हा या शब्दाने शब्द आणि भाषा यांच्यातल्या नात्यांचे बहारदार रंग अधिकच रंगतदार होत असल्याची समृध्द करणारी जाणिव मन प्रसन्न करुन गेली.
‘बहर’ म्हंटलं कि निसर्ग आठवतो आणि बहार हा शब्द अनेक जुन्या हिंदी सिनेमांच्या सुखद बहारदार आठवणी ताज्या करतो.बहर या शब्दात सुगी,सराई,मोसम,अशा अनेक सुखद विविधरंगी निसर्गावस्था जशा लपलेल्या लपलेल्या आहेत तसेच बहर हाच शब्द नव्हाळी, टवटवी, ताजगी, जोम अशा विविध अर्थरंगातली नवतारुण्याची चाहूलही सूचित करतो.
‘बहार’ या शब्दाने जागवलेल्या अनेक जुन्या हिंदी चित्रपटांच्या आठवणी बहार या शब्दाचे विविध रंग अधोरेखित करणार्याच आहेत. ‘बहार’, ‘बहारोंके सपने’,’बहारे फिर भी आयेंगी’ही अशा काही चित्रपटांची प्रातिनिधिक उदाहरणे. ‘बहार’ हे चित्रपटाचे नाव. त्या नावात समृध्दी, भरभराट, संपन्नता यातल्या समाधान, संतुष्टता यांचे सूचन आहे. ‘बहारों के सपने’ विपन्नावस्थेतील गरीबांनी पाहिलेली समृध्दीची स्वप्ने रंगवणारा वाटतो, तर ‘बहारे फिर भी आयेगी’ निराश मनोवस्थेला दिलासा देणारा हेही दिवस जातील अशा आशावादाचा परिसस्पर्श करुन सावरु पहाणारा असल्याचे लक्षात येते.
बहर, बहार या शब्दांनी अशा अनेक उमलत्या आनंद सौख्य, समृध्दीच्या अर्थरंगानी आपल्या मनात सुखद असोशी निर्माण केलेली असते.पण या सुखद वास्तवाचा मोसम कायम टिकणारा नसतो हे आपण गृहीत धरलेले नसेल तर बहरानंतर येणारा शिशीर आपल्याला अधिकच चटके देणारा वाटण्याची मात्र शक्यता असते.तसे होऊ नये म्हणूध बहर असो वा शिशिर दोन्हीही क्षणभंगूर आहे हे लक्षात घेऊन सुखात तरंगत न रहाता,आणि दु:खाने खचून न जाता या दोन्ही अवस्थेत मनाला सावरणारे ओठावरले गाणे आपण अलगद जपायला हवे.
बहारदार या शब्दनिर्मितीतील वैशिष्ठेही लक्ष वेधून घेणारी आहेत. बहार आणि दार या दोन शब्दांनी बनलेला हा संयुक्त शब्द..! एक नाम आणि दुसरा विशेषण. नामाचं वर्णन करण्यासाठी एरवी विशेषण वापरले जाते आणि ते नामाच्या आधी येते आणि आपलं वेगळं अस्तित्व जपतही असते. उदाहरणार्थ -सुखद धक्का, दुष्ट माणूस, लाल गुलाब इत्यादी. ‘बहारदार’ मधे मात्र ‘बहार’ या नामाच्या नंतर ‘दार हे विशेषण येते. गंमत म्हणजे हे विशेषण स्वत:चे वेगळे अस्तित्व न जपता त्या नामाशी संलग्न होते. पण हे होत असताना स्वत:चं वैशिष्ठ हरवत नाही.तर प्रत्यय बनून त्या नामालाच स्वत:त सामावून घेऊन स्वत:चा रंग त्याला देते. म्हणजे इथे ‘ दार ‘ या विशेषणाच्या स्पर्शाने ‘बहार’ या नामाचे बहारदार या वेगळ्या विशेषणात रुपांतर होते. दार हा शब्द श्रीमंत या अर्थाचा.बहार म्हणजे सौंदर्याची, रंगरसांची, अभिवृध्दीची श्रीमंती..! बहारदार सादरीकरण, बहारदार रंगत, बहारदार अभिनय, याप्रमाणे हे विशेषण वापरले जाते. दार या विशेषणाच्या प्रत्यय रुपातल्या नामसंलग्नतेतून तयार झालेली चवदार, रंगतदार, मजेदार अशी इतरही उदाहरणे आहेत.
‘बहारदार’ या शब्दाच्या स्पर्शाने माझ्या मनात उमटलेले हे विचारतरंग भाषासमृध्दीसाठी निदान माझ्यापुरतेतरी शब्दांशी खेळायला प्रवृत्त करणारे ठरलेयत हे मात्र खरे..!
© श्री अरविंद लिमये
सांगली
मो ९८२३७३८२८८
≈ श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈