सौ.अंजली दिलिप गोखले
☆ विविधा ☆ अब्राहम लिंकन ना पत्र ☆ सौ.अंजली दिलिप गोखले ☆
‘लिंकन साहेब, बऱ्याच वर्षापूर्वी तुम्ही माझ्या सारख्या एका सामान्य शिक्षकाला अतिशय मनापासून जबाबदारी चे पत्र लिहिले होते. तुमच्या गोंडस गोड मुलाला घडविण्याचे काम सोपविताना त्या शिक्षकाला मानाचे स्थान दिले होतेत.
लिंकन साहेब एका कायम स्वरूपी विनाअनुदानीत शिक्षकाचे तळमळीने लिहिलेले हे पत्र वाचाल ना?
तुमचे ते पत्र, तरुणपणी वाचूनच मी मोठ्या ध्येयाने प्रेरीत होवून , जिद्दीने, कष्टाने, एक नाही, दोन नाही, तीन पदव्या मिळविल्या. त्या मिळवताना झालेल्या माझ्या कष्टाची मला फिकिर नाही . पण लिंकन साहेब, त्यासाठी माझ्या आईच्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या कधी काढल्या गेल्या, मला समजले नाही . त्या पदव्या मिळवत असताना, माझ्या वडिलांच्या चेहऱ्यावरील काळजीचे जाळे मी कधीच विसरू शकत नाही. त्यांना निर्मळ आनंद मी कधी आणि कसा देऊ शकेन याचाच विचार माझ्या मनामध्ये कायम पिंगा घालत असतो.
मात्र लिंकन साहेब, माझ्या या त्रासाचा परिणाम मी माझ्या विद्यार्थ्यावर कधीच होवू देणार नाही . जो थोडा वेळ मला, त्यांना ज्ञानदान करायला मिळतो, तो मी सार्थकी लावतो . त्यांना मनापासून शिकवतो . मला ज्या काही चांगल्या गोष्टी माहिती आहेत, त्या त्यांना समजावून देण्याचा मी आटोकाट प्रयत्न करतो. त्यांच्या समवेत मला थोडाच वेळ मिळतो, कारण कायम स्वरूपी विना अनुदानीत शाळेत तासिका तत्वावर मीकाम करतो . खरच सांगतो, लिंकन साहेब , माझ्या कामावर मी मनापासून प्रेम करतो.
त्या प्रेमाचा मोबदला, माझ्या आईवडिलांना समाधान देण्यात मला उपयोगी पडत नाही, हीगोष्ट माझ्या मनाला खूप सलते , यातना देते . मात्र यावरती मी विचार करून मार्ग शोधलाय . शाळेमध्ये शिकवून झाल्यावर, माझ्या एका विद्यार्थ्याच्या शेतामध्ये मजूरी करून मिळकत वाढवायचे मी ठरवले आहे. परिश्रम, कष्ट, आणि मेहनत याच्या जोरावर मी आई वडिलांना समाधान देणार आहे . त्यांच्या चेहऱ्यावरील हसू मला पहायचे आहे.
मी एक हाडाचा शिक्षक आहे आणि माझ्या विद्यार्थ्यांसाठी आयुष्यभर मी कार्यरत रहाणार आहे.
न हरणारा कायम
स्वरूपी
विनाअनुदानीत
शाळेतला एक
शिक्षक.
© सौ.अंजली दिलिप गोखले
मिरज
फोन नंबर ८४८२९३९०११
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈