सुश्री विभावरी कुलकर्णी
🔅 विविधा 🔅
☆ अचूक चुकीची वेळ… ☆ सुश्री विभावरी कुलकर्णी ☆
दोन दिवसापूर्वी एक वाक्य ऐकले आणि लगेच त्याचा प्रत्यय पण आला. ते वाक्य एका गाण्याच्या कार्यक्रमात ऐकले. ज्या वेळी प्रत्यक्ष कार्यक्रम म्हणजे लाईव्ह प्रोग्रॅम बघतो त्या वेळी असे अनुभव येतात. त्या कार्यक्रमात तबलजी इतका निष्णात होता. की त्याने लावणी पूर्वीची ढोलकी तबल्यावर वाजवली. ऐकायला फारच अप्रतिम! डोळे बंद केल्यावर तर हा तबला आहे यावर विश्वास ठेवणे अवघड होते. त्यातील निवेदकाने आधीच एक वाक्य वापरले होते, ते म्हणजे वेळेवर शिट्टी येऊ द्या. आणि ते वाक्य ऐकून हसू आले. कारण माझीच कायम अशी फजिती होते. लावणीला शिट्टी मारायची तयारी केली तर ती पुढच्या भक्तिगीताला तरी वाजते किंवा एखाद्या दुःखी गाण्यात तरी वाजते. मग असे होऊ नये म्हणून मी तो नादच सोडला आहे.
अजून एक प्रसंग आठवला एका अंत्य यात्रेत कोणाचा तरी फोन वाजला आणि रिंगटोन वर गाणे वाजले अकेले अकेले कहा जा रहे हो सोबतच्या लोकांना मोठाच पेच पडला, हसावे की रागवावे?
काही प्रसंग तर असे घडतात की आपण विचारात पडतो. एका लग्नात बँडवर गाणे वाजत होते छोड गये बालम आणि दिल का खिलौना टूट गया किंवा परदेसियो से ना आंखिया मिलाना ही तर जणू लग्नात वाजवण्याची फेवरेट गाणी.
आणि पूर्वीच्या लग्नाच्या पंक्तीत कायम शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे श्लोक ऐकू यायचा. पूर्वी लग्न लागल्या नंतर नवरी वरपक्षाच्या खोलीत जायची. तिथे सगळे कौतुकाने तिच्याकडे बघत असायचे. कोणी चेष्टा करायचे,तिच्याशी बोलायचा प्रयत्न करायचे. अशाच एका प्रसंगाची नेहेमी आठवण येते. अशाच एका लग्नात त्या वधूला गाणे म्हणण्याचा आग्रह झाला. आणि तीने गाणे म्हंटले न जाओ सैया हे ऐकून काय प्रतिक्रिया आली असेल, कल्पनाच करु शकत नाही.
अशा गमती जमती पावलो पावली अनुभवायला मिळतात. मुले तर फार मजेशीर असतात. मुलांच्या व शाळेत अनुभवलेल्या गमती जमती पुन्हा केव्हातरी.
अशी गंमत फजिती कायम अनुभवायला येते. आणि काय प्रतिक्रिया व्यक्त करावी हेच कळत नाही.
© सुश्री विभावरी कुलकर्णी
हिलिंग, मेडिटेशन मास्टर, समुपदेशक.
सांगवी, पुणे
📱 – ८०८७८१०१९७
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈