सुश्री मंजिरी येडूरकर
विविधा
☆ असंही एक नातं ! ☆ सौ.मंजिरी येडूरकर ☆
यमुनेचे नितळ पाणी शांत होतं. मधूनच वाऱ्याची एखादी झुळूक येऊन पाण्याची लय हलकेच बदलून जात होती. राधा आणि तिचा मोहन, दुसरं कुणीच नव्हतं यमुनेवर! आज काय झालं होतं कुणास ठाऊक, नेहमी इतका बोलणारा कान्हा आज जरा गप्पच होता. शेवटी राधाच म्हणाली, “बासरी वाजव नां!” त्याने बासरी ओठांना लावली पण आज भैरवीचे सूर लागले होते. राधेला विचारावं वाटलं पण ती त्या सुरात इतकी हरवून गेली होती की शब्द सपडलेच नाहीत. बासरी थांबली अन् ती भानावर आली.
लगेच उठून म्हणाली, “उशीर झाला, जायला हवं.”
आर्जवी स्वरात तो राधेला म्हणाला, “इतक्या लवकर?”
“पाहिलसनं रात्र पश्चिमेला सरायला लागली.”
“तरी अजून थोडा वेळ?”
“तो थोडा वेळ संपतो का कधी? चल, निघू या.”
ती चालायला लागली, तो तिच्या मागे.
आज तिला अर्थ कळतोय, ती भैरवी, तो आर्जवी स्वर यांचा!
जेंव्हा अक्रुराचा रथ माधवाला
नेण्यासाठी आला आणि सारं गोकुळ आक्रंदत होतं, नेऊ नको माधवा, अक्रुरा! राधाही पळत होती, पण तिला काय होतंय काही कळतच नव्हतं. ना माधवानं रथ थांबवला ना मागे वळून पाहिलं. तिचा कृष्ण गेला होता, तिचा निरोपही न घेता! परतताना यमुनेच्या काठावरच्या वाळूतून मंद पाऊले टाकत राधा निघाली. वेड्यासारखी कालची त्याची पाऊलं शोधत होती. तिच्या लक्षात आलं, कोणतीही खूण मागे न ठेवता तो गेला. तिच्या मनात आलं, “कालच त्यानं मला का नाही सांगितलं? मी काय अडवलं असतं कां? नाही! एवढं सहज त्याच्यापासून दूर जाणं जमलं असतं मला? मी ही कदाचित असाच आकांत केला असता, पायाला घट्ट मिठी मारून बसले असते, जाऊच दिलं नसतं त्याला! हे आयुष्य तर तुलाच समर्पित आहे. तू कुठेही असलास तरी!”
कृष्ण आणि राधा यांची गोष्ट इथेच संपली. ना तो नंद-यशोदेत गुंतला होता, ना गोप-गोपिकेत आणि ना राधेत! पुन्हा तो कधीच गोकुळात परत आला नाही. त्याची बासरी पुन्हा कधीच गोकुळात घुमली नाही.
कृष्ण वेगळाच होता, सगळ्यांच्यात असूनही, कुणाचाच नव्हता. तो देव होता, कितीही खोल बुडाला तरी निर्लेप वर येणारा! त्याने जन्म घेतला तोच मुळी काही उद्दिष्ट ठेवून. त्याचे विहित कर्म करण्यासाठी त्याला जावेच लागणार होते. अर्थात त्यालाही हे देवत्व निभावणे अवघड गेलं असेल. देवाला कुठे मन मोकळं करायचं स्वातंत्र्य आहे! त्यामुळेच त्यानं ती बासरी पुन्हा कधीही वाजवली नाही.पण त्याला काही ध्येय होतं, त्यामुळं गोकुळ विसरणं शक्य झालं असेल. राधेला मात्र त्याला विसरून जाणं शक्यच नव्हतं. ती तिच्या कृष्णात इतकी एकरूप झाली होती की तिचा कान्हा तिच्या जवळच होता. नीळं आभाळ डोळ्यात पांघरून, बासरीचे सूर कानात साठवून, सहवासाचा क्षण अन् क्षण मनात रुजवून ठेवण्याची तिला गरजच नव्हती, तिला वेगळं अस्तित्व होतंच कुठे? यमुनेवर पाणी भरायला गेली की बासरीचे सूर अलगद कानावर यायचे, घागर तशीच पाण्यावर तरंगत असायची. पाणी भरायला आलेल्या गोपी तिला जागं करायच्या. जाताना थोडा पाचोळा वाजला की तिला कृष्णाची चाहूल लागायची. पान हललं की तिला मोरपीस दिसायचं. पक्ष्याच्या तोंडातून बी खाली पडली की माठ फुटला असं वाटून थरथरायची. ओलेत्यानं घरी कशी जाऊ? रागानं त्याच्याकडे पाहायची. अखंड त्याचीच स्वप्नं, त्याचाच ध्यास! बाकीचं विश्व तिच्यासाठी नव्हतंच. तो आणि त्याचे विचार, त्याचं अस्तित्व नाकरण्या इतके बाजूला व्हायचेच नाहीत.ती तृप्त होती अन् ही तृप्तीच तिला अतृप्ती कडे नेत होती.
या गोष्टीला तिसराही कोन आहे हे अरुणा ढेरे यांची ‘अनय ‘ ही कविता वाचल्यावर लक्षात आलं. लक्षात आलं की अनय होऊन जगणं सर्वात अवघड आहे. अनय हा राधेवर मनापासून प्रेम करणारा, तिला समजावून सांगण्यात अपयशी ठरलेला, तिची अवस्था बघून कावरा बावरा झालेला, तिच्या सुखासाठी झटणारा, तिच्याकडून कोणत्याही सुखाची अपेक्षा न करता! अनय होऊन जगणं अवघड आहे कारण राधेच्या डोळ्यात तिची स्वप्नं पहायची, जी कधीच आपली होणार नाहीत, त्यांना आपल्या काळजात उतरवायचं, आपल्या स्वप्नांना तिच्या डोळ्यात जागा नसली तरी! राधेला कृष्णा सोबतचे कित्येक क्षण होते ज्यावर ती उर्वरित आयुष्य काढू शकत होती, पण अनय कडे एकही असा भाबडा क्षण नव्हता, ज्यावर उरलेलं आयुष्य ओवाळून टाकावं.
अनय शेवटपर्यंत तिचा होऊन तिच्या अस्तित्वाभोवती घुटमळत, जिंकण्याची आशा मनात फुलवत राहिला.त्यानं कधी त्याबद्दल उपकाराची भाषा केली नाही की आपल्या आयुष्यातून तिला वजा केले नाही.
राधा कृष्ण एकमेकावर प्रेम करणारे पण सारं अधुरंच राहिलेले, राधा अनय लौकिकार्थानं पती पत्नी पण सारं अधुरंच राहिलेले! कृष्णाला मुक्त ठेवण्यासाठी राधेनं आपल्या प्रेमाचा त्याग केला. कृष्णानं कर्तव्य पूर्तीसाठी राधेच्या प्रेमाचा त्याग केला. अनयनं राधेच्या सुखासाठी आपल्या प्रेमाचा त्याग केला. सांगू शकता कोणाचा त्याग मोठा आहे?राधा – अनय असंही नातं असू शकतं?
हे लिहिताना ही मी डोळ्यांना आवरू शकले नाही. तर हे सारं सोसताना अनय चं काय झालं असेल?
© सौ.मंजिरी येडूरकर
लेखिका व कवयित्री, मो – 9421096611
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈