श्री अमोल अनंत केळकर
☆ विविधा ☆ अधिक महिमा + ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
मंडळी नमस्कार ??
सध्या कुठला महिना चालू आहे असे कुणी विचारले तर आपण अगदी पटकन सांगू सप्टेंबर. मराठी महिना कोणता चालू आहे हे ही काहीजण सांगतील. ही जी कालगणना इंग्रजी, मराठी महिन्यांची जी अनेक कालखंडापासून अगदी सुयोग्य पद्धतीने चालू आहे,त्याला गुंफणारा एक दुवा जो साधारण तीन एक वर्षानी येतो तो म्हणजे ‘अधिक मास’/अधिक महिना/ जो आत्ता सध्या चालू आहे. अधिक अश्विन. यासंबंधी अनेक शास्त्रीय/धार्मिक माहिती आत्तापर्यंत तुम्ही वाचली असेल. तर या सदरात थोडं अधिक या अधिक (+) शब्दाशी आपण कसे परिचित आहोत हे पहायचं?
लहानपणी गणित शिकताना अधिक (+) हा शब्द पहिल्यादा आपण शिकतो. माझ्याबाबतीत बरीचशी बेरीज (अधिक+) असलेली गणिते माझी वजाबाकी असलेल्या गणितापेक्षा जास्त बरोबर आली आहेत किंवा वजाबाकीच्या गणितांपेक्षा बेरीज असलेली गणिते मला जास्त आवडायची . थोडे मोठे होत गेल्यावर परीक्षेत अगदी इतर विषयाच्या पेपरात ‘ अधिक + पुरवण्या ‘ लावण्या एवढी मजल मात्र मी मारू शकलो नाही .
अधिक/जास्त/अजून या गोष्टीशी आपले नाते मानवी स्वभावानुसार अगदी नैसर्गीक आहे कारण जन्माला आल्यापासून आपले ‘शारीरिक वय’ हे वाढतच असते (अधिक+), उणे कधीच होत नाही. ‘मार्केटींग स्कीम’ मध्ये या ‘अधिक +’ गोष्टीचा अगदी पुरेपूर वापर केलेला दिसतो. २ गोष्टीवर एक गोष्ट फ्री (अधिक), अमुक एक गोष्ट अमुक कालावधीत घेतली तर तिसरी एखादी गोष्ट अधिक मिळेल, एखादी पॉलिसी/ट्रॅव्हल प्लॅन/एखाद्या क्लबची मेंबरशीप घ्या आणि ही (अधिक+) बक्षसे मिळवा इ इ इ
दिवाळी/ होळी साठी कोकणात सोडण्यात येणार-या जादा (अधिक) रेल्वे, पंढरपूर यात्रेसाठीचा अधिक बसेस, दिवाळीत काही नशीबवान कर्मचा-यांना मिळणारा बोनस (अधिक) एखाद्या उत्तम कलाकाराने सादर केलेली कलाकृती याला मिळालेला ‘वन्स मोर’ (अधिक+), शनिवार/रविवार काही मालिकांचा सादर होणारा एक तासांचा विशेष (अधिक +) भाग, कुठल्याही मॉल मध्ये सिनेमाच्या तिकिटाबरोबरच खादाडी करण्यासाठी घेतलेला (अधिक +) कॉम्बो पॅक, मराठीतील काही म्हणी जशा ‘ आधीच उल्हास त्यात फाल्गुनमास ‘ किंवा दुष्काळात तेरावा महिना यासगळ्या गोष्टीचा कुठे ना कुठेतरी ‘अधिक +’ शी संबध येतो असे वाटते. अगदी आजारीपडलो, अपघात झाला तर आयुष्यमान वाढण्यासाठी जिथे आपण पोचतो त्या जागेचे चिन्ह ही ‘+’ हेच असते. आणि शेवटी ते म्हणतात ना ‘नॉट बट लिस्ट’ का काय ते राजकारण ? होय राजकारण या प्रकारातही आपण अनेकदा ‘बेरजेचे राजकारण’ ऐकतो/पहातो की तर असा हा अधिक + महिमा. आपणास आवडला असेल.
तर सन २०२० हे लीप वर्ष असल्याने फेब्रुवारीही १ दिवस अधिक घेऊन आला होता. सर्व जावयांसाठी ‘ अधिक मास ‘ ही पर्वणीच असते असे म्हणतात कारण
अधिक मास, त्यात, कुठलीही तिथी
ताटलीयुक्त ताजे ताजे अनरसे किती?
दोन प्रहरी सासूरवाडीत सोहळा रंगला
तोची आनंदला ग सखे, जावई भला
. पण कधी कधी वाटत ही अजून अजून/अधिक अधिक ची हाव ही मर्यादित हवी. एकंदर मिळणा-या गोष्टीत समाधान आहे/ बास आता अजून अधिक नको. किती पळायचे त्या अधिक/अधिक च्या मागे? असे वाटणे ही महत्वाचे . लेखनाचा शेवट सगळ्यांसाठीच ‘धीर’ धरी असा मोलाचा सल्ला देऊन
होसी का भयकंपित शरसी का शंका
गाजतसे वाजतसे तयाचाच डंका
जय गोविद जय मुकूंद जय सुखकारी
धीर धरी धीर धरी जागृत गिरिधारी
© श्री अमोल अनंत केळकर
नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
मैफिल ग्रुप सदस्य
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈