सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
विविधा
☆ असाही एक वड… ☆ सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे ☆
(आणि त्या निमित्ताने वटपौर्णिमे संबंधित विचार..)
वटपौर्णिमेला वडाची पूजा करताना स्त्रिया नवऱ्यासाठी आयुष्याचे आणि स्वतःच्या सौभाग्याचे दान मागत असतात.मी जिथे रहात असे तिथे जवळपास वडाचे झाड नव्हते.म्हणून प्रथम आम्ही वडाची फांदी आणून पूजा करत असू, पण ती गोष्ट मनाला अजिबातच पटत नव्हती! ज्या झाडाची पूजा करायची त्याचीच फांदी तोडून आणायची! म्हणून ते करणं बंद केलं.. त्यानंतर समोरच्या देवळात एक भटजी कुंडीमध्ये फांदी घेऊन बसत असे तिथे जाऊन आम्ही पूजा करू लागलो.कुणाकडे तरी बोन्साय वड ही होता.त्या घरची बाई त्याची पूजा कौतुकाने करत असे.आणि आपण कसं घराबाहेर सुध्दा पडत नाही याचंच तिला भारी वाटत असे.ते लोकांना सांगण्यात तिला आनंद मिळे!
नंतर काही दिवसांनी कोपऱ्यावरच्या पानपट्टी जवळ एक वडाचे रोप उगवले होते .पानपट्टी वाल्याने त्याची जोपासना करून ते रोप वाढवले.कारण त्याच्या टपरीवर सावली यावी म्हणून!ते बऱ्यापैकी मोठे झाल्यावर बायका वडाच्या पूजेसाठी तिथे येऊ लागल्या.कारण ते ठिकाण सोयीचे होतं! पानपट्टी वाल्याने स्वतःच्या दुकानात वडाच्या पूजेला लागणारे साहित्य पण ठेवले. त्यात त्याचाही फायदा होता. पहिला जो भटजी होता तो आता तिथे येऊन बसू लागला आणि बायका जे काही वडाजवळ ठेवत ते सगळं तो स्वतःला घेत असे.ते उत्पन्न बऱ्यापैकी वाढल्यावर पानपट्टी वाल्याला थोडा लोभ सुटला. त्यालाही वाटले, हे झाड मी लावले, सावलीसाठी वाढवले आणि आता या झाडाच्या वटपौर्णिमेच्या उत्पन्नात मला ही वाटा पाहिजे. दोघांमध्ये छोटंसं भांडण ही झालं! शेवटी काही मोठ्या लोकांनी त्या दोघात कॉम्प्रमाईज केलं आणि त्या दिवशी येणारं सगळं उत्पन्न दोघांनी वाटून घ्यावे असे ठरले. दुसऱ्या वर्षी भटजी आणि पानपट्टी वाला दोघेही त्या वडाजवळ तासन् तास थांबत असत .येणाऱ्या बायका भटजीचे पायावर डोकं ठेवत आणि त्याला फळे,दक्षिणा देत. आणि झाडाजवळ ठेवलेले विडे आणि फळं ,पैसे हे सगळं पानपट्टी वाला घेत असे. दोघांचं भांडण तर मिटलं! पण पुढील विचार मनात आले!
वटपौर्णिमेचा हेतू काय? त्यामुळे मिळणाऱे उत्पन्न असे कितीसे असणार? सत्यवान -सावित्री ची कथा किती जणी वाचतात.त्यातील मूलभूत अर्थ काय! आम्हाला इंग्रजी विषयात SAVITRI हे epic अभ्यासाला होते.तेव्हा योगी अरविंद ह्यांना त्यांत अभिप्रेत असलेला जीवनासाठी चा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला.पूर्वीच्या काळी स्त्रियांना घराबाहेर पडायला मिळत नसे, त्यामुळे वटपौर्णिमेची पूजा करण्यासाठी स्त्रिया निसर्गात जात असत. बरेच वेळा वड- पिंपळासारखे वृक्ष गावाबाहेर, रानामध्ये असत. तिथे जाऊन पूजा करून येण्यात मोठा आनंद मिळे. आपल्या हिंदू धर्मामध्ये बऱ्याचशा गोष्टी या धार्मिकतेशी जोडल्या असल्यामुळे त्या सातत्याने केल्या जात असत. त्यामध्ये धार्मिक, सामाजिक असा सर्व प्रकारचा आनंद घेता येत असे. आत्ताच्या काळात त्याकडे एक इव्हेंट म्हणून पाहिले जाते. काही का होईना, त्यानिमित्ताने तरुण पिढीला आनंदही मिळतो आणि परंपरा राखण्याचे समाधानही मिळते! स्त्रियांना नटून थटून वडाला जाण्यात तसेच डाएट म्हणून उपवास करण्यातही वेगळा feel घेता येतो!
शेवटी काय, जीवन आनंदात जगणे हेच सगळ्याचे मूलभूत तत्व आहे. ते सांभाळून आपण आपले सांसारिक जीवन, समाजामधील स्थान या सगळ्या गोष्टी टिकवू शकतो. अलीकडे स्त्रियांना नोकरी, व्यवसाय यामुळे स्वतःच्या आनंदाला बरेच वेळा मुरड घालावी लागते, पण अशा काही परंपरा जोपासताना नकळत हा आनंद त्यांना घेता येतो. मग उगीचच आपल्याला उपास आणि वडपोर्णिमा या अंधश्रद्धा वाटतात असं म्हणण्यात काय बरं अर्थ आहे!
आणि तसेही हे व्रत आपल्या आवडत्या माणसासाठी, नवऱ्यासाठी असेल तर स्त्रियांनी ते जरूर करावे.
म्हणजे नवराही -सत्यवान ही वडाजवळ चपला सांभाळायला आणि नटलेल्या, सजलेल्या बायकोला पूजा करताना बघायला कौतुकाने येतोच ना!
© सौ. उज्वला सुहास सहस्रबुद्धे
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈