सुश्री सुलभा तेरणीकर
विविधा
☆ अलौकिकाच्या पालखीबरोबर… ☆ श्री सुलभा तेरणीकर ☆
शाळा सुटली तेव्हा पाठ्यपुस्तकातल्या कवितांचा निरोप घेताना कविताशाखेची एक मुळी बरोबर घेतली होती. पुढे महाविद्यालयाच्या प्रांगणात ती चांगलीच बहरली. साहित्याची विद्यार्थिनी नसूनदेखील कवितेचे प्रेम अखंड राहिले. इंदिरा संत, महानोर, ग्रेस, आरती प्रभू, पाडगावकर यांच्या कवितांनी दिवस नुसते घमघमत होते.
ग्रंथालयाच्या प्रतीक्षायादीसाठी किती अधीर असायचे मन ! संग्रह पटकन हाती पडायचे नाहीत. मग उधार-उसनवारी, मिनतवारी करावी लागे. कविता क्वचित कानी पडत आणि पुन्हा वाट पाहणे संपत नसे.
‘गडद नीलिमा चष्म्यावरचा, शर्टावरची बटणे काळी’… इंदिरा संतांच्या कवितेतल्या इंद्रधनूवर रेलणारी सुरंगा आपणच आहोत, असा भास होई, ‘तो चहा गुलाबी, ती चर्या खळाळणारी…’ असे काही वाचताना धूसर स्वप्नांची वाट आता दूर नाही, असे वाटे. आरती प्रभूंच्या ‘माझी वस्त्रं तुझी झाली’ या ओळींवर पतंग होऊन मन झेपावत असे. पाडगावकरांची ‘जांभळी नीज ये’ रेंगाळत राही. बोरकरांची ‘पाठमोरी पौर्णिमा’ शोधून वाचली जाई.
‘पाठमोरी तू बीजेची रात्र, लावण्ये रमा हासुनी पाही वळोनी,
होऊ दे ना पौर्णिमा…’
दुर्बोधतेच्या घनवनाची तमा न बाळगता ग्रेसच्या कविता शोधायची अनिवार हौस फिटतच नसे.
‘शून्यात गर्गरे झाड तशी ओढाळ दिव्यांची नगरी
वक्षात तिथीचा चांद तुझा की वैरी … ‘
…. या ओळींवर फिरफिरून नजर जात असे. महानोरांच्या रानाने तर साद घातलेली होती. राजबन्सी पाखराने खुणावले होते. हिंदी-मराठी चित्रपटगीतांतून, भावगीतांतून कविता भोवती रोषणाई करीत असे. गदिमांच्या गाण्यातले कडवे मनात अधोरेखित करीत असे.
‘प्रिय नयनातील भाव वाचता
चुकून दिसावा मोर नाचता
दूर देशीचे बुलबुल यावे कधीमधी पाहुणे… ‘
… त्यातले छंद-प्रास आवडत, की शब्दांतून साकारणाऱ्या दृश्यांचा मोह अनावर होई, की नाद ओढ लावीत;ते कळायचे नाही. आपल्या कोवळ्या तारुण्याची जादू असावी, की काय, असेही वाटे. मग आपणही कविता कराव्यात, असे वाटे. जमिनीवर पाय काही ठरायचे नाहीत.
त्यातच पुढे साहिरचे ‘तल्खियॉं’ हाती आले. त्यातल्या दाहकतेने चटका लावला.
‘तेरे पैराहने रंगोंकी जुनूखेज़ महक
ख्वाब बन बनके मेरे ज़हन में लहराती है ,
रात की सर्द खामोशी में हर इक झोंके से
तेरे अनफ़ास, तेरे जिस्म की ऑंच आती है
… ‘तुझ्या रंगीत वसनांचा उन्मादक गंध एखाद्या स्वप्नासारखा तरळतो. रात्रीच्या नि:शब्दतेत थंड झुळकीबरोबर तुझ्या श्वासांची, शरीराची दाहकता जाणवतीय.’
असे काही वाचल्यावर माझ्या सुसंस्कृत मनाच्या भिंती थरथरल्या. इंदिरा संतांच्या कवितेतल्या मणिबंधावर उतरणाऱ्या खुळ्या पाखरासारखी मी धडधडत राहिले.
आता पुढची कथा सांगायला हवी. मोठ्या वादळात कवितांची घरटी पार उध्वस्त झाली. छंद हरवले. शब्द निमाले. आवडीच्या कवितांचा संग्रह जवळ असावा, हे विलासी स्वप्न दूर-दूर जात राहिले. आकडेमोड, खर्चाची तोंडमिळवणी, देणी-घेणी, दुखणीबाणी यात किती चंद्र-सूर्याचे उदयास्त होऊन गेले, ते कळले नाही. बधिरपणातून सावरेपर्यंत बरीच चढण चढले. एखाद्या शांत पांथस्थाने झाडाखाली क्षणभर बसावे, तशी थोडी थांबले आणि कवितेची सृष्टी पुन्हा एकदा जवळ केली. जमेल तसे एकेक कवितासंग्रह घरी आणत गेले. रात्री उशागती दिव्याच्या सोबतीने कवितांची उजळणी करू लागले. सरत्या चैत्राच्या उत्तररात्री असते, तशी नक्षत्रांची आरास कुठली असायला? मंद दिव्याची सोबत पुरत असे. कळ्या-फुलांचे बहर नव्हते. वाळलेल्या काटक्यांच्या समिधा मात्र होत्या.
स्वातंत्र्यानंतर जन्मलेल्या पिढीतली असल्याने कुसुमाग्रजांच्या क्रांतिघोषाच्या जयजयकारापासून, धगधगत्या यज्ञज्वाळेपासून दूर चालत आले होते खरी; पण आता त्यांची कविता माझ्यापाशी होती.
‘नवरत्नांनी जडवलेले अलंकार अंगावरून उतरवीत ती माझ्यासमोर उभी राहिली… आणि अखेर देहाला बिलगलेलं झिरमिर आवरणही तिनं दूर फेकून दिलं…
निरभ्र सोलीव रूपाकडे पहात कवीनं विचारलं-
‘तू कोण?’
ती हसून उद्गारली – ‘मीच ती तुझी कविता !’
अखंड पाषाणातल्या सावळ्या मूर्तीसारखी कवीची कविता माझी झाली. वृत्तछंदाचे अलंकरण आता उरले नव्हते. प्रासाची पैंजणे नव्हती … ‘निशिगंध’ वाचत गेले.
‘आणि अंतराळातील कृष्णविवरासारख्या असीम शून्यावस्थेत
माझ्या असलेपणाची आरास..’
…. असलेपणाची आरास? अवघ्या विश्वातले आपले चिमुकले अस्तित्व हाच उत्सव, तर मग जीवन हा तर नित्य आनंद सोहळा… माझ्या प्रौढपणीच्या पाठयपुस्तकातले पान मोहरून उठले. व्यक्तिगत सुखदु:खाच्या संदर्भातले कवितेचे भान वैश्विक स्तरावर उंचावले गेले. त्याच्या पाऊलखुणा शोधत राहिले…
‘विसरल्या उन्हातिल वाटा, विसरले पथातील काटे
ही गुहा भयावह आता स्वप्नांसम सुंदर वाटे
रसभाव भराला आले काव्याहून लोभसवाणे’
…. गदिमांच्या सहज सुचलेल्या मंजुळ गाण्याने काहीतरी सांगितले. बोरकरांची ही कवितादेखील काही कुजबुजून गेली….
‘येते उदासता कधी ओल्या काळोखासारखी,
मध्यरात्री तिची पण फुले नक्षत्रपालवी…’
… दिवा मंद तेवताना ही रोषणाई कसली अन भोवती हा कोलाहल कसला? तो तुमच्या-आमच्या ‘असण्याचा’ सोहळा आहे. कवितेच्या अलौकिकतेच्या पालखीबरोबर दोन पावले चालायचे आहे ना… सर्वांच्यासह…
© सुश्री सुलभा तेरणीकर
मो. 8007853288
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈