☆ विविधा ☆ आम्ही मध्यम वर्गीय ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆
माझा होशील ना, सिरियल पाहिली आणि नकळत डोळ्या समोरून सारे बालपण गेले. सुखात होतो मध्यम वर्गीयात. श्रीमंतीत असणार्या लोकांसारखे जास्त अपेक्षेचे ओझे घेऊन फिरत नव्हतो डोक्यावरून. सुखी समाधानी होतो आम्ही . हव्यास संपतच नाही ह्या लोकांचा, अजून पैसा, अजून एक गाडी, अजून एक जागा खरेदी…..
कपाट भरलेले असते सिल्कच्या साड्यांनी, सुटनी आणि दागदागिन्यांनी. पण ही श्रीमंती मिरवताना स्वतः च कधी गरीब होऊन जातात मनानी, हेच त्यांना कळतं नाही. नात्यांच्या गोधडीला प्रेमाची ऊब लागते पैश्यांची नाही, हे त्यांच्या लक्ष्यातच येत नाही. आणी जेव्हा लक्ष्यात येते तोवर खुप उशीर झालेला असतो. रणरणत्या उन्हात एसी गाडीतून फिरतांना डेरेदार झाडाच्या सावलीचा आनंद कधीच अनुभवता येत नाही त्यांना.
ताजं कढवत ठेवलेल्या लोणकढी तुपाच्या वासाचा घमघमाट आम्हां मध्यमवर्गीयांनाच माहिती, तो खमंग वास रेडी बटर, आणि चिझ ला कुठे ?? जेव्हा घरी बेसनाचे लाडू बनताना खमंग वास दरवळतो ना, सगळीकडे आणि तोंडाला पाणी सुटते तो अनुभव फक्त आम्हालाच. भडंग करतांना लसणीचा खमंग वास घरभर फिरतो आणि वर्दी देऊन जातो ताज्या भडंगावर ताव मारण्याची, तो रेडीमेड भडंगात कुठे?
पॉकेट मनी साठवून आपल्या आई बाबांच्या वाढदिवसाला सरप्राईज गिफ्ट आणण्याचे सुख आमच्याच नशिबात, हां आता सो कॉल्ड ग्रँड पार्टी आमच्या दैवात नसेल, ना तो भपका आणि पैश्यांची उधळपट्टी, कारण आम्ही वर्षभर विचार करून साधारण तेच गिफ्ट घेतो ज्याची खरच गरज आहे आणि जे आमच्या खिशाला परवडणार पण आहे.
सगळीच नाही काही, पण असे बरेच श्रीमंत लोक आहेत जे फक्त आपला स्टेटस जपण्यासाठी पैश्यांची उधळपट्टी करतात. डिनर पार्टीला, एक पंधरा वीस तरी आयटम असतात खायला, ज्यातले निम्मे अधिक फुकट जातात. आम्ही भले दोनच जिन्नस करू पण वाया नाही कुठला घालवणार. आम्हां मध्यमवर्गीयांना गरजेला सारे काही पण उधळपट्टी कधी जमली नाही आणि श्रीमंतांना गरजेपुरते अस काही असते हेच कधी कळले नाही.
मला आठवतय चार लहान खोल्या असल्या तरी अगदी सगळे नातेवाईक मे महिन्यात जमलो की मस्त पंधरा पंधरा दिवस धमाल करायचो कधी अडचण नाही झाली आम्हाला कोणाची आणि तेच श्रीमंतीत राहणार्यांचा महाल असला ,तरी चार चे पाच जण झाले तरी त्यांची स्पेस हरवल्या सारखी वाटते त्यांना. आत्ता पटते माणसांच्या मनात स्पेस लागते, जागेत नाही.
श्रीमंतां सारखे गरजेपुरता माणूस, अस नसते आमच्यासाठी. लोकं कामापुरती मनात अस होत नाही. आम्ही नाती पैश्यांसाठी, कामापुरती जपत नाही, एकदा नाते जोडले तर ते मनापासून जोडतो आणि ह्रदयात जपतो कायमकरता. It is not a deal or contract for us or a source to earn money.काम झाले की हात पुसून टीशुपेपर सारखे फेकून देत नाही, कारण मुळात टीशुपेपर हेच आधी आमच्या संस्कृतीत बसत नाही.
मातीत बागडून, खेळून धडपडून मोठे झालो आम्ही. उन्हाचे चटके बसले की सावली कशी शोधायची हे शिकवायला लागले नाही आम्हाला. सुखी आहोत ह्याचे कधी नाटक नाही करावे लागले, कारण खरच होते त्यात सुखी होतो आम्ही. तेच श्रीमंतांना एसीत बसुन घाम फुटतो, आणि किती ही सुखी असला माणूस तरी वर्षाच्या शेवटी त्यांच्या balance sheet मधे समाधानी आहोत हे मांडावे लागते.
सहज मनाच्या कोपऱ्यातून ?
© सौ. श्रेया सुनील दिवेकर
05.10.2020
मो 9423566278
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈