श्री अमोल अनंत केळकर
☆ विविधा ☆ आधुनिक शाळेतील एक दिवस ☆ श्री अमोल अनंत केळकर ☆
(सर्व पात्रे आणि लेख काल्पनिक)
चांगली हायस्कुलच्या ७ वी तील एक वर्ग. शनिवारचा सकाळचा दिवस. शनिवारची अर्धीच शाळा असल्याने सगळे तसे आनंदातच होते. हनुमान पूजेचा सेक्रेटरी लवकरच आला होता. द्रोणागिरी पर्वत उचलून घेऊन जात असलेला हनुमानाचा फोटो त्याने पेन ड्राईव्ह वरून मेन सर्व्हर वर उतरवूनन घेतला होता. जे वर्गात येत होते त्यांच्या कडून डेबिट / क्रेडिट कार्ड घेऊन तो वर्गणीच्या मागे लागला होता. हळूहळू एक एक जण वर्गात येत होते आणि आल्या आल्या आपला लॅपटॉप चालू करत होते. संगणक चालू होता क्षणी लॉगिन आय डी आणि पासवर्ड टाकला की आपोआप हजेरी लागायची.
बंड्या आल्यापासून लॉगीन करण्याचा प्रयत्न करत होता पण ते होत नव्हते. २-३ दा तसे झाल्यावर त्याच्या लक्षात आले या महिन्याची फी भरण्याचा कालचा शेवटचा दिवस होता आणि त्याने फी भरली नव्हती. शेवटी स्पेशल परमीशन घेण्यासाठी तो तडक मुख्याध्यापकांकडे पळाला.
जग्गू वर्गात आला तेच जरा रागावत. त्यात ‘स्वाइप से (मशीन) करेंगे सबका स्वागत’ असे म्हणत जेंव्हा मारुती पूजेचा सेक्रेटरी त्याच्या जवळ पोचला तेव्हा तो म्हणाला नाही देत वर्गणी जा. काल गुरुजींनी रात्री उशीरा व्हाटसप ग्रुप वर घरचा अभ्यास म्हणून निबंध लिहायला सांगितला होता ‘व्यसन शाप की वरदान’. जग्गूने या सेक्रेटरीला मेसेज टाकून हिंट/मुद्दे देण्यास सुचवले होते पण त्याचा रिप्ल्याय न आल्याने तो रागावलेला होता.
इकडे चंपा आज लँपटाॅप चा चार्जर आणायला विसरली होती. तिने राणीकडे मागताच तिने नकार दिला. म्हणाली तू माझ्या मेसेजना ग्रुपवर एकदा तरी लाईक देतेस का? मग मी का म्हणून देऊ CHARGR? प्रश्न रास्त होता.
या सगळ्या गडबडीत वर्ग शिक्षक आले. रिमोट कंट्रोल ने त्यांनी डिजिटल फळा खाली घेतला आणि त्यांचा संगणक चालू करून प्रोजेक्टर वरून डिजिटल फळ्याशी लींक केला. सर्वाना ३०/१२ तारखेवर क्लिक करायला सांगितले. तत्क्षणी मारुती राया आले. त्यांची डिजिटल पूजा झाली, भीमरूपी स्तोत्र mp3 वर वाजू लागले, आरती झाली आणि नंतर प्रसाद म्हणून ( प्रत्यक्ष ) खोबरे दिले गेले. त्यानंतर प्रत्येकाच्या संगणकावर आजचे वेळापत्रक पॉप -अप झाले.
पहिलाच तास गणिताचा निघाला. आज सर शिकवणार होते चक्रवाढ जीएसटी आणी रोजचे बदल हे कोष्टक. फळ्यावर दिसणारे आकडे आले तसे गेले. यात मोजक्या हुशार मुलां शिवाय कुणाला काहीही कळले नाही
दुसरा तास होता संस्कृत. आफळे सर वर्गात आले आणि त्यांनी भगवद्गीतेतील एक श्लोक शिकवायला घेतला. त्यातले ‘सोमरस’ चे वर्णन वाचून अनेकांच्या भुवया उंचावल्या.. आफळे सरांनी ही मग मुलांच्या मनातील सर्व प्रश्णांचे वेगवेगळी उदाहरणे सांगून शंकानिरसन केले.हा तास संपूच नये असं पहिल्यांदाच सगळ्यांना वाटत होते. पण तेवढ्यात संगणकावर नागरिकशास्त्र तास पॉप-अप झाला. पण आज कुलकर्णी सर न आल्याने अचानक ‘अमरधाम’ खेळ म्हणून बदल आला.
इंडियन पिनल कोड पासून सुटका झाली म्हणून मुल आनंदली आणि अगदी फ़टाफ़ट त्यांनी डेस्टोप वरचे ‘अमरधाम अँप’ चालू केले. आज दोन ग्रुप करून पोकेमॉन खेळायचे यावर वर्गातील तमाम मुला – मुलींचे एकमत झाले आणि हा तास कसा संपला ते कळलेच नाही
नशीब महिना अखेर आणि त्यात शनिवार म्हणून तुम्हाला एवढेच वाचायला मिळालं, पूर्ण दिवसाचा वर्ग भरला असता तर? माझं/तुमचं काय खरं नव्हतं
पण हे वाचतांना एकदा तरी मनाने शाळेत जाऊन आलात ना?
© श्री अमोल अनंत केळकर
नवी मुंबई, मो ९८१९८३०७७९
poetrymazi.blogspot.in, kelkaramol.blogspot.com