☆ विविधा ☆ आकाशगंगा ☆ सौ. सुनिता गद्रे ☆
घटना तशी जुनीच. म्हणजे १९६५ सालातली. मी अकरावीत शिकत होते. म्हणजे त्यावेळचे मॅट्रिक. आमच्या सायन्सच्या सरांनी एके दिवशी रात्री आम्हा सर्व विद्यार्थ्यांना एका त्यावेळच्या तीन मजली बिल्डिंग च्या टेरेस वर बोलावलं होतं. अमावस्येची रात्र होती….. घाबरायचं कारण नाही. आम्हाला ते खगोल शास्त्रातील’आकाश गंगा’प्रत्यक्ष दाखवून ग्रह तारे नक्षत्र यांची माहिती देणार होते.
आमच्या सायन्सच्या सरांइतका उत्साही शिक्षक मी आजवर पाहिला नाही. आपल्या विषयातील संपूर्ण ज्ञान त्यांना होते. आणि ते विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवायची तळमळ ही होती. फिजिक्स केमिस्ट्री मधले कितीतरी प्रयोग …. अभ्यासक्रमाबाहेरचे …त्यांनी आमच्याकडून करवून घेतले होते.
त्या रात्री सरांनी उत्तर-दक्षिण पसरलेला तार्यांनी तुडुंब भरलेला चकाकणारा आकाशगंगेचापट्टा दाखवला. खूप सगळी माहिती सांगितली. त्यामुळे खगोलशास्त्राचा वेगळा अभ्यास करावाच लागला नाही.
लग्नानंतर दिल्लीला गेल्यावर बरेचदा मुद्दामून सातव्या मजल्याच्या टेरेसवर जाऊन मी आकाशगंगा शोधायचा प्रयत्न करायचे पण लाईटच्या झगमगाटात ती आकाशगंगा मला कधीच दिसली नाही. आता तर छोट्या छोट्या गावात सुद्धा बिजली च्या झगमगाटामुळे आकाशगंगा आपल्यापासून खूप दूर गेलेली आहे. उन्हाळ्यात दिल्लीला आम्ही त्यावेळी रात्री टेरेस वर झोपायला जायचो. आता ए.सी मुळे. त्याही गंमतीला आपण मुकले आहोत.मुलांना मी थोडंसं लक्षात राहिलेला ज्ञान द्यायचे. मृगनक्षत्र… हरीण… त्याच्या पोटात घुसलेल्या बाणाचे तीन तेजस्वी तारे…. व्याध. तसेच सप्तर्षींचा पतंग… दोरी सारखा खूप दूर असलेला ध्रुवतारा.. जो जास्त चमकत नाही… वशिष्ठ ऋषी.. त्यांच्या शेजारी छोटीशी चमकणारी अरुंधती ची चांदणी… सगळं त्यांना दाखवायचे. खरं तर सगळंच फार फिकट दिसायचं. शर्मिष्ठा देवयानी ययातीचा तो M सारखा तारा समूह.. जो एका वेगळ्याच आकाशगंगेच्या भाग आहे (बहुतेक). जो सरांनी दाखवला होता… तो मला कधीच दिसला नाही. शुक्र मंगळ ग्रह पण दिसले नाहीत. पुढं मुलं मोठी झाल्यावर मी त्यांना प्लॅनेटोरियम मध्ये घेऊन गेले होते. तिथं मॉडर्न टेक्निकनं दाखवलेली आकाशगंगा पाहिली. पण सरांनी दाखवलेली आकाशगंगा मला तिथं सापडलीच नाही…… ती हरवून गेली होती.
वर्षापूर्वी मला कर्नाटकातल्या एका खेड्यात जायचा प्रसंग आला. आम्ही तिघं जणं होतो. एका छोट्याशा स्टॅन्डवर बस थांबली. आम्ही आमच्या गंतव्या कडे… साधारण दोन-अडीच मैल चालत निघालो. तीपण अमावस्येची (एखादा दिवस मागेपुढे) रात्र होती. चालताना दृष्टी वर गेली आणि मुग्ध होऊन मी पाहतच राहिले. तो दक्षिणोत्तर पसरलेला तारकांचापट्टा-milky way-मला खुणावत होता. पूर्ण गोलाकार क्षितिज…. काळे कभिन्न आकाश.. ते म्हणजे एक खोलगट वाटी…. अन त्यावर चमकणारा आकाशगंगेच्या पट्टा. तो इतका जवळ वाटत होता की शिडीवर चढून आपण त्याला हात लावू शकू …. आणि हे काय?…. त्या मृगाच्या चौकोनात असंख्य तारे चमकत होते. मग मी माझ्या ओळखीचे तारे शोधण्याचा प्रयत्न करू लागले. ‘खरंच आता सर असायला हवे होते’ मनात विचार चमकून गेला.
पंधरा वीस मिनिटानंतर”काकू थांबू नको.. लवकर ये “. या पुतण्याच्या हाकेनं मी भानावर आले .’मध्ये रुपया ‘नसलेल्या सुपभर लाहया मी मनात भरून घेतल्या.
शेवटी लहानपणी पाहिलेली….अन् हरवून गेलेली आकाशगंगा मला सापडली होती.
© सौ. सुनिता गद्रे,
माधव नगर. मो – 960 47 25 805
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈