☆ विविधा ☆ आयुष्यावर बोलू काही ☆ सौ. श्रेया सुनील दिवेकर ☆
खरच किती प्रश्न डोकावतात नाही का मनात?
नक्की आयुष्य आहे तरी काय?अनेक प्रश्नांनी भरलेल, अनेक सुखाने, दुःखाने भरलेले नाना छटांनी नटलेले. आणि गंमत म्हणजे प्रत्येक माणसाचे प्रश्न वेगळे आणि उत्तर पण वेगळी. प्रत्येक माणसाचा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन वेगळा.
कोणासाठी ते सप्तरंगी आहे तर कोणासाठी रंगहीन, नीरस. कोणासाठी ते समुद्राच्या लाटा आहेत खळखळणाऱ्या,सळसळणाऱ्या, तर कोणासाठी एखादी शांत वाहणारी नदी किंवा सुरेख संगम दोन नद्यांचा. कोणाला ते शीतल शांत चंद्राप्रमाणे भासतं , तर कोणाला सूर्याच्या प्रखर उन्हाच्या चटक्या प्रमाणे.
मला विचाराल तर, आयुष्य हे एक प्रश्न चिन्ह आहे ज्याचे उत्तर कधीच मिळत नाही, एक कोड आहे जणू, जर सुटल तर मोकळी वाट नाहीतर आपल्या वाट्याला घाटच घाट.
कधी वाटते की आयुष्य एक सोंगट्यांचा खेळ आहे. आपण फक्त आपली खेळी खेळायची, त्याच फळ काय द्यायचे ते मात्र देवानी त्याच्या हातात ठेवले आहे,थोडक्यात आपण प्यादी आहोत पटावरची, फासे तर तो टाकतो, तो सूत्रधार आहे ह्या आयुष्य रुपी नाटकाचा. आपण फक्त आपला अभिनय नीट पार पडायचा.
मला काही वेळा मात्र आयुष्य सप्तरंगी वाटतं छान सुंदर, इंद्रधनुष्याला जसे सात रंग असतात अगदी तस. मग त्यात प्रेमाचा रंग आला, आपुलकीचा आला, स्पर्धेचा, द्वेषाचा, मद, मत्सर अगदी सगळे रंग आले. हां आता ह्यातला आयुष्यरुपी कॅनव्हास वर कोणता रंग जास्त भरायचा हे मात्र आपल्या हातात आहे.
अचानक मला असे वाटले की जितकं आपलं वय,आपला अनुभव तसे भासत असेल काहो हे आयुष्य सगळ्यांना?
छोट्या मुलांना आयुष्य फुग्याप्रमाणे, किंवा फुलपाखरा प्रमाणे भासत असेल का छान हलकं हलकं आकाशात स्वच्छंद बागडणार आपल्याला हवे तसे रंग स्वतः भरणार ना कोणते नियम ना बंधन. स्वच्छंद बागडायचे फक्त. कोणतेच प्रश्न नाहीत , त्यामुळे तक्रार पण नाही.
थोडं मोठं झाल्यावर त्यांना ते स्वप्नं रुपी वाटत असेल का? जिथे अनेक स्वप्नं पहायची आणि ती सत्यात उतरवण्यासाठी झगडायचे. अनेक चॅलेंज घ्यायचे आणि ते पूर्ण ही करायची.
थोडक्यात नियम आणि कायदे आपलेच.
आंब्यांच्या झाडाला मोहर यावा, किंवा छान हिरवी गार पालवी यावी तस किंवा एखाद्या पाण्याचा धबधब्या सारखे स्वच्छंद सतत वाहणारं.
अजून मोठ झाल्यावर म्हणजे कदाचित तिशी ओलांडल्यावर, जेव्हा अनेक जबाबदार्या अंगावर येऊन पडतात तेव्हा आयुष्य पझल गेम सारखं वाटत असेल का, किंवा डोके चालवा, सुडोकू सारखा जिथे प्रत्येक कोड सुटतच अस नाही पण तरीही आपण प्रयत्न करतोच ना. आणि बरेचदा मार्ग ही मिळतो.
आयुष्यभर सूर्यप्रकाशाचे चटके सोसल्यानंतर म्हणजेच सगळया जबाबदार्या संपल्या की हेच आयुष्य आपल्याला रात्रीच्या चांदण्यांसारखं शीतल शांत वाटत असेल का. ह्या टप्प्यावर आपल्याकडे सगळ्या प्रश्नांची उत्तरे असतीलच असं नाही,पण आता ती मिळावीत म्हणून धडपड ही नसेल. ना काही मिळवण्याची धडपड असेल ना काही गमावण्याच दुःख.
थोडक्यात काय तर जरा चुकीचे जरा बरोबर बोलू काही, चला दोस्त हो आयुष्यावर बोलू काही.
सहज मनाच्या कोपर्यातुन ?
© सौ. श्रेया सुनील दिवेकर
मो 9423566278
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈